‘रिॲलिटी शो’ आणि काही गंभीर प्रश्न
गेल्या काही दिवसात बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती विरोधी नरेटिव कश्या रीतीने चालवले गेले याची खूप चर्चा झाली. 1990 ते 2010 दरम्यान आलेले बरेच चित्रपट सेक्युलॅरिझम च्या नावाखाली कसे भारतीय संस्कृतीच्या विरोधी जनमानस तयार करत होते याची अनेक उदाहरणे समोर आली. पण चित्रपट, मालिका आणि विविध कलेच्या माध्यमातून समाजात केवळ भारत विरोधी, राष्ट्र विरोधी विष पेरले जात नव्हते तर भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. मागील काही वर्षात साधारण 2001 पासून आलेल्या विविध रिॲलिटी शो, मालिका, अलीकडे आलेल्या बऱ्याच वेब सिरीज हेच नरेटिव घेऊन समाजाला (विशेषतः उच्चवर्गीय श्रीमंत वर्गाला) टार्गेट करताना दिसत आहे. समाज व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, व्यसनी, अंग प्रदर्शन आदी वैशिष्ट्य असलेल्या कलाकारांना प्रोत्साहित केले जात आहे. बिग बॉस, रोडिज, स्प्लिटविला, इंडीयन मॅच मेकिंग, सुपर मॉडेल ऑफ इयर अश्या विविध रिॲलिटी शो च्या माध्यमातून तरुणाईवर मॉडर्नयझेशन वोकिजमचा विकृत प्रभाव टाकला जात आहे.
रिॲलिटी शो हा एक फसवा आणि स्क्रीप्टेड कार्यक्रम असल्याचा अनेकदा आरोप होत आलाय. ह्याचा खरा हेतू जाहिरात, कमाई व विशिष्ट नरेटिव चालवणे, नवनवीन ट्रेण्ड सेट करणे हाच राहिला आहे. मैत्रीत विश्वासघात करणे, खोटं बोलणे, क्षुल्लक गोष्टीवरून आक्रमक होणे, मोठमोठ्याने आरडाओरड, शिवीगाळ हे सर्व आजकाल मनोरंजनाच्या नावाखाली रिॲलिटी शो या गोंडस नावाखाली दाखवलं जातंय. वादग्रस्त ठरलेल्या कलाकारांना (?) यात विशेषत्वाने संधी दिली जाते. बॅलन्सिंगसाठी काही चांगले चेहरे असतात, परंतु त्यांच्या बरोबर गैरकृत्य केल्यामुळे बदनाम झालेले, अँटीनॅशनल गँग सोबत संपर्कात आलेले, सरकार विरोधी भूमिका घेतलेले, लोकभावना दुखावून चर्चेत आलेले, समाज अमान्य वर्तन केलेले, व्यभिचारी, व्यसनी, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले अश्या कलाकारांना अन्य कलाकारांसोबत या कार्यक्रमात (जाणीवपूर्वक) स्थान दिले जाते.
बिग बॉस सिजन 17 वर्ष 2024 चा विजेता मुनवर फारुकी झाला, जो की कायम विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे कॉमेडी शो करत असतो. त्याबद्दल त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हुक्काबार वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये त्यालाही अटक झाली होती. सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉस सीजन 17 मध्ये त्याला विजयी करण्यात आले. बिग बॉसचा अजून एक विजेता एल्विश यादव हा रेव पार्टीत सापडला होता. त्याच्यावर सापांची (Snake poison) तस्करी केल्याचा आरोप आहे. बिग बॉस चा अजून एक विजेता एम सी स्टँन (मूळ नाव अल्ताफ शेख) याच्यावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला मारहाण व तिचा छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल आहे. SPLITSVILLA नावाने चालणाऱ्या रिॲलिटी शो ची होस्ट एक कुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जिला लोक सनी लियोन नावाने ओळखतात. रोडिजच्या 14व्या सीजन मध्ये गँग लीडर म्हणून रिया चक्रवर्ती हिला घेण्यात आलं होतं जी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी एक आरोपी आहे. एवढंच काय तर या विविध रिॲलिटी शो मध्ये LGBTQ चा अजेंडा चालवण्यासाठी मागील चार पाच वर्षात ट्रान्सजेंडर, लेसबियन, बायसेक्शुअल स्पर्धक सुद्धा घेतले गेले आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व रिॲलिटी शो घेणारे होस्ट कलाकार यांची सर्वांची मिलीभगत आहे की काय असेच वाटते. कारण रिॲलिटी शो तेवढा बदलतो यातील ठराविक स्पर्धक किंवा होस्ट तेच असतात. TRP आणि त्यांची प्रसिध्दी याचा विचार करून पुन्हा त्याच चेहऱ्यांना संधी दिली जाते. बिग बॉसच्या 17 सीजन पैकी 14 सिजनचा होस्ट सलमान खान राहिलाय. दिओलिना भट्टाचर्जी ही तीनवेळा स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये आलीय. शिव ठाकरे याने रोडीज मध्ये भाग घेतला. त्यानंतर बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी, खतरों के खिलाडी या रिॲलिटी शो मध्येही त्यालाच संधी मिळाली. प्रिन्स नारुला यानेही रोडिज मध्ये दोनवेळा आणि बिग बॉस मध्ये एकवेळा भाग घेतलाय. म्हणजे या केवळ नावालाच रिॲलिटी शो आहे का? यातील सर्व गोष्टी टीआरपी आणि जाहिरात याचाच विचार करून ठरवल्या जातात का? असा प्रश्न पडतो.
हे सर्व रिॲलिटी शो केवळ त्याच्या थीम वर चालत नाही, तर त्यात स्पर्धकांमध्ये भांडणं, प्रेम संबंध, लीक व्हिडिओ, उपस् मोमेंट असं बरंच काही घडवलं जातं. प्रेक्षक खिळवून ठेवण्यासाठी खोट्या लवस्टोरी तयार केल्या जातात. रिॲलिटी शो मध्ये जे रिलेशनशिप मध्ये आले ते शो झाल्यानंतर ब्रेक अप झाल्याच्या किंवा आमचे असे काही नव्हते असे सांगणाऱ्या बातम्या लगेच येत असतात. बिग बॉस सिजन 7 मधल्या अपूर्वा अग्निहोत्री व शिल्पा सकलानी यांनी हा सर्व कार्यक्रम स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला होता. आता बघा ना, ‘नच बलिये’ मधील मेघा गुप्ता आणि नमन शॉ यांच्या लव स्टोरीने प्रेक्षकांना खूप खिळवून ठेवलं होतं. ही एक हिट जोडी ठरली होती. पण शो झाल्यानंतर लगेच बातमी आली की त्यांच्यात काही संबंध नव्हते. बिग बॉस मध्ये आलेले सारा खान आणि अली मर्चंट यांची लव स्टोरी तर इतकी पुढे गेली होती की त्यांनी बिग बॉसच्या सेटवर लग्न केले होते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पण शो झाल्यावर त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी आली आणि त्यांच्यावर आरोप होत राहिला की टीआरपी साठी त्यांनी ते लग्न केलं होतं. नुकत्याच रोडिजच्या सेटवर आकृती नेगी व सचिन शर्मा यांच्या रिलेशन बद्दल दाखवले गेले पण शो होताच त्यांचे ब्रेक अप झाले. आता दोघेही स्प्लिट विला या डेटिंग शो मध्ये आले आहेत. म्हणजे त्यांचे रिलेशन, संबंध हे कोणी तिसरा व्यक्ती ठरवतोय असे नाही वाटत का?
प्रश्न हा नाही की हे शो खरच रिअल आहेत किंवा नाही. हे मनोरंजन असू शकतं. परंतु प्रश्न हा आहे की हे सगळं कश्यासाठी घडवून आणलं जातंय? यातून काय बोध दिला जातोय? यातून कोणते नवीन ट्रेंड्स सुरू होतायेत? यातून तरुणाईच्या मनावर काय बिंबवले जातंय? रिॲलिटी शो मध्ये जे केले जातेय त्याचे अनुकरण समाजात विशेषतः तरुणाईत होत नाहीये का? मोठ्या पडद्यावरील सिनेमांनी लोकांना प्रेम करायला शिकवलं. प्रेम गीत, प्रेम कथा यांना बहार आला. प्रेम एकाच पार्टनर सोबत व्हावं अशी नैतिकता ठेवण्यात आली. एका पार्टनर ला धोका देऊन दुसऱ्याकडे जाणे हा धोका समजला जाऊ लागला (अपवाद लग्न). पण आता जे ट्रेंड्स रिॲलिटी शो मधून सुरू केले जाताहेत त्यामधून बहुसंबंध कसे जोपासायचे हे बिंबवले जातेय. क्षुल्लक कारणावरून ब्रेकअप होणं फॅशन झाली आहे. बोलण्यात इंग्रजी, हिंदी शिव्यांचा असा समावेश झालाय जणू ते भाषिक अलंकार आहेत. गे , लेसबियन नावाच्या नव्या फिलिंग्ज समोर आणून एक संभ्रम अवस्था तयार केली जातेय. दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी आपुलकीने जवळ आले तर त्यांच्याकडे संशयाने पाहिले जातेय आणि हे नकळत घडू लागले आहे. रिॲलिटी शो मध्ये जे दाखवले जातेय, त्याचे प्रतिबिंब आजच्या तरुणाईत उतरत आहे आणि हे प्रतिबिंब स्वच्छ प्रांजळ नसून बेढब, गलिच्छ आणि काळवंडलेले आहे. भारताच्या युवापिढीने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
–कल्पेश जोशी, छ. संभाजीनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा