वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...
#उपरोधीक

    इयत्ता चौथीच्या वर्गात पुर्वी एक कविता होती. 'वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.' कवि दामोदर कारेंची हीच ती कविता. या कवितेने राजकारण्यांवर फारच छाप पाडली असावी का? कारण, एका पक्षातून दुस-या पक्ष्यात नेतेमंडळी अशी काही प्रवेश करतात जणु वा-याची मंद झुळकेने या बागेतून त्या बागेत सहज स्वच्छंद प्रवेश करावा. कधी रणमैदानातील धनुर्धा-याच्या हातातील धनुष्यबाणास स्पर्श करावा, तर कधी गिरीपर्वत गाठून कमलपुष्पास फुलवून संतुष्ट करावे.

      वा-याची मंद झुळूक होऊन जिकडची ओढ लागेल तिकडे स्वच्छंदपणे झुकावे, हव्या त्या पक्षात प्रवेश करावा व ईच्छा झाल्यास पुन्हा बाहेर पडावे. अशीच काहीशी स्थिती राजकिय नेतेमंडळींची झाली आहे. कधी शिवसेनेसोबत, तर कधी भाजपासोबत. कधी रेल्वेचं इंजिनच धरावं, तर कधी बंद घड्याळाच्या काट्यास नाजूक फुंकर घालुन चालते करावे. असा हा त्यांचा बेधूंद प्रवास या कवितेचा त्यांच्या मनावरील पगडा दर्शवतो. पण या त्यांच्या स्वच्छंदी व स्वैरपणाबाबत कवी दामोदर यांनाच जबाबदार धरुया. कवी दामोदरांनी इतकी मनाला भावनारी कविता तरी का लिहावी, की लोक पक्षनिष्ठा सोडून मुक्तपणे पक्षत्याग करतील व स्वैर होतील. म्हणुन या पक्षीय कोलांटउड्या कवी श्री दामोदर कृपेनेच होत आहे, असे कुणी म्हणेल तर ते गैर का ठरावे? कारण या कवितेच्या पार्श्वभूमीवर राजकिय मंडळीच्या मनात 'वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, ओढ घेईल मन त्या पक्षात शिरावे' अशी महत्वकांक्षा फुलवणारी काव्यपंक्तीच जणू तयार झाली आहे.

    अशी ही कवि दामोदरकृत प्रभावी कविता जळगांवी प्रवेश करती झालीय म्हणे. म्हणजे जळगांवातील अनेक राजकिय नेत्यांच्या ती वाचनात आलीय म्हणे. आणि पाहता पाहता या कवितेने छाप पाडलीय ती चक्क ललित कोल्हे यांच्यावर! अहो...आश्चर्य कसलं त्यात? त्याशिवाय काय ललितभाऊ कोल्हे इतके 'स्वैर' झाले आहेत? आता बघा ना... मागच्याच आठवड्यात 'भाऊं'नी म्हणे मनसेची साथ सोडून 'दादां'च्या गोटात प्रवेश केला. 'भाऊं'सारखा धुरंधर नेता आपल्या पक्षात आल्याचा 'दादा' समर्थकांनी असा काही जल्लोष केला, जणु दादांनी निवडणूकच मारली. लाडू पेढ्यांना काही सुमार राहिला नाही. पण झाले उलटेच. जिभेवरुन लाडूची गोड चव उतरत नाही व गुलाबी ढग निवळतही नाही, तोवर गुलालाने भीजलेल्या अंगाने 'भाऊ' गिरीश पर्वतावर हजर!
गोड जीभ आंबट झाली. कवी श्री दामोदर 'भाऊं'वर पुन्हा प्रसन्न झाले. 'भाऊं'ना कवितेने पुन्हा भूरळ पाडली व भाऊ भाजपात प्रवेश करते झाले. यामुळे काही जण दुखावले तर काही सुखावले. पण 'दादां'वर मात्र कुठलाच परिणाम नाही! होणार तरी कसा? कवि श्री दामोदर यापूर्वी 'दादां'इतके कुणावरही प्रसन्न झालेले नाही. तसा ईतिहासच आहे त्यांचा.

     'भाऊ' आता झुळूक होऊन गिरीश पर्वतावरील कमळबागेतील कळ्यांची फुले फुलवणार म्हणे. कमल बागेतील आनंद लुटणार. गिरीश पर्वतावरील सैर करणार. भाऊ तसे रसिक व स्वच्छंदी आहेत हे कुणीही मान्य करेल. तसा भाऊंनी महापौराच्या सिंहासनारुढ होण्याचाही आनंद अनुभवलाय. आता त्यांचं स्वच्छंदी मन त्यांना पुढे कुठे घेऊन जातं, हे सांगता येणं तुर्तास अशक्यच. कारण, वारा असो वा राजकिय नेते, त्यांचा भावी प्रवास सांगणारा देवच म्हणावा. पण मतदारांनी ही कविता न  वाचलेलीच बरी. सानुली मंद झुळूक होऊन जनतेने स्वैर होऊन वाटेल त्याला मत दिले तर पश्चात्तापाचे काळेकुट्ट ढग त्यांच्या डोक्यावरुन कधीही हलणार नाही. तेव्हा कवी श्री दामोदरांची माया राजकारणी लोकांपुरतीच मर्यादीत राहिलेली बरी.

✍🏼कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान