हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान
@कल्पेश गजानन जोशी
हैदराबाद संस्थानात बहुसंख्य जनता हिंदू होती तर राज्य प्रमुख मात्र निजाम हा मुस्लिम होता. निजामाने आपल्या पदरी रझाकार, इत्तेहादूल मुसलमीन, खाकसार, सिद्दीकी, निजामसेना अश्या संघटना बाळगल्या होत्या. या संघटनांना जवळ शस्त्र बाळगण्याचा अधिकार होता आणि निजाम शासनाच्या विरोधात व भारताच्या बाजूने मत व्यक्त करणाऱ्या हिंदूंचा शक्तीबळाचा वापर करून आवाज दाबण्यासाठी या संघटना त्याने पाळून ठेवल्या होत्या. या संघटनांचे प्रमुख अत्यंत टोकाचे धर्मवेडे, हिंदू द्वेष्टे व कट्टर जातीयवादी होते.
निजामाच्या या संघटना हिंदूंना प्रचंड त्रास देत होत्या. हजारो कार्यकर्ते या संघटनेत जोडले गेले होते. बीड जिल्ह्यातील धारूर आणि कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात आर्यसमाज शक्तिशाली झाला होता. आर्य समाजाच्या अनुयायांना निजामाच्या रझाकारांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जाई.
या काळात उदगीर, बसवकल्याण, लातूर, निलंगा, गुंजोटी या ठिकाणचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन आर्य समाजाची स्थापना करीत होते. संस्थानामध्ये उर्वरित भारतातून दीड ते दोन हजार आर्यसमाजी तरुण कार्यकर्ते संस्थानाच्या कानाकोपऱ्यात पठाणी गणवेशात वावरत असत आणि हिंदू समाजामध्ये जनजागृती करत असत. गुंजोटी हे त्या काळातील महत्त्वाचे ठिकाण होते.
या काळात 'इत्तेहादुल मुसलमीन' ही एक कट्टर मुस्लिम जातीयवादी संघटना होती. गुंजोटीत या संघटनेचे मोठे प्राबल्य होते. या संघटनेला उत्तर म्हणून तरुणांची एक फळी गुंजोटी गावात उभी राहिली. गुंजोटी मध्ये इसवी सन १९२७ च्या सुमारास आर्य समाजच्या वतीने श्रीकृष्ण पाठशाळा, श्री कृष्ण वाचनालय आणि व्यायाम शाळेची स्थापना झाली. हिंदू समाजामध्ये सत्संग, व्यायाम, निर्भय वृत्ती आणि शिक्षण यासारखे गुणवैशिष्ट तरुण पिढीच्या अंगी जोपासण्यासाठी गुंजोटी येथील आर्य समाज सातत्याने प्रयत्न करत होता.
'वेद प्रकाश' या सर्व कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घेई. त्याची ख्याती मोठ्या प्रमाणात वाढली होती. तरुणांना एकत्र करणे, व्यायाम करणे आणि त्यांच्यामध्ये वीर वृत्ती जागृत करणे यासाठी वेदप्रकाश सातत्याने प्रयत्न करत असे. वेदप्रकाशचे मूळ नाव दासप्पा शिव बसप्पा हरके होते. त्याचा जन्म १९१७ चा. केवळ २० वर्षाच्या आयुष्यामध्ये या बहादूर तरुणाने हौतात्म्य पत्करून मराठवाडा मुक्तिसंग्रामात आपले बलिदान दिले.
दिनांक २३ फेब्रुवारी चा तो काळा दिवस. त्यादिवशी भाई बन्सीलालजी (आर्य समाज चे पदाधिकारी) गुंजोटी ला येणार होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. आजूबाजूच्या गावातील मोठ्या संख्येने हिंदू समाज व त्या गावातील आर्यसमाज मंडळी गुंजोटी मध्ये "जो बोले सो अभय, वैदिक धर्म की जय" अशा जयघोषाने एकत्रित होत होती.
भाई बन्सीलाल जी यांना घेण्यासाठी वेदप्रकाश सकाळीच उमरग्याला गेला होता. तो सायंकाळपर्यंत तेथेच वाट पाहत बसला. चार वाजेपर्यंत वाट पाहून गुंजोटीला जमलेले बाहेरगावचे आर्यसमाजी लोक व नागरिक आपापल्या गावी परत निघून गेले. त्यानंतर इत्तेहादुल मुसलमीन संघटनेच्या गुंडांनी गावात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. काहीतरी निमित्त करून हिंदू लोकांशी वाद घालू लागले व त्याचे पर्यवसान त्यांनी दंगलीत केले.
वेदप्रकाश भाई बन्सीलालजी आले नाहीत, म्हणून पुन्हा गुंजोटी येथे सायंकाळी परत आला व सरळ आपल्या घरी गेला. घरी जाऊन त्याने जेवण केले. त्याला त्या दिवशी गावात काय घडले याची कल्पना नव्हती. इतक्यात त्याला "वैदिक धर्म की जय" अशा घोषणा ऐकू आल्या. त्यामुळे त्याला असे वाटले की, भाई बन्सीलालजी आले असावे. त्यामूळे आनंदित होऊन तो घराबाहेर गेला. तेव्हा त्याला बाहेर अडीचशे पठाण दिसले. त्यांच्या मनात वेदप्रकाश बद्दल प्रचंड चीड दिसत होती. तो दिवस नाग दिव्याचा सणाचा. दुपारच्या दंगलीमुळे सर्व गाव चिडीचूप झाले होते. बाहेर होते इत्तेहादूलचे धर्मांध गुंड. एकटा निःशस्त्र वेदप्रकाश त्या गिधाडांच्या ताब्यात सापडला. आपल्या परीने त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण २० वर्षाचं पोर, त्याचा हिंस्र जमावासमोर कुठवर निभाव लागणार? त्याच ठिकाणी त्याचे मुंडके धडावेगळे कापून काढले गेले. हैदराबाद संस्थान मुक्ती लढ्यात पहिली आहुती पडली.
त्या रात्री शेकडो गावकरी वेद प्रकाशच्या मृत शरीराभोवती जमले होते. मनात प्रचंड क्रोध व डोळ्यात अश्रू घेऊन गावकऱ्यांनी वेदप्रकाशला निरोप दिला. या घटनेमुळे हिंदू समाजामध्ये निजाम व त्याच्या अतिरेकी संघटनाविरुद्ध असंतोष अधिकच वाढला. भाई बन्सीलालजी व वीरभद्रजी ही तिथे आले होते. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी निजामाच्या अत्याचाराविरुद्ध वेदप्रकाशने बलिदान केले.
तेव्हापासून नागपंचमीला सासरहून गुंजोटी ला माहेरी आलेल्या मुली वेदप्रकाश वरील गीत गातात.
वेदप्रकाश मारीयले।
हे गं कळलं कळलं शहारायात।।
शिर आर्याचं, आर्याचं दारायात।
शिर गवंड्याच्या, गवंड्याच्या दारायात।।
भुईवर पडले रक्ताच्या थारोळ्यात।
पयलाच वीर निजामी सौस्थानात।।
नाही कळालं कळालं नाही देवा।
द्रौपदी म्हणिते हाती सुदर्शन घ्यावा।।
या गीतातून तत्कालीन समाजाची भावना आपल्या लक्षात येते. रात्रीच्या वेळी अचानक वेदप्रकाश ची धर्मांध गुंडांनी हत्या केली होती. त्याचा शोक लोकांना अनावर झाला होता. या घटनेनंतर 'हाती आता सुदर्शन घ्यावा' म्हणजेच आता संघटित होऊन शस्त्र हाती घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे… असा भावार्थच या ओवीतून व्यक्त होतो.
Kavesh37@yahoo.com
संदर्भ-
१) मुक्तीगाथा - मुक्तीदाता लेखक डॉ. पी जी जोशी
२) मराठवाड्याचा इतिहास - डॉ सोमनाथ रोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा