मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा
निजामाची राजवट असलेल्या आणि 1947 ला स्वतंत्र न झालेल्या मराठवाड्यात आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. लोक निजामाच्या सैन्याविरुद्ध आणि रझाकारांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. हाती शस्त्र घेऊन भारताच्या अखंडत्वाचा आणि हैदराबादच्या मुक्तीचा संकल्प करण्यात आला होता. अश्या या क्रांती लढ्यात निजामी राजवट उलथवण्यासाठी धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच अन्य क्रांतिकारकांचे काम पाहून मुक्तिसंग्रामात उडी घेतली होती. त्याचवेळी मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोयगांव येथील लढ्याचा इतिहासही अजरामर झाला.
दगडाबाईंनी 'बंदूक' आणि 'हातगोळे' चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. असे सांगितले जाते की त्यांनी पॅन्ट, शर्ट घालून बंदूकीसह घोड्यावर प्रवासही केला आहे. आपल्या नवऱ्याच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. स्वतःच्या जीवाची शाश्वती नसल्याने त्यांनी पती देवराव यांचा मैनाबाईंशी स्वतःहून दुसरा विवाह लावून दिला होता.
दगडाबाई शेळके यांची स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जाधव यांनी मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये दगडाबाई आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील आठवणी सांगतात. माणिकचंद पहाडे, गुलाबचंद नागोरी, बाबुराव जाधव, डॉ. धामणगावकर, बन्सीलाल काका व आशा ताई आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गदर्शनातून त्यांनी या लढ्यात प्रत्यक्ष काम सुरू केले. सुरुवातीला गावोगावी बैठका घेणं, पत्रक वाटणं, फेऱ्या काढणं, तिरंगे झेंडे लावणं असे काम त्यांनी केले.
एकदा दगडाबाई यांनी आपल्या घरावर आणि वेशीवर तिरंगा झेंडा लावला. त्याची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलीस आले आणि झेंडे काढून घेऊन गेले. दगडाबाई गावाहून परतल्या तेव्हा त्यांना याचा संताप आला व त्या थेट तहसीलदार व पोलीसाला जाब विचारायला चार मैल पायी प्रवास करत निघाल्या. त्यांचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत गावातून नागरिकांचा जमावसुद्धा सोबत निघाला. तेव्हा पोलिसात तक्रार करून त्यांनी जाब विचारला व मोठं आंदोलन घडवून स्वत:च्या घरावरील झेंडा पुन्हा मिळवला.
15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु, तो आनंद हैदराबाद संस्थानातील लोकांना अनुभवता आला नाही. कारण निजाम भारतात हैदराबाद राज्य विलीन करत नव्हता. त्यामुळे हा लढा अधिक तीव्र होऊन सत्याग्रह सुरू झाले. स्वामी 'रामानंद तीर्थ की जय', भारत माता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा दिल्या की पोलीस, रझाकार सत्याग्रहींना पकडून जेल मध्ये टाकत व प्रचंड छळ करत. दगडाबाई यांनी अश्या जेलमधील सत्याग्रहींना गुप्त बातम्या पाठवण्याचेही काम केले. एकदा तर त्यांनी मुरमुऱ्याच्या पिशवीतून सत्याग्रहींना तेजाबच्या बाटल्या पोहचवल्या. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांना संशय निर्माण झाला व वॉरंट काढले गेले. याची चाहूल लागताच दगडाबाई आपल्या गावी पुन्हा जाऊन तिकडेच स्वातंत्र्य सैनिकांसोबत सीमेवरील कॅम्पवर काम करु लागल्या.
या दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना दारुगोळा, बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या तसेच अन्य सामान पोहचवण्यासाठी खूप धाडसी कामे केली. त्यांच्यासोबत ‘कुलकर्णी’ म्हणून अतिशय कमी वयाचा एक कार्यकर्ता होता. त्याचं नाव मुद्दाम 'बुटे खां' ठेवले होते. दगडाबाई सांगतात, की रझाकार सारखा पोशाख घालून तो त्यांच्या गुप्त बातम्या काढून आणी.
दगडाबाई आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकडीबरोबर रझाकार व पोलिसांचे दफ़्तर जाळण्याच्या कारवाया करत होत्या. अश्याच कारवाई दरम्यान काही दफ्तर कोलते टाकळी, गेवराई, मारसावळी, कोलते पिंपळगाव, #सोयगांव आदी ठिकाणी जाळली. सोयगांव येथे झालेल्या कारवाईत बाबुराव काळे व स्वतः दगडाबाई उपस्थित असल्याचं त्या सांगतात. शेंदुर्णीमार्गे सोयगावला येऊन तेथील ठाण्याला त्यांनी आग लावली होती. या ठिकाणी झालेल्या लढाईत श्री राजहंस यांना हौतात्म्य आले होते. असे नानाविध मार्गांनी अलौकिक, धाडसी व पराक्रमी कार्य दगडाबाई शेळके यांनी करून दाखवले होते.
"अनंत भालेराव लिखित मराठवाड्याचा मुक्ती संग्राम या ग्रंथात #सोयगाव ठाण्यावरील हल्ल्याचा हा उल्लेख आढळतो. त्यामधील माहितीनुसार सोयगावच्या सरहद्दीवर #शेंदुर्णी येथे कॅम्प कायम झाला होता. राजहंस त्याच केंद्रावर होते. सोयगाव येथील ठाण्यावर हल्ला करण्याचे ठरल्यावर निवडक 45 सैनिकांनी उत्तर रात्री हल्ला केला. त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा पोलिसांची संख्या खूपच जास्त होती, तरीही सैनिकांच्या माऱ्यासमोर पोलीस टिकले नाहीत. पहिल्या हल्ल्यातच ते घाबरून पळाले. काही पोलीस ठाण्यातच दबा धरून बसले होते. खरे म्हटले तर ठाणे आता जवळ-जवळ ताब्यात आले होते, परंतु सैनिकांच्या ऐनवेळी लक्षात आले की आपल्या जवळचा दारूगोळा सदोष आहे. काडतुसे फुटत नाहीत. याच वेळी ठाण्यात लपलेल्या पोलिसांनी एक हात बॉम्ब बाहेर फेकला. यात फारसे कोणी जखमी झाले नाही, परंतु पोलिसांची गोळी राजहंस यांना लागली व ते जागच्या जागीच मरण पावले. अशा परिस्थितीतही पोलीस ठाण्यापर्यंत सैनिक जाऊन पोहोचले. राजहंस पडले व दारूगोळाने दगा दिला म्हणून पुढे गेलेल्या सैनिकांना मागे बोलवावे लागले. त्यामुळे सकाळी दहा वाजता पोलिसांची जादा कुमक आली व त्यांनी सोयगाव पोलीस ठाण्याचा परत ताबा घेतला. या भागातील हा सर्वात मोठा हल्ला होता असे सांगितले जाते." असा हा अभिमानास्पद लढा आपल्या गावशिवात लढला गेलाय याचा अभिमान वाटतो. इथल्या मातीत देशभक्तांचे रक्त मिसळून ती अधिकच पवित्र झाली आहे.
देशातील सर्वात मोठे असे हे हैदराबाद संस्थान होते. असंख्य देशभक्तांनी आपले बलिदान दिले, कित्येकांनी सजा भोगली, रझाकारांचा अत्याचार सहन केला, परंतु हार पत्करली नाही व भारताचे अखंडत्व अबाधित ठेवले. जर यदा कदाचित हैदराबाद संस्थान मुक्त झाले नसते, तर जम्मू काश्मीरमध्ये जी अशांतता व दहशत आज पाहायला मिळते ती आज सोयगांव परिसर व अजिंठा-सातमाळा डोंगरात धगधगताना दिसली असती. समस्त हिंदू समाजाने एकजुटीने हा लढा लढला. भगवे वस्त्रधारी एक योगी, तपस्वी व्यक्ती स्वामी रामानंद तीर्थ या लढ्याचे नेतृत्व करत होते. सर्व हिंदू समाजाच्या एकीलाच यश आले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यानंतर आले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
भारतमातेच्या चरणी समर्पण व प्राणार्पण करणाऱ्या लक्ष लक्ष स्वातंत्र्य सेनानींना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विनम्र अभिवादन...
- कल्पेश गजानन जोशी (संभाजीनगर)
संपादक, विश्व संवाद केंद्र देवगिरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा