“रावण चांगला होता” म्हणण्याआधी हे वाचा आणि मग विचार करा...
रावण चांगला होता. तो परम शिवभक्त होता. बलशाली, वीणावादक, वेद शास्त्रसंपन्न होता, तो ब्राह्मण होता म्हणून काय तर तो चांगला होता असे अनेकजण बोलता बोलता बोलून जातात. पण रावण किती नीच व्यक्ती होता हे आधी समजून घेतले पाहिजे. त्याला चांगलं म्हणून आपण एकप्रकारे त्याच्या दोषांचे समर्थन करत असतो.
रावणाने ब्रह्मा आणि शिवाकडून वरदान प्राप्त करून घेतल्यावर उन्मत्त झाला आणि केवळ पापकर्मे करू लागला. शत्रूच्या बायका, मुलींना पळवून आणणे आणि त्यांचा बळाने उपभोग घेणे हेच रावणाचे नित्य धोरण होते.
त्याशिवाय ऋषी मुनींच्या तपात विघ्न आणणे, त्यांची हत्या करणे, देवांना त्रास देणे, स्वर्गातील अप्सरांवर अत्याचार करणे हाच जणू राक्षस रावणाचा धर्म झाला होता.
रावणाची काही कुप्रसिद्ध कर्मे:
1. रावणाने पाताळातील भोगवतीपुरी मधील नागराज वासुकी व तक्षकला पराभूत करून त्याच्या पत्नीचे हरण केले होते.
2. कैलास पर्वतावर स्वतःचा भाऊ कुबेर याच्यासोबत युद्ध करून छल कपट करून त्याला पराभूत केले, त्याची सोन्याची लंका हडप केली, त्याच्या राजदुताचीही हत्या केली आणि त्याचे पुष्पक विमानही चोरून आणले.
3. रामायणात खूप ठिकाणी उल्लेख आहे की त्याने ऋषी, मुनी आणि ब्राम्हण हत्या केल्या. निरपराध लोकांच्या हत्या केल्या. मनुष्यवध केले.
4. रावणाचा सावत्र भाऊ कुबेर याचा मुलगा नलकुबेरची होणारी बायको (अप्सरा) रंभा हिच्यासोबत (स्वतःच्या सूनेसोबत) रावणाने वासनांध होऊन तिचा बलात्कार केला.
5. वेदवती ही कुशध्वज या ब्रह्मर्षिंची मुलगी होती. तिला तपश्चर्या करताना पाहून रावणाची वासना बळावली आणि त्याने तिचे तपोभंग करून तिचे केस धरून फरफटत नेले व तिचा छळ केला. रावणाच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि स्वतःला जाळून घेऊन तिने लज्जारक्षण केले.
6. पुञ्जिकस्थला नावाची अप्सरा ब्रह्मदेवाकडे जात असताना रावणाची दृष्टी तिच्यावर पडते. तेव्हा तो तिला बळजबरीने अडवून तिच्यावर बलात्कार करतो. रावण आपल्या दरबारात स्वतः याची कबुली देतो.
7. रावण पतिव्रता देवी सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध अपहरण करून नेतो व तिला आपल्यासोबत रत होण्यासाठी बळजबरी करतो. तसे न केल्यास हत्या करण्याची धमकी देतो.
8. रावणाने स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजेच त्याच्या मेव्हण्याला सुद्धा सोडले नाही. शुर्पणखेने त्याच्या मर्जीच्या विरोधात जाऊन विवाह केला म्हणून रावणाने तिच्या नवऱ्याची विद्युजिन्हची देखिल हत्या केली आणि विधवा शुरपणखेला दंडकारण्य वनात पाठवून दिली.
9. रावण खूप शिवभक्त होता म्हणून त्याची स्तुती केली जाते. पण त्याची शिवभक्ती केवळ वरदान प्राप्तीसाठी होती. कारण त्याला सर्व देवांचा नाश करून राक्षसांचे राज्य स्थापन करायचे होते. कैलास पर्वतावर जाण्यापासून नंदी अडवतो म्हणून त्याच महादेवाच्या कैलास पर्वताला गर्वाने उचलून नेण्याचा प्रयत्न रावण करतो. (त्याला मनात खरंच महादेवाविषयी आदर होता का?)
10. सर्व शक्तिमान होण्यासाठी रावणाने ज्या महादेवाची तपश्चर्या केली त्याच महादेवासोबत युद्धही केलं आणि वरदान मागताना महादेवाची पत्नी देवी पार्वतीलाच मागितलं. इतका नीच होता रावण.
आता विचार करा. रावणाला चांगला म्हणून आपण कोणत्या पापांचे समर्थन करत असतो. रावण चांगला गायक असेल, वीणावादक असेल, शक्तिशाली असेल, वेदशास्त्रसंपन्न असेल पण तो चांगला माणूस किंवा व्यक्ती म्हणून कधीच होऊ शकला नाही. त्याने जंगलात राहणाऱ्या सर्व जीवांना केवळ त्रास दिला, त्यांच्या हत्या केल्या. वनवासी लोकांना त्रास दिला. त्यामुळे राक्षस रावण हा अतिशय नीच, स्त्रीलंपट, बलात्कारी आणि स्त्रीविरोधी होता. रावणाने अनेक स्त्रियांचे अपहरण करून त्यांना बंदिस्त करून ठेवले होते हे रावण स्वतः कबूल करतो. शिवाय त्याची पत्नी मंदोदरी सुद्धा त्याच्या मृत्यूनंतर शोक विलाप करताना हे बोलते. त्यामुळे त्याचे समर्थन म्हणजे त्याच्या सर्व पापकर्माचे समर्थन आहे हे लक्षात घ्या.
खालील संदर्भ अवश्य पहा:
- कल्पेश जोशी
======
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा