‘दी वॅक्सिन वॉर’: जग वाचवणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांची कहाणी



पल्लवी जोशी दिग्दर्शित ‘दी वॅक्सिन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाची फार कुठे चर्चा नाही. शाहरुख खानच्या जवान चा ट्रेण्ड कमी होऊ नये म्हणून केलेली मार्केट स्ट्रेटेजी कदाचित असेल. पण आपल्या कुटुंबासह पाहण्यासारखा कोविड काळातील आपल्या वैज्ञानिकांचे शौर्य, धाडस आणि त्यागाची कहाणी म्हणजे ‘दी वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आहे. 
चित्रपटाची सुरुवात जानेवारी २०२० पासून सुरू होते. जेव्हा चीनमध्ये करोना नामक व्हायरस मुळे लोक मरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारताची सर्वोच्च वैज्ञानिक संस्था काय करत होती? हे यात दाखवले आहे. चीन च्या वुहान स्थित लॅब मधून हा व्हायरस पहिल्यांदा स्प्रेड झाला, त्यामुळे चिनी लोक वेगाने प्राण गमावत होते आणि चीन पूर्ण जगासमोर खोटं बोलत होता हेही दाखवले आहे. 

पण खरी कहाणी सुरू होते, जेव्हा २८ जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला करोना रुग्ण सापडतो तेव्हा. भारताला घाबरवले जात होते की देशात ४०  कोटी मृत्यू होतील, भारत स्मशानभूमी बनेल. भारत कधीच स्वतःची वॅक्सिन करू शकत नाही, WE CAN'T DO IT असा NARRATIVE पसरवला जात असताना ICMR ने केलेली प्लॅनिंग, तेथील प्रमुख अधिकाऱ्याची भूमिका (जी नाना पाटेकर यांनी अप्रतिम निभावली आहे) आणि महिला वैज्ञानिकांचा संघर्ष उत्तमरीत्या दाखवला गेला आहे. 
करोनाच्या भयानक सावटाखाली एक लढाई ICMR लॅब मध्ये सुरू होती आणि दुसरी भारत आणि भारतविरोधी शक्ती यामध्ये सुरू होती. भारतावर विदेशी वॅक्सिन घेण्यासाठी येणारा दबाव, भारताची मिडियात केली जाणारी बदनामी, विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर पसरवले जाणारे भारत विरोधी टूलकिट आणि त्याला मदत करणारी यंत्रणा यांचा अक्षरशः बुरखा फाडला गेलाय. 
या चित्रपटातून मोदी सरकार चे खूप कौतुक होईल, अनेक सक्सेस स्टोरी दाखवल्या जातील, लॉकडाऊन काळातील चित्रण होईल असे वाटू शकते, पण तसे झालेले नाही. राजकीय विरहित पण भारत केंद्रित, वैज्ञानिकांच्या मेहनतीला वाहिलेला हा चित्रपट आहे. करोनासारखं महाभयानक संकट आपल्यावर येऊन गेलं, आपण त्यातून काय शिकलो आणि काय विसरलो याची पुन्हा एक आठवण या चित्रपटाच्या निमित्ताने होते. शिवाय औषध व वैद्यक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय राजकारण, त्या मागील ग्लोबल मार्केट फोर्सेस व त्यांच्या आडून होणाऱ्या मीडिया ट्रायल्स आदी विषयांची यानिमित्ताने जाण होते.
करोनामुळे ज्या लोकांनी आपले जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व जिव्हाळ्याची माणसं गमावली त्यांनी हा चित्रपट अवश्य पाहिला पाहिजे. ICMR मध्ये न झोप घेता, पोटा पाण्याची उसंत न घेता केवळ कर्तव्य निभवणाऱ्या सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या महिलांची यशोगाथा म्हणून हा चित्रपट अवश्य पाहायला हवा. कोविड काळात जेव्हा भारत विरोधी शक्ती भारताला बदनाम करु पाहत होत्या तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत भारताची सत्य बाजू समाजासमोर घेऊन जाणाऱ्या, लोकांना आधार देणाऱ्या, लोकांना भयमुक्त करणाऱ्या, लोकांना सेवा देणाऱ्या प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा. हा केवळ चित्रपट नाही, त्या ज्ञात अज्ञात असंख्य लोकांच्या सत्कार्याची दखल आहे!

- कल्पेश जोशी, छत्रपती संभाजीनगर 
kavesh37@yahoo.com

#TheVaccineWarReview #TheVaccineWar #Covid19India #ICMR

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान