रावणाच्या आडून वर्ग संघर्षाचा डाव!
दसरा जवळ येऊ लागला की काही लोकांचे रावण प्रेम सुरू होते. रावण वाईट आणि मानवता विरोधी कसा होता हे वेगळ्या लेखात मांडतो. पण रावणाने मागील काही वर्षात पुन्हा डोकं का वर काढलं असेल? मागच्या हजारो वर्षात रावण हा सर्व समाजासाठी दुष्ट होता मग आताच त्याच उदात्तीकरण का सुरू झालं? रावणाचा आणि तथाकथित मूलनिवासींचा काय संबंध? याचा सारासार विचार आत्ता करणे अधिक उचित वाटतेय. रावणाच्या उदात्तीकरणामागे डाव्यांचे सुनियोजित षडयंत्र आहे हे समजून घेतले पाहिजे. प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरून प्रश्न उभे करणारे सो कॉल्ड बुद्धिवादी रावणाला का मान्य करत असावे? याचा विचार केला पाहिजे.
आपल्या देशातील कथित बुद्धिवादी, लिबरल गँगने सर्वात अगोदर रामाचे अस्तित्वच अमान्य केले होते. रामायण हे केवळ काल्पनिक काव्य असल्याचे त्यांनी मांडले. परंतु प्रभू राम व रामायण सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर मात्र त्यांचे धाबे दणाणले. ब्रिटिशांच्या फुटीरतावादी नितीवर डाव्यांनी आपली मांड ठोकली आणि येथील गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण, भाषा वाद, प्रांत वाद, वंश वाद आणि आता इतिहासातल्या पात्रांना विविध समाजवर्गाचे प्रतिनिधी स्वरूप उभे करून त्यावरून नवा वर्ग संघर्ष निर्माण करण्याचा कुटील डाव टाकला आहे. राम-रावण विवाद हे त्याचं मोठं उदाहरण.
राम हा हिंदू समाजातील एका विशिष्ट वर्गाचा आणि रावण हा उपेक्षित वंचित घटकाचा आयडॉल तयार करण्यात आला आहे. राम हा गोऱ्यांचा आणि रावण हा कृष्णवर्णीयांचा असे सांगितले जाते. (वर्णभेद) तसे या उपेक्षित, मागास वर्गाच्या मनावर ठसवण्यात येतंय आणि समाजात उभी फूट पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. यामुळे साध्य काय होणार? डाव्यांना ना रामाशी देणंघेणं आहे ना रावणाशी. त्यांना तर भारताच्या इतिहासातले कोणतेच पात्र चालत नाही. त्यांचे देव विदेशी कार्ल मार्क्स आणि लेनिन. पण इथल्या समाजात कशी फूट पाडता येईल , इथे कसे वर्ग संघर्ष उभे करता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
वामन-बळी कथेतील बळी हा काय तर मागास वर्गाचा राजा होता म्हणे. महिषासुर काय तर आदिवासी होता म्हणे. त्याच्या नावाने एक पुस्तक पण प्रकाशित झाले. 2021 मध्ये स्वयंघोषित इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी नाशिकच्या विद्रोही साहित्य संमेलनात नाशिक चे नाव बदलून शुर्पणखा करा, तिनेच नासिक नागरी वसवली आहे असे वक्तव्य केले होते. तत्पूर्वी नाशिक मध्ये शुर्पणखेचे मंदिर सुद्धा बांधून झाले होते. उद्या शुर्पणखाचे तुमच्या आमच्या गावात शुरपणखेची जयंती सुरु झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
ज्या ऐतिहासिक व्यक्ती भारताच्या शत्रू आहेत त्यांना खोटी सहानुभूती देऊन हिरो केल्या जातंय. त्यांचा संबंध आदिवासी समजासोबत लावला जातो. औरंगजेब, टिपूसुद्धा याच पंक्तीतलं उदाहरण. रावणाच्या बाबतीतही तेच घडू लागलंय. रावण दहन केल्याने आमच्या भावना दुखतात असे निवेदने अनेक ठिकाणी दिली जातात. ह्या सर्व असुरांचे संबंध त्या आदिवासी समाजासोबत लावले जातात जे हजारो वर्षापासून सनातन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ज्यांच्या पिढ्यांनी देव, देश आणि धर्माचे रक्षण केले. त्यांचा संबंध असुर, दैत्याशी लावून हा समस्त आदिवासी समाजाचा अवमान केला जात आहे.
रावणाच्या निमित्यानेही काही विघातक शक्तींनी भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवाना टार्गेट केलं आहे. ज्या समाजाला ब्रिटिशांमुळे कधीच मुख्य प्रवाहात येता आलं नाही, ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर जरा कुठे प्रगती करू लागले आहेत. पण आता काही विघातक शक्ती त्यांना आपल्या हातचं बाहुलं बनवू पाहत आहे. रावणाच्या निमित्याने केलेल्या नव्या वर्ग संघर्षाच्या विषयाला आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आदिवासी बांधवाना बळीचा बकरा करत आहेत. रामाला मानणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रविरोधी कामासाठी आपण कधीच सोबत घेऊ शकत नाही याची त्यांना कल्पना आहे, म्हणूनच काल्पनिक कथा उभ्या करुन समाजाला रामापासून म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय तत्वांपासुन दूर नेण्याचा घाट घातला जातोय. याकडे सद्सद्विवेक जागा ठेवून पहावे लागणार आहे. नाहीतर पुढील काळ धोक्याचा आहे. एकाच मातेच्या लेकरांना आपापसात लढवण्यासाठी सुनियोजित षडयंत्र सुरू झाली आहेत.
- कल्पेश जोशी, छत्रपती संभाजीनगर
kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा