संघाच्या भूमिकांचा त्रास कोणाला आणि का?



पू. सरसंघचालक यांच्या मुंबईतील संत रविदास जयंती निमित्त भाषणावरून अनेक उलटसुलट चर्चा काल परवापासून सुरू झाल्या आहेत. खरेतर मोहनजी भागवत यांनी केलेले विधान हिंदू धर्माशी अतिशय पूरक आणि क्रांतिकारी असे आहे. ते म्हणाले जातीव्यवस्था आणि उच्चनीचता धर्माने किंवा देवाने केल्या नाहीत. समाजातील काही पंडित (विद्वान) लोकांनी तसा खोटा प्रचार केला. या विधानात आलेल्या पंडित नावामुळे गोंधळ झाला. परंतु संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल जी आंबेकर यांनी त्याची स्पष्टता करून पंडित म्हणजे विद्वान असा अर्थ अभिप्रेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ब्राम्हण समाजातील संभ्रम दूर झाला. परंतु काही मंडळींनी हा वाद विनाकारण वाढवला आहे. या लोकांमुळे ब्राम्हण समाजाची बदनामी होत आहे. ब्राम्हण समाज संघाविरुद्ध आहे किंवा ब्राम्हण समजाला उच्चनीचता विरुद्ध बोललेले चालत नाही असा (गैर) अर्थ यातून काढला जात आहे. 

वस्तुस्थिती तर अशी आहे की जे लोक संघाला आपली जहागीर समजत होते, ज्यांना समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व मान्य नाही किंवा जे कर्मठ, रूढीवादी आहेत त्यांनाच सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे त्रास झाला आहे. पूज्य सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करणारे ब्राम्हण समाजावर, साधू संतांवर ब्रिगेडी, बामसेफी लोक खालच्या भाषेत टीका करतात तेव्हा मूग गिळून गप्प असतात. निदान याचा तरी विचार केला पाहिजे. 

संघ जसजसा समस्त हिंदू समाजात स्वीकारला जाऊ लागला तसतसा काही जातीय, डाव्या, फुरोगामी संघटनांचे धाबे दणाणले आहे. संत रविदास यांच्या जयंतनिमित्त चर्मकार समाज सरसंघचालकांना त्यांच्या व्यासपीठावर बोलवतो यामुळे अनेक जातीवादी संघटनाच्या पायाखालची जमीन सरकली. काल डाव्या, फुरोगामी गोटात स्मशान शांतता होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी याचे निरीक्षण नक्कीच केले असेल. ही बाजू काही सुज्ञ लोकांनी (पंडितांनी) समजून घेतलीच नाहीये. 

सरसंघचालक मोहन भागवत संघ बदलवत आहे असे हास्यास्पद विधान अनेकजण करतात. त्यांनी संघ किती समजून घेतला हाच मोठा प्रश्न आहे. हिंदुत्व आणि संघ ही आपलीच जहागीर आहे आणि आपण सांगू तसेच ते वागतात असा गोड गैरसमज काही लोकांचा झालेला होता. त्यामुळे जेव्हा संघ म्हणतो हिंदुत्व सर्वसमावेशक आहे, त्यावेळेस यांना धक्का बसतो. जेव्हा संघ समाजातल्या शोषित, वंचित, उपेक्षित घटकात त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन बंधुत्व अंगिकारून काम करू लागतो तेव्हा संघ आमचा राहिला नाही असा गैरसमज त्यांचा होतो. संघाच्या समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व आणि सामाजिक सद्भाव या विषयातील भूमिकांमुळे भविष्यातही असे वादंग निर्माण होतील यात शंका नाही. पण हे वादंग कोण करतंय आणि का, हे समजून घेणे महत्वाचे असणार आहे. 

मागे सरसंघचालक मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात हिंदुत्व सर्वसमावेशक आहे आणि त्यात मुस्लिमांचा ही समावेश होतो असे म्हंटले होते. इस्लाम आणि मुस्लिम यात जमीन अवकाशाचे अंतर आहे. भारतातील सर्व समाज हिंदू असून परकीय इस्लामिक आक्रमकांनी इथल्या हिंदूंना बळाने मुस्लिम केले हे विधान मुस्लिम समाजासमोर इतिहासात पहिल्यांदा होत होते. त्यामुळे इस्लामिक जिहादी आणि कट्टरतावादी गोटात अक्षरशः विस्फोट झाला होता. मोहनजी भागवत यांच्या या वक्तव्यानंतर ही वस्तुस्थिती मुस्लिम समाजाच्या तळागाळातील माणसापर्यंत पोहचली. कायम कट्टरता आणि जिहाद ऐकवल्या जाणाऱ्या कानांना आपला सत्य इतिहास ऐकायला मिळाला ही ऐतिहासीक गोष्ट होती. पण तेव्हाही काही हिंदुत्ववाद्यांनी संघावर संघ सेक्युलर होत चालला आहे अशी टीका केली. त्यामुळे संघाच्या भूमिका नीट समजून घेतल्या तर हिंदुत्वनिष्ठांना त्रास होणार नाही. 

अनेक वर्षापासून वंचित, शोषित, उपेक्षित, भटका, जनजाती समाज आपली मालमत्ता समजत असलेल्या डाव्या, जातीय आणि तथाकथित पुरोगामी गोटाची संघकार्यामुळे झोप उडाली आहे. नुकताच जामनेर येथे बंजारा कुंभ झाला. बंजारा समाज जणू आपली जहागीर आहे असे वाटणाऱ्या लोकांनी त्यांना हिंदुत्वाच्या पवित्र धारेतून तोडण्याचे षडयंत्र आखले होते. परंतु संघाच्या प्रयत्नातून कुंभ झाला. आठ प्रांतातून 15 लाख बंजारा समाज बांधव तिथे येऊन गेले आणि हिंदुत्वाचे अमृत प्राशन करून गेले. त्यामुळे संघाच्या व्यापक भूमिकेमुळे हिंदूविरोधी समाजकंटक लोकांची किती घुसमट झाली हे शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळे अश्या असामाजिक घटकांना संघाविषयी टोकाचा अपप्रचार त्यांना करावा लागत आहे, यातून त्यांची हतबलता लक्षात येते. मिडियात वारंवार होणारा खोडसाळपणा हा त्याचाच एक भाग आहे.  हिंदुत्व मानणाऱ्या संघटनांमध्ये कधी भिडे गुरुजी, कधी सरसंघचालक यांना टार्गेट करून फूट कोण पाडतोय हेसुद्धा पहावे लागणार आहे.

हिंदुत्व हे विशिष्ट घटकाची मालमत्ता समजणाऱ्या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवराय, पूज्य शंकराचार्य  आणि पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी सांगितलेले हिंदुत्व समजून घ्यायला बराच अवधी लागेल. जिथे समरसता नाही तिथे हिंदुत्व नाही. जिथे सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता नाही तिथे हिंदुत्व नाही. हे हिंदुत्वावर भाषण, लिखाण करून दुकान चालवणाऱ्या पंडितांनी  जितक्या लवकर समजून घेतले तितके त्यांचे भले आहे. येणारा काळ हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे ईश्वरी कार्य करणाऱ्या भाग्यवंताला आपल्या संकुचित बेड्या तोडाव्याच लागतील. आपण संघ कार्याला साथ देऊ शकत नसू तर निदान विरोध तरी करायला नको.  संघ जे करेल ते समस्त हिंदू समाजाच्या हिताचे आणि राष्ट्र हिताचेच करेल हीच आपली दृढ श्रद्धा आहे, असायला हवी!

- कल्पेश जोशी, छत्रपती संभाजीनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान