ईडीमुळे 'जनता खुश' अन 'विरोधकांची धुसफूस
'
ईडीच्या कारवाई वरून सध्या रणकंदन माजले आहे. केंद्रीय यंत्रणांवर विरोधकांकडून अनेक आरोप होतायत. त्यात काही नवल नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय यंत्रणा इतक्या बेधडकपणे कारवाई करू लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणांना सरकारने प्रोत्साहन दिले तर त्या आपल्या कर्तव्याला सिद्ध करू शकतात हे यावरून लक्षात येते.
काँग्रेस सरकारच्या काळात 2005 ते 2014 या दहा वर्षाच्या काळात केवळ 112 ईडीचे छापे पडले होते आणि त्यातून 5 हजार कोटींची संपत्ती जप्त झाली होती. परंतु मोदी सरकारच्या काळात ईडीला बूस्टर डोस मिळाला आणि केवळ आठ वर्षात 2,974 छापे ईडीकडून टाकले गेले आणि यामधून तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. विरोधक याला सुडाची कारवाई म्हणतात. परंतु जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांना कोणी रोखले होते का? केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई केवळ राजकीय नेत्यांवरच झालेल्या नाहीत. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदी लोकांचा समावेश आहे. ज्यांनी आर्थिक अफरातफर केली, ज्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आणि ज्यांची गतीविधी देशविरोधी वाटली त्यांच्यावरच कारवाई झाली आहे. विरोधक एक तरी असं उदाहरण सांगू शकतात का की काहीही पुरावे नसताना ईडी ने कारवाई केली म्हणून. केवळ "सूडबुद्धीने कारवाई केली" ही टिमकी सारखी सारखी वाजवून काही उपायोग नाही. सामान्य माणूस भ्रष्ट्राचार्यांना जेलमध्ये जाताना पाहून सुखावत आहे.
समाजात कालपर्यंत असा समज होता की राजकीय नेत्यांचे आपापसात साटेलोटे असते. सत्ता कोणाचीही असली तरी ते एकमेकांना सांभाळून घेतात. त्यात खरे पाहता तथ्य आहेच. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासीयतच जरा वेगळी आहे. त्यांनी "ना खाऊंगा ना खाने दूंगा" अशी घोषणाच करून टाकलीय. स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर सुद्धा त्यांचा वचक आहे. तथापि भाजपच्या नेत्यावर अजून कुठली कारवाई झालेली नाही. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी कितीही प्रामाणिक असले तरी मूर्ख नाहीत. सद्गुण विकृतीला त्यांच्याकडे थारा नाही. आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी कोणीही नेता आपल्या पक्षावर कारवाई करत नाही. ईडीचा जन्म मोदी सरकार मध्ये झालेला नाही. त्यामुळे या अगोदरही युपीए सरकारमध्ये कधी आपल्या पक्षातील किंवा मित्र पक्षातील लोकांवर कारवाई झालेली नाही. भाजप त्याला अपवाद नाही. त्यामुळे मोदींनी अशी काही कारवाई करावी ही अपेक्षा धरणेच मुळात हास्यास्पद आहे. सामान्य माणसाला कोणत्या पक्षावर कारवाई होतेय आणि कोणत्या नेत्याला टार्गेट केले जातेय याच्याशी काही देणंघेणं नसतं. कोणावर का होईना कारवाई होतेय, आणि देशाला लुटणाऱ्याला शासन होतेय यातच त्याचे समाधान व हित सामावलेले असते. त्यामुळे काँग्रेस व विरोधी बागलबच्च्यांनी सूडबुद्धी सूडबुद्धी करत उड्या मारून काही उपयोग नाही.
स्वतःच्या पक्षाचे हितरक्षण सर्वच पक्ष करत आलेले आहेत. मग सत्ता केंद्रात असो की राज्यात. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना राज्यात पोलीस यंत्रणांकडून विरोधी पक्षाची, भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्तेच्या मुजोरीवर शिवसेनेच्या गुंडांनी कित्येक ठिकाणी केवळ सोशल मीडियात विरोधी पोस्ट केली म्हणून संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचे, धमक्या दिल्याचे, मुंडन केल्याचे आणि खोट्या केसेस टाकल्याचे प्रकरण समोर आलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डिंगोरा पिटणाऱ्या लिब्रांडूंचे पितामह शरद पवार यांच्यावर टीका केली म्हणून केतकी चितळे आणि अन्य दोघांना तुरुंगात खितपत पडावे लागले. पोलिसांच्या समक्ष तिच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हात उचलला, फरपट केली, मारहाण केली. आज हेच सगळे ईडीच्या विरोधात बोंबाबोंब करताहेत. म्हणूनच महाराष्ट्राची जनता या दुतोंडी नेत्यांवर अक्षरशः हसतेय.
कोणी कितीही विरोध केला तरी केंद्रीय यंत्रणांनी भ्रष्ट, लुटारू, घोटाळेबाज नेते, पुढारी आणि तथाकथित समाजसेवकांच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. ईडीच्या फेऱ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बेड्या ठोकल्या जाव्या ही सामान्य माणसाची इच्छा आहे. या सर्व कारवायांमध्ये एकाही सामान्य मध्यमवर्गीय माणसाला धक्का पोहचलेला नाहीये. सामान्य माणसाचं रक्त पिऊन जे धनाढ्य झाले आहेत त्यांच्याच मानगुटीवर ईडी बसली आहे. जे राष्ट्रविरोधी काम करत आहेत त्यांच्यावर एनआयए ने फास आवळला आहे आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने ज्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जातेय त्यांना शासन करण्याचा विडा सीबीआयने उचलला आहे. भारताची लोकशाही या यंत्रणामुळे बळकट झाली आहे. सध्या भारतावर 620 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे कर्ज याच लुटारूंकडून वसूल करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला कर्जमुक्त केलं तर त्यात आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नसेल. सामान्य भारतीय नागरिक त्या सुवर्ण क्षणाची वाट बघतोय.
- कल्पेश जोशी, संभाजीनगर
#democrasy #EnforcementDirectorate
#Fraudsters
#antinational
#IndiaSupportsED
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा