मला भावलेलं पहिलं साहित्य संमेलन
गेल्या आठवड्यात नागपुरात समरसता साहित्य संमेलन पार पडले. मीही गेलो होतो. या अगोदर अहमदनगरला 2017 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनलाही मी हजेरी लावली होती. नगरला झालेल्या संमेलनात केवळ अनुभूती घ्यायला गेलो होतो. साहित्य संमेलन म्हणजे काय, हेच जाणून घ्यायचं होतं. त्या अगोदर इतर ठिकाणी काही साहित्य संमेलनासही गेलो होतो. पण त्यामुळे माझ्या मनात साहित्य विश्वाबद्दल एकप्रकारे नकारात्मकता निर्माण झाली होती.
साहित्य संमेलन म्हंटलं की तीच ती रडकी काव्य, अमक्या वरचा अन्याय, तमक्यावरील द्वेष, राजकारण केवळ ह्याच विषयांची जंत्री पाहिली होती. आपण कोणत्या काळात जगतो आहोत हाच विसर जणू पडावा असे निरुत्साही आणि नकारात्मक वातावरण दिसले म्हणजे साहित्य संमेलन अशी भावना होऊन गेली होती.
वशिलेबाजी करून निवडक व विशिष्ट नावं पुढं करायची. सांगायला तोंड वर करून सांगायचं की हे विचारांचं व्यासपीठ, पण विशिष्ट विचाराच्या लोकांनाच तिथे संधी द्यायची. काहींना खड्यासारखे बाजूला काढून फेकायचे अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. पण या वर्षी उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे थोडं समाधान वाटलं होतं. आणि त्यानंतर नागपुरात समरसता साहित्य संमेलन अनुभवलं. कवी, साहित्यिक आणि विचारवंतांच्या साहित्य कृतीची आणि काव्याची खऱ्या अर्थाने मेजवानी अनुभल्यासारखे वाटले.
विविध विचारांची कवी मंडळी, भिन्न भिन्न विषय घेऊन आपल्या कविता सादर करत असताना एक क्षणही उठून जावसं वाटलं नाही. त्यांनी दीन दलितांच्या वेदना मांडल्या, महिलांचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांची उपेक्षा मांडली, देशातले प्रश्न मांडले पण त्याच सोबत विडंबन, विनोदी काव्य, शृंगार, निसर्ग, कुटुंब, पर्यावरण यावरही भाष्य केले. केवळ रडपुराण नाही तर सकारात्मक, ऊर्जा देणारं आणि आरसा दाखवणारं समाजाचं स्वच्छ प्रतिबिंबही दाखवलं.
एरवी साहित्य संमेलन म्हंटलं की प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी कमी आणि बाहेर फिरणाऱ्यांची गर्दी सगळेच अनुभवतात. पण इथे कार्यक्रम सुरू झाल्यावर बाहेर कुणीही दिसत नव्हतं. कवी कट्टा आणि मुख्य सभागृहात सर्व श्रोता रसिक वर्ग उपस्थित होता. माझ्यासाठी हे खरंच आश्चर्य होतं. कवी कट्टा म्हणजे संधी मिळाली म्हणून काहीतरी यमक जुळवून आगपाखड करणारी मंडळी दिसली नाही. महिलांची व तरुण-तरुणींची संख्याही विशेष नोंद घेण्यासारखी होती. एरवी काका आणि आजोबा गटातलेच कवी काय ते सगळीकडे दिसतात. हेही एक आश्चर्यच.
थोडक्यात काय तर.... साहित्य संमेलने सगळीच वाईट नसतात, किंबहुना कोणतेच वाईट नसतात. त्याचा काही लोक राजकीय स्वार्थासाठी आणि अजेंडे रेटण्यासाठी उपयोग करून घेतात म्हणून त्यातली रसिकता आणि उत्साह निघून जातो.
ज्या माणसाचे नाव संमेलनाला दिलेले असते त्याच्याविषयी दोन शब्द कोणाला बोलायला वेळ नसतो. अशी साहित्य संमेलनं पाहिली आहेत. पण नागपुरात जे समरसता साहित्य संमेलन झालं त्यात "आम्हाला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे कळाले" असं म्हणणारे रसिक या संमेलनाच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब करून गेले. एक साहित्यिक म्हणून साहित्य संमेलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथे बदलला एवढंच.
- कल्पेश जोशी, संभाजीनगर
#समरसता_साहित्य_संमेलन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा