आपली संस्कृती विकृतीकडे जाते, तेव्हा आम्ही काय करतो?

*आपल्या संस्कृतीवर कोणी चुकीची टिप्पणी केली म्हणून आम्हाला सहन होत नाही पण, आम्ही कधी 'या' गोष्टींचा विचार करतो का?

👉🏼 'विवाहपद्धती' हा एक धार्मिक विधी आहे, पण आम्ही त्याला 'फॅमिली इव्हेंट' केला की नाही?

👉🏼विवाह विधीपेक्षा आम्ही बँड पार्टी, डीजे, अर्केस्ट्रा त्यासोबतच चमकोगिरी, पैश्याचा माज, चुलत्याची जिरवनं, हौस पूर्ण करणं यालाच महत्व देतो की नाही?

👉🏼लग्न लागताना मुहूर्ताची वेळ टाळून दोन दोन - तीन तीन तास उशिराने लग्न लावतो. का, तर वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या मित्रांच्या इच्छेसाठी. अन पुरोहिताला मात्र शॉर्टकट विधी उरकायला भाग पाडतो. 

👉🏼लग्नात वरमाला घालण्याचं मोठं महत्व सांगितलं आहे. पण, वरमाला घालताना नवरदेवाचे मित्र त्याला खांद्यावर का उचलतात? हा चेष्टा मस्करीचा विषय असतो का? ही फालतुगिरी गपगुमान सहन करणारी उपस्थित पुरोहित, वयस्कर व ज्येष्ठ मंडळी याला जबाबदार आहे की नाही?

👉🏼लग्न विधी होत असताना उपस्थित मंडळी 'वर' आणि 'वधू'ला आशीर्वाद देण्यासाठी आणि ते जे सामाजिक व्रत स्वीकारत आहेत, त्यासाठीचे साक्षीदार असतात. आम्ही खरच अश्या भावनेने लग्नात उपस्थित असतो का? की औपचारिकता पूर्ण करत असतो?

👉🏼नवरीच्या बहिणी, भाऊ नवरदेवाचे बूट लपवण्याचा आटापिटा करतात. त्याच्या बदल्यात पैसे घेऊन आपली वैचारिक दरिद्री दाखवतात. खान कंपनीचे सिनेमे पाहून ह्या विकृती स्वीकारणारे आम्ही दोषी आहोत नाही?

👉🏼मारुतीच्या पारावर घोड्यावर बसून जाणारा नवरीचा भाऊ (सुख्या) पैसे घेतल्याशिवाय घोडा सोडत नाही. ही थेरं आम्ही खुशाल 'रसम' किंवा 'प्रथा' म्हणून स्वीकारली. ही आपली संस्कृती आहे का? आम्ही तर हे कधी रामायण, महाभारत किंवा अगदी अलीकडे शिवरायांच्या चरित्रातही कधी वाचलेलं नाही?

👉🏼पूर्वी नवरीच्या वडिलांकडून मुलीच्या संसारासाठी हातभार म्हणून स्वखुशीने वस्तू किंवा पैश्याच्या स्वरूपात मदत केली जाई. आम्ही त्याचं रूपांतर लग्नाचा 'बस्ता' आणि 'हुंड्या'सारख्या विकृत प्रथेमध्ये केलं. आज मुलीच्या बापावर आत्महत्या करण्याची वेळ आणणारे आम्ही आहोत की नाही दोषी?  

👉🏼 कधीकधी एकाच दिवशी पाच - सहा लग्न लावावी लागतात, म्हणून पुरोहितांना शॉर्टकट लग्न उरकणे भाग पडले. पण एका विशिष्ट जातीची व्यक्तीच पौरोहित्य शिकू शकते असा काही नियम नाही. आपल्या धर्माच्या विधी शिकून पौरोहित्य करण्यासाठी कोणी अडवलं आहे का? आम्ही ती कधी आपली जबाबदारी समजलीच नाही.

😐 ही यादी न संपणारी आहे...

*आपली भारतीय संस्कृती परंपरा महान आहेच. यात काही शंकाच नाही. पण, आमच्या संस्कृतीमध्ये विकृती कोणी जाणीवपूर्वक घुसवली आणि कोणी नकळतपणे स्वीकारली. आमच्या ती लक्षात आली नाही. लक्षात आली तरी आम्ही त्याला विरोध केला नाही. समाजातील सज्जनशक्ती, ज्येष्ठ मंडळी, गाव प्रमुख,  आचार्य, भटजी साऱ्यांचेच समाजाला दिशा देण्यावरून नियंत्रण सुटले. समाज आता विकृतीच्या खाईत जात असताना कुण्या एका व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या नावाने बोटं मोडून चालणार नाही. सर्व समाजाच्या सहभागीतेतून आपल्या परंपरांची शुद्धी आणि संस्कारांची वृद्धी होणं ही काळाची गरज आहे. ती स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही!*

- कल्पेश जोशी, संभाजीनगर
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान