राज ठाकरेंच्या मनासारखं होतंय..!
गेल्या पंधरवाड्यापासून राज ठाकरे आणि मनसे जोरात चर्चेत आहेत. कारण ठरलं मशिदीवरच्या भोंग्याचं. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली जाईल असा पवित्रा राज यांनी घेतला. त्याला पाहता पाहता देशभरातून विविध पक्ष, संघटनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. मुस्लिम समाजाकडून स्वाभाविकपणे विरोध झाला. पण यात गोची शिवसेनेची झाली. तथाकथित पुरोगामी म्हंटले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांचा खोटा सेक्युलरवादी बुरखा पुन्हा फाटला. राज यांना हेच हवे होते. भाजप मात्र राज यांच्या रडार समविचारी असल्यामुळे वरून वाचला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्यापासून मनसेचा हा पहिलाच जोरदार प्रयत्न झाला आहे. मधल्या काळात हिंदुत्वाच्या मुद्दयावर प्रकट होण्यासारख्या बऱ्याच घटना घडल्या, त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. परंतु यावेळी पालिका निवडणुका समोर ठेवून मनसेने चांगली मोर्चा बांधणी केलेली दिसते. त्यातच राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना खूप बारकाईने विचार केला आहे. आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या घोरणापेक्षा वेगळा विचार करण्यात आला आहे. शरद पवार, कथित पुरोगामी संघटना, संभाजी ब्रिगेड, खेडेकर, कोकाटे वगैरे मंडळी यांना राज यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. पुरोगाम्यांचे कथित सेक्युलर धोरणे कसे दुटप्पी आहेत हे सांगून त्यांचे हिंदुत्व विरोधी खरे चेहरे मनसेकडून उघड केले जाताय. त्यामुळे मनसेच्या हिंदुत्वात प्रादेशिक मुद्द्यांना अधिक प्राधान्य असेन हे स्पष्ट झाले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या झालेल्या भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मिरच्या लागल्या आहेत. राज यांनी शरद पवारांचा जातीयवादी चेहरा उघड करून तोफ डागली. हा प्रहार इतका जोरदार झाला की राष्ट्रवादीचे नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी अशी पंचाईत झाली. प्रतिक्रिया द्यावी तर राज ठाकरेंना भाव दिल्यासारखं होतं, नाही द्यावी तर आग होते. अशी अवस्था झाली. त्यामुळे राज यांना इतकं गंभीर्याने घेण्याची काही गरज नाही असं खुद्द शरद पवार बोलले, पण राज यांच्यावर प्रतिक्रिया द्यावीच लागली. आव्हाडांचं तेच झालं. राज ठाकरेला आपण काही भाव देत नाही असं त्यांनी दाखवलं खरं, पण ठाण्यातील सभेतील तोफगोळा आव्हाडांच्या वर्मी बसला. त्यामुळे त्यांचा पुरता तिळपापड झाला. माध्यमांशी बोलताना तो स्पष्ट जाणवत होता. सुप्रिया सुळे यांनी हसत प्रतिक्रिया दिली पण शांत राहणे त्यांनाही जमले नाही. संभाजी ब्रिगेडची अवस्था या सगळ्यांपेक्षा जास्तच अवघड झाली. कारण संभाजी ब्रिगेड पक्ष स्थापन झाल्यापासून आपण कसे राष्ट्रवादी पक्षापासून वेगळे आहोत, आपला आणि शरद पवारांचा काही संबंध नाही, हे दाखवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले होते. मधल्या काळात राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांनी भूमिकाही घेतलेल्या आहेत. परंतु ठाण्यातील भाषणात राज यांनी राष्ट्रवादी आणि ब्रिगेड जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं गृहीत धरून समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंच्या संदर्भात आपली अजूनही आपली भूमिका बदलली नसल्याचं शरद पवारांनी सांगितल्यावर त्यांची वकिली करायला ब्रिगेडकडून जेम्स लेन प्रकरण उकरून काढून पुन्हा जुने कोळसे काळे करण्याचा प्रयत्न झाला. राज यांना हेच तर हवं होतं. मनसेच्या एका कार्यकर्त्याने पुराव्यानिशी पवारांना उत्तर दिले व बाबासाहेब पुरंदरेंच्या जुन्या पत्राचा दाखला देऊन पवारांनाच गोत्यात आणले. त्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ ब्रिगेड धावून आली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
भाजपच्या किरीट सोमय्यांनी तिघाडी सरकारचे एकेक घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा चालूच ठेवलाय. भाजपने ठाकरे सरकारला मोठे हैराण करून सोडले आहे. त्यातच आता राज यांनीही राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. मागील 15 दिवसापासून राज ठाकरे आणि मनसेची माध्यमात चर्चा झाली नाही असा एकही दिवस नाही. हेच मनसेचं यश आहे. मनसेवर संपलेला पक्ष म्हणून टीका होत असली तरी या संपलेल्या पक्षामुळे (?) तिघाडी सरकारची कशी ससेहोलपट होतेय ते सबंध महाराष्ट्र बघतोय. मशिदीच्या भोंग्याबाबत यापूर्वी अलाहाबाद हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट व कर्नाटक हायकोर्ट यांनी टिप्पणी केलीय. अनेक वाद विवाद मागील काळात झालेय. त्यामुळे मनसेच्या या मुद्द्याला न्यायालयातही पाठबळ मिळेल यात शंका नाही. त्यातच राज यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे चा अलटीमेटम दिलाय. त्यावर मुस्लिम कट्टरतावादी संघटना चुकीच्या प्रतिक्रिया देऊन मनसेची एकप्रकारे शक्ती वाढवत आहेत. भाजपचा मनसेला या मुद्द्यावर समर्थन आहेच हे उघड आहे. त्यामुळे सर्व काही मनसेच्या मनासारखं होतंय. मासे आपोआप जाळ्यात अडकताय. आता हा संपलेला पक्ष कोणाला संपवतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
- कल्पेश जोशी, संभाजीनगर
kavesh37@yahoo.com
अचुक टायमिंग कल्पेशजी....
उत्तर द्याहटवा