एक 'सत्तांतर' असेही घडले होते...

"संत्तांतर" 

संपूर्ण जग आज एका घटनेमुळे विचलित झाले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपली हुकूमत प्रस्थापित केली. या घटनेचे पुढील काळात दूरगामी परिणाम पूर्ण जगावर पडणार आहेत. परंतु तालिबान्यांनी केलेले सत्तांतर पाहिल्यावर अजून एक गोष्ट लक्षात येते. असेच एक सत्तांतर 1948 मध्ये भारतातही घडले होते. 'हैद्राबाद' संस्थानचा निजाम हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायला तयार होत नव्हता. त्यामुळे असाच एक संघर्ष झाला होता. परंतु दोन्ही संघर्षामध्ये खूप मोठा फरक आहे. 


तालिबानी ही एकप्रकारे दहशतवादी संघटनाच आहे आणि ते जिहादी कट्टरतावादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. शरियतच्या मार्गाने चालणारे व सर्व जगाला या मार्गावर आणण्यासाठी म्हणून शस्त्र हाती घेतलेल्या दहशतवाद्यांपेक्षा त्यांची वेगळी ओळख नाही. म्हणूनच तालिबानी सत्ता आल्यामुळे आज अफगाणिस्तानमध्ये 90 टक्के लोक मुस्लिम असूनही सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे. 

या दरम्यान तालिबान्यांनी अफगाणी महिलांचे एक सर्वेक्षणच करण्याचा फतवा काढला आहे. जेणेकरून त्या अफगाणी महिलांचा त्यांच्या सैन्यात लिलाव करता येईल. या धाकाने महिला लपून बसल्या आहेत. मानवी अधिकार, स्वातंत्र्य सगळीच गळचेपी होणार म्हणून त्या भेदरल्या आहेत. काबुल शहराच्या मार्केटमध्ये काही दिवसांपासून तर बुरखे व हिजाब घेण्यासाठी तुफान गर्दी उसळल्याचे वृत्त समोर आले आहे. तालिबानी आणि अफगाणि नागरिक तसे दोघेही इस्लामचे अनुयायी. तरीही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. महिलांचे स्वातंत्र्य हनन जात आहे, असा रक्तरंजीत संघर्ष सुरू आहे!!

असेच एक सत्तांतर कधीकाळी भारतात झाले आहे. तालिबान्यांच्या तुलनेत ते फार वेगळे आहे. भारतात जेव्हा हैद्राबाद संस्थान ताब्यात घेण्यासाठी पोलीस कारवाई करण्यात आली तेव्हा या प्रदेशातील लोक आनंदोत्सव साजरी करत होते. भारताची कमान तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल सांभाळत होते, तर शत्रू पक्षात निजाम व त्याच्या जिहादी संघटना इत्तेहादुल मुसलमान व रझाकार होते.  निजामाची सत्ता सुद्धा जिहादी व कट्टरतावादी विचारांवर चालणारीच होती. या विचारांच्या विरोधात जाणाऱ्यांना शासन करण्यासाठी त्याने रझाकार पाळून ठेवले होते. परंतु भारताच्या शूर जवानांपुढे चारच दिवसात निजामाला शरणागती पत्करावी लागली होती.

हैदराबाद प्रकरणात, तसा धर्माचा विचार केला तर आक्रमण करणारा "हिंदू" आणि शत्रूस्थानी "मुस्लिम" असा हा "हिंदू-मुस्लिम" संघर्ष म्हणण्याला वाव आहे. परंतु हे काही धार्मिक आक्रमण नव्हते. लोकशाही मार्गाने घडलेली ही घटना होती. या सत्तांतरात भारतीय सेनेकडून एकही निरपराध मुस्लिम अथवा हिंदू व्यक्तीला हानी पोहचवल्याची घटना नाही. भारताची (धर्माने हिंदू असलेल्या सत्ताधारी) सेना आपल्यावर चालून येते आहे असे कोण्या मुसलमानाला वाटले नाही. आपला बादशहा पराभूत होतोय हे लक्षात येऊनही कोणी घरदार सोडून सैरावैरा पळाले नाही, की विमानांच्या छपरावर चढले नाही. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात आता आपल्याला रहावे लागेल म्हणून कोणा मुस्लिम महिलेला आपले मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणून भीतीदेखील वाटली नाही. 

याचं कारण काय?? 

एकीकडे तालिबानी मुस्लिम असतानाही अफगाणी नागरिक, महिला, बालके भयकंपित होतात. जिवाच्या आकांताने सैरावैरा धावतात. दुसऱ्या देशात शरण म्हणून जातात. परंतु हैद्राबादच्या विलीनीकरणात मात्र असे काहीही घडत नाही.? 

याचे कारण एकच... 
"जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्करमिर्ती वाढो, भुता परस्परे जडो, मैत्र जीवांचे" असा उदात्त विशाल हृदयी सर्व जगाच्या कल्याणाचा विचार करणारा हिंदू धर्माचा गाभा आहे! म्हणून कोणीही भयभीत होत नाही. कोणाला चिंता वाटत नाही. कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात नाही आणि कोणाच्या अधिकाराची गळचेपी होत नाही. उलट सर्वात सुखी व सुरक्षित आपण कोठे आहो, तर या भारत भूमीतच आहोत असा विश्वास साऱ्यांना वाटतो. म्हणून वैश्विक शांततेला भंग करणारा विध्वंसक विचार जर जगाची डोकेदुखी ठरत असेल, तर जगाच्या कल्याणाचा विचार करणारा आणि "वसुधैव कुटुंबकम" चा संस्कार जोपासणारा भारतच जगाला योग्य दिशा देऊ शकतो.

- कल्पेश गजानन जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान