बंगालमध्ये केंद्राने तात्काळ राष्ट्रपती राजवट का लावली नाही?


बंगालमध्ये मोदी सरकार राष्ट्रपती राजवट का लावत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावणं ही काही साधीसुधी बाब नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसने जरूर कलम 356 चा सरसकट वापर केला असेल, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. त्यामुळे घाई करून चालणार नाही. केंद्राचे धोरण समजून घेतले पाहिजे.



बंगाल मधील आपल्या कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाट वाहत असताना, सामान्य नागरिक टाहो फोडत असताना मोदी सरकारला यातना होत नसतील, असे नाही. मोदी कितीही संयमित असले तरी भावुक आहेत. पण आततायीपणा त्यांच्या अंगी नाही. शिवाय अमित शहा सोबतीला आहेतच. त्यांच्या इतका राजकीय चाणाक्ष व्यक्ती आजच्या घडीला कोणी नाही. परिस्थिती कशीही असो, डोकं शांत ठेऊन रणनीती आखणारी ही माणसं आहेत. त्यामुळे त्यांनी बंगालला वाऱ्यावर सोडलं किंवा ममताला माफ केलं असं अजिबात म्हणता येणार नाही. बंगाल निवडणुकांचा निकाल लागल्यापासून अमित शाह गायब आहेत. गृह मंत्रालयाच्या बातम्याशिवाय अमित शाह या महिनाभरात विशेष कुठे उमटून पडलेले नाहीत. आणि जेव्हा हे गायब होतात तेव्हा नक्की काहीतरी मोठं करतात हा इतिहास आहे.

बंगालमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई केली नाही ते अतिशय योग्य केले. जर त्यांनी तसे केले असते तर ते चुकले असते आणि ही चूक खूप महागात पडली असती. त्यांचा हा निर्णय न्यायालयातही दुबळा पडला असता. विरोधकांनी रान उठवलं असतं. शिवाय नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारला बडतर्फ करणं अयोग्य ठरलं असतं. त्यामुळे केंद्राने ही चूक केली नाही.

आता महिना उलटून गेला आहे. मधल्या काळात बऱ्याच उलाढाली झाल्या आहेत. अनेक डावपेच शिजले आहेत. बंगाल बाहेरून शांत वाटत असले तरी तसे नाहीये. तेथील असंतोष अजूनही खदखदतोय. जेव्हा कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिसच मुकदर्शक झाले होते, तेव्हा नाविलाजने का होईना पण तेथील नागरिकांनी प्रतिकार करायला सुरुवात केली होती. विशेषतः हिंदूंनी संघटित होऊन प्रतिकार करण्यास सुरुवात केल्याच्या काही वार्ता येत होत्या. 50 ते 60 गावं केवळ हिंदू समाज संघटित झाला म्हणून दंगेखोरांपासून वाचवली गेली आहेत. त्यामुळे बंगालमध्ये सद्य स्थितीत ज्या एका मोठ्या वर्गाने अन्याय अत्याचार सहन केला त्यांच्या मनात भीती, दहशत व असंतोषाचे वातावरण आहेच, आणि ममताच्या गुंडांचा व कट्टरतावाद्यांचा माजुरडेपणा गेलेला नाही. ते पुन्हा डोके वर काढतील. त्यामुळे पुढील काळ बंगाल वाटते तितके शांत राहील असे नाही.

भाऊ तोरसेकर राष्ट्रपती राजवट संदर्भात म्हणतात, "अर्णब गोस्वामीचे प्रकरण जुने नाही. अर्णबला मुंबई पोलिसांनी अटक केली होती तेव्हा लोक हेच म्हणत होते की मोदी सरकार काय करतंय? अर्णब ला वाचवत का नाही. आजची परिस्थिती काय आहे? आज अर्णब बाहेर आहे आणि त्याला पकडणारा वाझे आत आहे. त्यामुळे राजकारणात काही गोष्टींची घाई करून चालत नाही. ममता सरकारला जर मस्तवालपणा आला असेल, तर ममताचा 'वाझे' व्हायला वेळ लागणार नाही. केंद्राच्या विरोधात जाऊन मस्ती दाखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चेहरे पहा..." केंद्र काय करू शकते व कसे करते हे दाखवण्याचा प्रयत्न भाऊंनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांचे यश त्यांच्या विजयात होते. भाजपाने इतकी ताकद लावूनही त्यांचा विजय झाला यात सगळे आले होते. परंतु द्वेषबुद्धीने त्यांनी जो रक्तपात घडवून आणला ती खूप मोठी चूक केली आहे. ममता बॅनर्जीना ज्या मतदाराने  डावलले होते त्यांचे मन जिंकायला पुढील काळात त्यांच्याकडे संधी होती. परंतु त्यांनी तसे न करता चुकीचा मार्ग निवडला. हा मार्ग त्यांना खाईत ढकलणारा ठरणार यात शंका नाही.

- कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान