बंगालमध्ये हिंसेची धग कायम... पुढे काय होणार?
-- कल्पेश जोशी
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या राजकीय - जातीय हिंसाचाराची धग अजूनही कायम असून बंगाली हिंदू दहशतीच्या वातावरणात जगत आहे. या हिंसाचारात दीड महिन्यात आतापर्यंत 34 जणांच्या हत्या झाल्याचे सांगितले जात असून या मृतांमध्ये सर्वजण भाजपा, संघ, एबीव्हीपी कार्यकर्ता आणि सामान्य बंगाली हिंदू नागरिक आहेत ज्यांनी भाजपाला समर्थन केले होते. बंगाल मध्ये जे घडवले जात आहे, ते जाणीवपूर्वक सुनियोजित पद्धतीने होत असून एक विशिष्ट वर्ग युद्धे लक्ष्य केला जात आहे, त्यामुळे पूर्ण बंगालमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे.
मागील पंधरा दिवसात घडलेल्या काही घटना पाहता परिस्थिती किती भयानक व लोकशाहीविरोधी झाली आहे, हे आपल्या लक्षात येईल.
◾ एका 60 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर तिच्या सहा वर्षाच्या नातवासमोर बलात्कार करण्यात आला तसेच, एका अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत न्याय मागितला आहे. भाजपसाठी काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे पीडितेने सांगितले.
◾ 5 जून रोजी भाटपाडा येथील भाजप कार्यकर्ता जे. पी. यादव याच्या डोक्यातच टीएमसीच्या गुंडांनी बॉम्ब मारून फेकला व त्याची हत्या केली.
◾ एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यक्ती समूहावर बहिष्कार टाकणं समाजविरोधी आणि संविधानविरोधी आहे. परंतु बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर , पदाधिकाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टीएमसी कडून टाकला जात आहे. अश्या प्रकारच्या धमक्या टीएमसीचे स्थानिक नेते जागोजागी देत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना किराणा दुकान, गिरणी, मॉल, सलून अश्या प्रकारच्या सर्व ठिकाणी बहिष्कृत केले जात आहे, अन्यथा त्यांनाच हिंसेला सामोरे जावे लागते. अशी भीषण परिस्थिती आहे.
◾ राजगंज येथे भाजप खासदार जयंता रॉय यांच्यावर टीएमसीच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला, ज्यात त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. जे लोक जीव वाचवून घरदार सोडून पळून गेले होते त्यांच्या पुनर्वसनासाठी जयंता रॉय गेले होते, त्यांना समजावत होते, त्यांना सुरक्षेची हमी देत होते तेव्हा हा हल्ला करण्यात आला.
◾ टीएमसी पुरस्कृत या हिंसाचारामुळे इतकी दहशत पसरली आहे की जवळपास 300 हुन अधिक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून टीएमसीत प्रवेश केला आहे. परंतु एवढ्यावर त्यांची शिक्षा संपत नाही तर त्यांना गल्लीगल्लीत जाऊन लोकांची माफी मागायला लावले जात आहे की "आम्ही भाजपमध्ये चुकून गेलो, आम्हाला माफ करा". लाभपूर, बोलपूर, सेंथिया, धनियाखली इ. गावात तर बिरभूम आणि हुगली जिल्ह्यातील या घटना समोर आल्या आहेत. भाजप आमदार आणि नेते पक्ष सोडून टीएमसीत का जात आहे, याचे हे कारण आहे.
◾कांठी येथील महिला मोर्चाची अध्यक्षा असलेली भाजप पदाधिकारी रेखा मैती या महिलेवरसुद्धा टीएमसीच्या गुंडांनी व जिहादी तत्त्वांनी जीवघेणा हल्ला केला. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
◾ कोलकाता येथील बालीगंज मध्ये 11 जून रोजी जिहादी कट्टरतावाद्यानी देवीच्या मंदिरावर हल्ला करून मूर्ती भग्न केली आणि हिंदू वस्तीवर दगडफेक करून जातीय हल्ला केला. 24 परगणा, उत्तर 24 परगणा, हावडा अश्या जिल्ह्यातही अश्या घटना घडल्या.
◾ अयोध्येतील राम मंदिरासाठी बंगाल मधील एक युवक सुबोध कुमार याने 800 किमी अंतर सायकलवर जाऊन बंगालमधील माती नेली होती. परंतु आज टीएमसी चे गुंड त्याला इतके परेशान करत आहेत की त्याने मुख्यमंत्री ममता बनर्जींना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
बंगालमध्ये मागील पंधरा दिवसात घडलेल्या या काही प्रमुख घटना आहेत. अश्या शेकडो घटना दररोज तिथे घडत आहेत. परंतु त्यांना वाचा फोडणारी (स्थानिक) मिडियासुद्धा ममता दिदीच्या ताटाखालचं मांजर झालं आहे, व बाकीच्यांची (राष्ट्रीय मीडिया) ग्राउंड रिपोर्ट करण्याची हिम्मत होत नाहीये. महिलांना टार्गेट करणे हे जिहादी मानसिकतेचे लक्षण इथे पुरेपुर दिसते. याचे समर्थन करणारे विविध राजकीय पक्ष तेवढेच दोषी आहेत. तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि स्वयंघोषित लोकशाहीचे जागले शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसले आहेत. त्यामुळे भारतातल्या एका राज्यात लोकशाही आणि संविधान गुंडाळून ठेऊन गुंडाराज सुरू असताना केंद्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय कारवाई कधी करणार याकडे बंगाली समाज व पूर्ण भारत आशा लावून बसलेला आहे.
मागील दीड महिन्यापासून बंगालमध्ये सर्वत्र 'रक्ताचे पाट' वाहताय आणि अब्रू वाचवण्यासाठी, जिवाच्या आकांताने 'किंकाळ्या' उठत आहे. पोलीस प्रशासन मुकदर्शक आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर म्हणतात की बंगाल मध्ये असे काही घडतच नाहीये. राज्य सरकारने न्यायालयात याचा पुनरुच्चार केला आहे. त्याला जोड देऊन टीएमसी कार्यकर्ते, जिहादी, कट्टरतावादीसुद्धा तोच प्रपोगंडा सोशल मीडियात चालवत आहेत, की बंगालची बदनामी केली जातेय. बंगाल शांत आहे. बंगालमध्ये हिंसा झालीच नाही, असे खोटेनाटे वातावरण तयार केले जातेय. परंतु इतकं मोठं खोटं न टिकणारं आणि विश्वास न बसणारं आहे. बंगालमधील ज्या घटना समोर येत आहेत त्यांचे पुरावे, तक्रारी स्वतः राज्यपालांनी लोकांना भेटून ऐकल्या व पाहिल्या आहेत. एवढेच काय तर महिला आयोग, मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती व जमाती आयोग, बालहक्क आयोग या आयोगांनी आपापल्या अधिकाऱ्यांना पाठवून तेथील अहवाल गोळा केले आहेत व ते राष्ट्रपती व न्यायालय यांना सादर केले आहेत. त्यामुळे ममता दिदी हे खोटं रेटून नेऊ शकत नाही.
बंगालमध्ये होणार हिंसाचार, हिंदू नरसंहार आणि महिला अत्याचार पाहता देशभरातून ममता सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागावे हीसुद्धा जनतेची इच्छा आहे. बंगाल जर नवे जम्मू काश्मीर होऊ पाहत असेल तर त्वरित कठोर निर्णय करून ते रोखले पाहिजे ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची भावना आहे. अन्यथा उद्या ममता सरकारचे अनुकरण इतर राज्यातसुद्धा होईल व आतापर्यंत संविधानिक शासन प्रणालीची जी गरिमा राखली गेली आहे ती गळून पडेल. आजच बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड दिल्लीला तीन दिवसांच्या प्रवासात रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन बंगाल हिंसाचार संदर्भात अतिशय महत्वपूर्ण चर्चा होईल. या चर्चेतून काय निष्पन्न होणार हे लवकरच समोर येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा