महाड: चवदार तळे आंदोलन दिवस/ भाग १


भाग १ - २० मार्च, १९२७

@कल्पेश जोशी

   २० मार्च १९२७ हा भारताच्या सामाजिक - सांस्कृतिक इतिहासातील अतिशय क्रांतिकारी दिवस. याच दिवशी महाड येथील चवदार तळ्यातील पाणी अस्पृश्य हिंदूंसाठी खुले व्हावे म्हणून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्यातील पाणी प्राशन केले आणि घोषणा केली की आजपासून ज्या चवदार तळ्यातील पाणी सर्व स्पृश्य हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान व जनावरे पीत होती तेच पाणी आता अस्पृश्य गणल्या गेलेल्या सर्व समुदायालाही वापरता येईल. केवळ पाणी मिळावं म्हणून हे आंदोलन नव्हतं. याला सामाजिक किनार होती. हिंदू समाजात जातीभेदाच्या विकृतीमुळे हिंदू धर्मासह राष्ट्राचे जे नुकसान होत होते, ते पाहून बाबासाहेबांना अतीव वेदना होत. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य समाजाला जागृत करायला सुरुवात केली होती. स्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गातही अनेक समाज सुधारकांनी , पुढाऱ्यांनी सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे प्रयत्न हे वरवर वाटावे असे होते. सनातन्यांच्या दबावापोटी त्यांना अस्पृश्यता मुक्तीसाठी यशस्वीपणे मोहीम उघडता आली नाही. याला अपवाद होते फक्त स्वा. सावरकर.

   चवदार तळे सत्याग्रह म्हणजे पू. बाबासाहेबांच्या पुढील आभाळाएव्हढ्या कार्याची सुरुवात होती. या काळात सामाजिक चळवळीत डॉ. भीमराव आंबेडकर हे नाव नावारूपास येत होते. हीच अवस्था अस्पृश्यता निवारण चळवळीची होती. बाबासाहेबांच्या कार्याबरोबरच तिचीही रेघ मोठी होत होती. स्पृश्य हिंदूंना जबर धक्का दिला गेला तो याच काळात. चवदार तळे आंदोलन आणि मनुस्मृती दहन करून. परंतु हे कार्य करत असताना त्यांचा मनोभाव काय होता हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. डॉ. आंबेडकर जणूकाही स्पृश्य हिंदूंच्या किंवा ब्राह्मणांच्या द्वेषाने पेटून उठले होते असे वर्णन आजकाल केले जाते. ते किती चुकीचे आहे हे बाबासाहेब अभ्यासल्या शिवाय कळत नाही. 

   सीताराम केशव बोले यांनी मुंबई विधिमंडळात संमत करून घेतलेला ठराव ह्या बंडाचे तात्कालिक कारण ठरला होता. महाड नगरपालिकेने आपल्या अधिकार कक्षेतील चवदार तळे त्या ठरावानुसार अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते. परंतु स्पृश्य हिंदूंच्या भीतीपोटी तेथील अस्पृश्य त्या तलावातील पाण्यास स्पर्श करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे डॉ. आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून चळवळ करण्याचा निश्चय करून १९ व २० मार्च या दोन दिवशी बहिष्कृत परिषद भरवण्याचे जाहीर केले. अस्पृश्यता हा आपल्या हिंदू समाजाला लागलेला रोग आहे याची जाणीव असल्यामुळे अनेक स्पृश्य मंडळी या परिषदेत उपस्थित होती. या परिषदेत महाडमधील बापूराव जोशी, घरीया, तुळजाराम मिठादी असे स्पृश्य पुढारीही सहभागी झाले होते. सीतारामपंत शिवतरकर, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव चित्रे, भा.कृ. गायकवाड, बाळाराम आंबेडकर, राजभोज, शांताराम अ. उपश्याम, रामचंद्र मोरे, रामचंद्र शिर्के व अस्पृश्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

   पू. बाबासाहेबांनी या परिषदेत भाषण केले. आपल्या भाषणात बालपणीच्या कटू आठवणी व यातना सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. अस्पृश्य समाजाला ब्रिटिशांनी आपल्या सैन्यात घेणे कमी केले होते, त्याविरोधात असलेली बंदी उठवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले. अस्पृश्य समाजात जुन्या, खुळचट विचारांचा जो गंज चढला आहे तो धुवून निघाला पाहिजे व आचार, विचार व उच्चार ह्यांची शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात प्रगतीचे बीज कधीच रोवले जाणार नाही असे नमूद केले. आपापसातील उच्च निच्च भावना सोडून द्या. वडिलांची 'री' ओढणे हा मंत्र सोडा. जुनं ते सोनं म्हणत राहिलो तर सुधारणा होणार नाहीत असे सांगून आपल्याच बांधवांचे त्यांनी यावेळी कान टोचले. 

   स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांनीही जळजळीत भाषणे केली.  बापूराव जोशी म्हणाले, अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे. तो धुवून निघण्यासाठी प्रत्येक हिंदूने एका पायावर उभे राहिले पाहिजे. परंतु ठराव पारित व्हायची वेळ आल्यावर 'सांप्रत जनमत यासाठी तयार नाही' असे लक्षात येताच या स्पृश्य मंडळींना मात्र माघार घ्यावी लागली. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असे तर वाटत होते, पण स्वधर्माच्या विरुद्ध बंड करायला कोणी तयार नव्हतं. जमलेल्या अस्पृश्य मंडळींवर त्याचा काही परिणाम झाला नाही. पू. बाबासाहेबांनी सर्व सोपस्कार पार पाडल्यावर 'कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट आहे' असे सांगून चवदार तळ्यातील जल प्राशन केले व तळे अस्पृश्यांसाठीही आता खुले झाले असे सांगितले. या प्रत्यक्ष कार्यक्रमाचे वर्णन आपल्याला आजपर्यंत वाचायला ऐकायला मिळाले आहेत. अतिशय भावपूर्ण आवेशात, उत्साहात हे आंदोलन पार पडले. या दिवसानंतर पू. बाबासाहेबांच्या कीर्तीच्या लाटा एकामागून एक सर्व देशभर पसरत गेल्या. 

   चवदार तळ्यातील पाणी मुसलमान पीत होते, ख्रिश्चन वापरत होते, एवढेच काय तर गुरे जनावरे कुत्री सुद्धा पीत असत. पण ते तळे कधी बाटले नव्हते. हिंदूंसाठी फक्त आपल्याच दुर्लक्षित, वंचित व उपेक्षित  असलेल्या अस्पृश्य भावाच्या स्पर्शाने तळ्यातील पाणी अपवित्र होणार होते. हिंदू समाजाच्या याच नकारात्मक गोष्टींचा फायदा घेऊन ख्रिश्चन - मुसलमान धर्मांतरे करत होती तरीही स्पृश्य हिंदू समाज या धोकादायक बेड्या तोडायला तयार नव्हता हे पाहून बाबासाहेब दुःखी कष्टी होत. स्पृश्य हिंदूंनी जे कार्य करायला हवं होतं ते बाबासाहेबांच्या प्रयत्नांतून झाले म्हणून तरी त्यांचे कोणी आभार मानले असतील का? तर इतकीही सद्बुद्धी त्या स्पृश्य हिंदूंना सुचली नाही. उलट आपल्या गावातील तळे बाटवले तसे विरेश्वराचे मंदिरही बाटवणार, म्हणून स्पृश्य हिंदूंनी जमलेल्या अस्पृश्य समुदायाला ठिकठिकाणी गाठून मारहाण केली. चोखामेळा, रोहिदास चांभार ह्या संतांना साक्षात दर्शन देणारा, कबिरासारख्या मुसलमानाकडे शेले विणणारा, तो देव खरंच बाटणार होता का? क्रिया प्रतिक्रियेच्या या धुमश्चक्रीतुन दंगल तेवढी उसळली. चवदार तळ्यातील पाण्याचं ऋण अस्पृश्यांना आपलं रक्त देऊन मिटवावं लागलं होतं. 

   या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात उमटले. स्पृश्यांनी अस्पृश्यांवर केलेल्या या हल्ल्यामुळे अस्पृश्यता निवारण चळवळ अधिक त्वेषाने सुरू झाली. महाड येथे झेललेल्या प्रत्येक वेदनेतून, सांडलेल्या रक्ताच्या थेंबातून एक एक कार्यकर्ता निर्माण झाला. देशभरात जागोजागी निषेध सभा झाल्या. पुरोगामी चळवळीतले अनेक नेते पुढारी आता मात्र पुढे येऊन भाषणं ठोकू लागले. 'ब्राम्हण-ब्राह्मणेतर' पाक्षिकाचे संपादक देवराव नाईक व प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करून निषेध नोंदवला. 

   परंतु या सर्व प्रकरणात अस्पृश्यांची बाजू मनोभावे घेतली असेल तर ती वीर सावरकरांनी. त्यांनी 'श्रद्धानंद' मधून स्पष्टपणे घोषित केले की "आपल्या धर्म बांधवांना निष्कारण पशुहूनही अस्पृश्य लेखणे हा मनुष्यजातीचाच नव्हे तर आपल्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय. तुला अन्याय आणि आत्मघातकी रुढीचे आपद्धर्म म्हणून नव्हे, तर धर्म म्हणून, लाभकारक म्हणून नव्हे तर न्याय म्हणून, उपकारक म्हणून नव्हे तर माणुसकीची सेवा म्हणून, हिंदूंनी निर्दालन केले पाहिजे. आपल्या धर्माच्या नि रक्ताच्या हिंदु मनुष्याच्या स्पर्शाने पाणी बाटते आणि ते पशूचे मूत्र शिंपले की शुद्ध होते, ही भावना अधिक तिरस्करणीय आहे.' आंबेडकरांचा झगडा न्यायचा आहे असे घोषित करून , त्यांनी त्याला मनःपूर्वक पाठिंबा दिला. मात्र धर्मांतर करून हा प्रश्न सुटणार नाही असेही ते सांगायला विसरले नाहीत. 

संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक : धनंजय कीर

- कल्पेश जोशी, सोयगांव
Kavesh37@yahoo.com

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#चवदार_तळे_सत्याग्रह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान