श्रीधरपंत आणि बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांचे फार चांगले संबंध होते. 

श्रीधरपंत आंबेडकरांचे स्नेही व चाहते होते. त्यांची मते पुरोगामी होती. परंतु आपली सुधारणावादी मते कृतीत आणणारे श्रीधरपंत अल्पायुषी ठरले. बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक विषयांना, आंदोलनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. स्पृश्य हिंदूं आणि अस्पृश्य हिंदू यांच्यात समेट घडवून आणू शकतील असा एक दुवाच हरपला होता. 
मृत्यूस कवटाळण्यापूर्वी श्रीधरपंतांनी काही तास अगोदर डॉ. आंबेडकरांना पत्र पाठवून कळवले की, "हे पत्र आपल्या हाती पडण्याअगोदर बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल. महाराष्ट्रीय तरुणांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतल्यास अवघ्या पाच वर्षात हा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.  

"माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी घालण्याकरीता मी पुढे जात आहे." असे त्यांनी म्हंटले होते.  आंबेडकरांच्या अंगीकृत कार्यात परमेश्वर त्यांना यश देईल असा भरवसाही त्यांनी व्यक्त केला होता. 

आपल्या सोबत तरुणांमध्ये हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी पुढाकार घेणाऱ्या या निर्भीड कार्यकर्त्यांची अशी शोक वाणी ऐकून बाबासाहेब खूपच दुखावले.  हे पत्र वाचल्यानंतर पू. बाबासाहेबांच्या डोळ्यातील असवांच्या धारा थांबायला तयार नव्हत्या. आपल्या चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता व आधार गेल्यामुळे ते हळहळत असत. असा उल्लेख धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथात आला आहे. 

श्रीधरपंत यांच्याविषयी विकिपीडियावर थोडी माहिती शोधली ती अशी. ‘जातीयता शक्य तितक्या लवकर नष्ट व्हावी’ हे आणि अशाप्रकारचे विचार ते पुन्हापुन्हा आपल्या लेखांमधून मांडत होते. पुढे चालून ‘ज्ञानप्रकाश‘, ‘विविधवृत्त‘ यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी बरेच लेखन केले. 

१९२५ नंतर श्रीधरपंत आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लो. टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर साहेबांना ( आंबेडकरांना ) भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत.

श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तर्‍हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन त्यांनी पार पाडले, पण हटले नाहीत. 

तथापि या संयमी, पुरोगामी व निर्भीड व्यक्तिमत्वाच्या  श्रीधरपंतांनी २५ मे १९२८ रोजी भांबुर्डा येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली जीव दिला. 

कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. '... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'दुनिया' या साप्ताहिक मधे श्रीधरपंत यांच्या विषयी लिहिले की, केवळ टिळकांचा मुलगा म्हणून नाही तर एक भारदस्त लेखक म्हणून श्रीधर टिळकांना केसरीमधे स्थान दिले गेले पाहिजे होते." टिळक घराण्यातील कोणाला लोकमान्य ही पदवी खरी शोभत असेल तर ते म्हणजे श्रीधरपंत टिळक."

- कल्पेश जोशी 
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान