महाड: चवदार तळे सत्याग्रह/ भाग २


(२५ व २६ डिसेंबर, १९२७)

@कल्पेश जोशी 

    महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे." त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत." अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला. 

    पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. जेधे-जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी महाड सत्याग्रहाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे कळवले. मात्र या सत्याग्रहात ब्राह्मण जातीतील लोकांना सहभागी करू नये असे त्यांनी सुचवले. त्यावर  बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया फारच महत्वाची आहे. बाबासाहेब यांनी प्रत्युत्तरात सांगितले की, आमच्या अस्पृश्यता चळवळीतून ब्राम्हण कार्यकर्ते बाहेर काढावे हे आम्हाला मान्य नाही. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत, ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. आमच्या सत्याग्रहात कोणत्याही व्यक्तीस सहभागी होण्यास मोकळीक आहे. मग ती कोणत्याही जातीतील असो. हे भांडण तत्वांसाठी आहे. कुठल्या जातीशी किंवा व्यक्तीशी नाही. आमच्या पवित्र कार्यात जे साहाय्य करण्यास पुढे येतील त्यांचे आम्ही आभार मानू." एका विशिष्ट वर्गाच्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांसाठी पू. बाबासाहेबांचं हा विचार आजही लागू पडतो. पू. बाबासाहेबांचे हे मौलिक विचार सगळ्यांनीच समजून घेतले तर किती बरे होईल. 

     सत्याग्रहासाठी २५ आणि २६ डिसेंबर १९२७ हे दोन दिवस निश्चित केले होते.  महाड नगरपालिकेने आपला अस्पृश्यांसाठी तळे खुले करण्याचा पूर्वीचा ठराव मागे घेतल्यामुळे या सत्याग्रहाला अधिकच धार प्राप्त झाली. बाबासाहेबांनी सत्याग्रहाची तात्त्विक बाजू मांडून या सत्याग्रहाची भूमिका व महत्व सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. "जिथे लोकसंग्रह आहे, तिथे सत्कार्य आहे ही विचारसरणी आमची आहे व आम्ही ती गीतेवरून घेतली आहे. सत्याग्रहच गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. गीता हे भगवंताने दिलेले उत्तर आहे. गीता ग्रंथाचा आधार देण्याचे कारण म्हणजे गीता हा ग्रंथ जसा स्पृश्य हिंदूंना मान्य आहे तसा अस्पृश्यांना ही मान्य आहे." असे सांगून त्यांनी च्या चळवळीचा उद्देश लोकसंग्रह आहे असेही स्पष्ट केले. 

     पू. बाबासाहेबांनी याच वेळी सत्याग्रह, दुराग्रह, हिंसा व अहिंसा या तत्वांविषयी जे विचार प्रकट केले आहेत ते मनन करण्यासारखे आहेत. स्पृश्य हिंदूंना अप्रत्यक्ष इशारा देत पू. बाबासाहेब हा सत्याग्रह अपयशी ठरला तर अस्पृश्य लोक परधर्मातही जाऊ शकतात असा संभाव्य धोका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतात. या तत्व विवेचनात धर्मशास्त्राचे महत्व आणि देशभक्तीची तळमळ स्पष्टपणे लक्षात येते. बाबासाहेबांचे यातून थेट मानवतेलाच आव्हान आहे. पू. बाबासाहेबांनी मांडलेले हे विचार लेखक धनंजय किरांनी विस्ताराने मांडले आहेत ते जिज्ञासूंनी जरूर वाचले पाहिजे. 

     याच काळातली अजून एक बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांचा बाबासाहेबांसोबत विशेष परिचय झाला होता. ते आंबेडकरांचे स्नेही व चाहते होते. त्यांची मते पुरोगामी होती. आपली सुधारणावादी मते कृतीत आणणारे श्रीधरपंत अल्पायुषी ठरले. मृत्यूस कवटाळण्यापूर्वी त्यांनी काही तास अगोदर डॉ. आंबेडकरांना पत्र पाठवून कळवले की, "हे पत्र आपल्या हाती पडण्याअगोदर बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल. महाराष्ट्रीय तरुणांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतल्यास अवघ्या पाच वर्षात हा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त करून ते पुढे लिहतात, "माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी घालण्याकरीता मी पुढे जात आहे." आंबेडकरांच्या अंगीकृत कार्यात परमेश्वर त्यांना यश देईल असा भरवसाही त्यांनी व्यक्त केला होता. हे पत्र वाचल्यानंतर पू. बाबासाहेबांच्या डोळ्यातील असवांच्या धारा थांबायला तयार नव्हत्या. आपल्या चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता व आधार गेल्यामुळे ते हळहळत असत. 

     'चवदार तळे' प्रकरण न्यायालयात गेले. न्यायाधीश वैद्य यांनी आज्ञापत्र काढले की, "न्यायालयाचे दुसरे आज्ञापत्र येईपर्यंत कोण्याही अस्पृश्य व्यक्तीने तलावावर जाऊ नये. हर एक प्रकारे सत्याग्रह कसा अडवता येईल असा विरोधकांकडून प्रयत्न चालू होते. ब्रिटिश सरकार व सनातनी महाडला मोर्चे लावून बसले होते. जिल्हाधिकारी सत्याग्रहींना परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. सव्वा तीन हजार सत्याग्रहींना 'हर हर महादेव', 'महाड सत्याग्रह की जय', 'बाबासाहेब आंबेडकर की जय' अश्या घोषणा देऊन बाबासाहेबांचे महाडमध्ये स्वागत केले. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी सौम्य शब्दात बंदी आज्ञा न मोडण्याविषयी बाबासाहेबांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. "सत्याग्रह कराच असा जमलेल्या लोकांना मी सल्ला देईन परंतु त्यांच्यावर दडपण आणणार नाही. बहुमताने सत्याग्रह करणे ठरले तर जिल्हाधिकारी यांस बोलण्याची संधी देऊ, असे त्यांनी मान्य केले. 

      सभेत भाषण करताना बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर कसा अन्याय होत आहे हे मांडून चवदार तळ्याच्या पाण्यावरील आपलाही अधिकार असल्याचे सांगितले. पण त्याहूनही त्यांनी जो मौलिक विचार मांडला तो म्हणजे , "आमची ही सभा हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे" असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे पू. बाबासाहेब म्हणतात, "अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून वेगळा नाही. म्हणून मी म्हणतो की आपले हे कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच राष्ट्रहिताचे आहे, यात शंका नाही." तथापि सर्व भेदाभेदांना कारणीभूत म्हणून मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर रोजी करण्यात आले. मनुस्मृती चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील चारही वर्णांना काही उपदेश व नियम सांगते. परंतु उच्च वर्णीय लोक त्याचे सोयीनुसार पालन करतात आणि कनिष्ठ वर्गातील लोकांनी मात्र त्याचे तंतोतंत पालन करावे अशी त्यांची इच्छा असते असे सांगून अन्याय, विषमता व निर्दयतेच्या प्रतिकास त्या दिवशी मूठमाती देण्यात आली. अस्पृश्यांच्या दारिद्र्याकडे, दुःखाकडे स्पृश्य हिंदूंचे लक्ष वाढावे यासाठी आम्ही ते दिव्य केले असे पू. बाबासाहेब यांनी त्र्यं. वि. पर्वते यांना सांगितले आहे. यात कोणाविषयी वैर भावना किंवा द्वेष नव्हता.

     न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असल्यामुळे आपण जिद्दीला पेटून सत्याग्रह केलाच तर अपयश येईल, शिवाय सरकारचा रोष ओढवून घेतला जाईल. यामुळे भावी काळात मोठे नुकसान होईल हे बाबासाहेबांना ठाऊक होते. परंतु जमलेले अनुयायी प्रचंड उत्साहात व आवेशात होते. मागे हटायला कोणी तयार नव्हते. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांनी अनुयायांना समजावले व सांगितले की आपल्यात निश्चयाचे बळ नव्हते त्याची उणीव तुम्ही भरून काढली आहे. तुमची सगळे शूर आहात. तुमच्या शक्तीचा विपर्यास होऊ नये असे मला वाटत आहे. सत्याग्रह तहकूब केला तर मानखंडना होईल असे मानण्याचे कारण नाही. आज सत्याग्रह थांबवण्याचे जरी मी सांगत असलो तरी तळे काबीज करण्यासाठी तुम्ही जसे उत्सुक आहात तसा मीही उतावीळ आहे. तो संकल्प तडीस नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही."

     सत्याग्रह तहकूब झाल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. परंतु लवकरच सर्वजण सावरले. रात्री झालेल्या परिषदेतील भाषणाचा मात्र अनुयायांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना आपली जीवन पद्धती सुधारण्यासाठी उपदेश केला. फाटके लुगडे का असेना पण ते स्वच्छ असायला हवे. घर स्वच्छ ठेवा. प्रतिज्ञा करा की असे कलंकित जीवन यापुढे जगणार नाही, असा संकल्प करा. घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ देऊ नका. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद करा. दारुबाज नवऱ्यांना, भावांना अगर मुलांना जेवायला घालू नका. मुलींना शिक्षण द्या. 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा' अशी महत्वाकांक्षा ठेऊन जगा. पुढच्या दिवशी पहाटे स्त्रियांनी आपापल्या गावी जाते वेळी आपली वेशभूषा आपल्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे पालटली होती. ते दृश्य पाहून बाबासाहेब गहिवरले. लोकांना आश्चर्य वाटले. पू. बाबासाहेबांच्या युगवाणीचा तो प्रताप होता. 

     २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे जे आंदोलन केले ते बंड स्वरूपाचे होते. महाड नगरपालिकेने सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी तळे खुले आहे असा ठराव पारित केला असतानाही काही स्पृश्य हिंदूंच्या भीतीपोटी अस्पृश्य लोक तळ्यातील पाण्याला शिवायला तयार नव्हते. पालिकेचा ठराव काहीही असला तरी महाडच्या सनातन्यांची तशी इच्छा नव्हती. म्हणून बाबासाहेबांना ते आंदोलन करावे लागले. परंतु या आंदोलनानंतर सनातन्यांनी जी दंगल पेटवली व जमलेल्या अस्पृश्य अनुयायांना ठिकठिकाणी गाठून मारहाण केली त्याची प्रतिक्रिया म्हणून तसेच पालिकेने आपला पूर्वीचा ठराव मागे घेतला म्हणून २५ व २६ डिसेंबर १९२७ या दिवशी सत्याग्रह केला आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी धनंजय कीर यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासाला पाहिजे. 

संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक : धनंजय कीर

- कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान