मोदींचा सत्याग्रह: 'एक वाक्य' अनेक अर्थ



पाकिस्तानच्या विरोधात आज आहे त्यापेक्षा कैकपटीने जास्त राग 70 च्या दशकात भारतीयांच्या मनात खदखदत होता. आणि बांग्लादेश-पाकिस्तान युद्धामुळे भारताला कुटनीती करून पाकिस्तानचा तुकडा पाडायची अनोखी संधी चालून आली होती.


त्यावेळी जनसंघ म्हणजे चा आजचा भाजप फारच छोटा पक्ष होता. काँग्रेसची चलती होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. नेहरूंपासून काँग्रेसने आम्ही कसे शांततेचे कैवारी आहोत अशी जागतिक स्तरावर नेहमीच भूमिका घेतली होती. तिबेटच्या वेळी जशी तत्कालीन काँग्रेस सरकारने माती खाल्ली तशी बांग्लादेश निर्मितीत खाऊ नये म्हणून जनसंघाच्या वतीने दिल्लीत सत्याग्रह आंदोलन सुरू होते...एकप्रकारे इंदिरा गांधी सरकारवर दबाव आणला जात होता की बांग्लादेशच्या समर्थनात उतरून पाकिस्तानचा तुकडा पाडा. भविष्यात हाच देश आपला चांगला मित्र म्हणून पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करताना मदतीस येईल. असे अनेक उद्देश्य ही त्यामागे होते. अटल बिहारी वाजपेयी हजारोंच्या सभेला संबोधित करत असल्याचे कात्रण खाली जोडले आहे. त्यावरून लक्षात येईल. 
बांग्लादेश सरकारने बांग्लादेश मुक्तीसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या जागतिक नेत्यांबद्दल Bangladesh Liberation War Honour मध्ये  गौरव केला आहे. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. ऑगस्ट 1971 मध्ये जनसंघाच्या वतीने 2 लाख कार्यकर्त्यांच्या सहभागीतेत दिल्लीत संसदेसमोर जी प्रचंड मोठी रॅली काढली होती, त्यामुळे भारत सरकारवर दबाव वाढला व आम्हाला सहकार्य मिळाले अश्या आशयाचे शब्दांकन केले आहे. 
याचं रॅलीमध्ये नरेंद्र मोदीही सहभागी होते असे स्वतः नरेंद्र मोदी यांनी काल बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करताना सांगितले. त्यावर अनेकजण आश्चर्य व्यक्त करताहेत. परंतु आज भाजपमध्ये विविध पदावर असलेले अनेक नेते त्यावेळी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी असतील यात शंका नाही. "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" यासारखा प्रपोगंडा करून तत्कालीन जनसंघाला स्वत:ची प्रसिद्धी करता आली नाही ही त्यांची चूकच झाली. किंबहुना काँग्रेसच्या काळात तितकेसे शक्य ही नव्हते. आज ते बांग्लादेशच्या माध्यमातून जरी समोर येत असले तरी ते मान्य करण्याइतपत विवेकबुद्धी शाबूत असायला हवी. 
मोदींनी बांग्लादेश मुक्ती संदर्भातील त्यांच्या जीवनातील हा प्रसंग पहिल्यांदाच बोलून दाखवला आहे. त्यातही त्यांनी केवळ आपल्या त्यावेळच्या सत्याग्रहात असलेल्या उपस्थितीबद्दलच काय ते सांगितले आहे. एखाद्या निवडणुकीच्या तोंडावर कोणी असे दावे करत असेल तर त्यावर शंका घ्यायला जागा असते. मोदींना बांग्लादेशमध्ये निवडणूक लढवायची नाहीये, त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांचे हे विधान स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नसून भारताने  बांग्लादेशसाठी काय केले आहे हे जगाला कळावे म्हणून महत्वाचे आहे. त्यांच्या एका वक्तव्यावरून इतिहासाची पाने 50 वर्ष मागे जाऊन उलगडली जाऊ लागली आहे व त्यावरून ते सिद्ध झाले आहे. 
मोदी जेव्हा बांग्लादेशमध्ये गेले तेव्हा तेथील कट्टरतावादी मुस्लिम संघटनांनी बांगलादेशात विरोध प्रदर्शने केली. हे विरोध प्रदर्शन कोणत्या कारणामुळे झाले हे वेगळे सांगायला नको. परंतु मोदींच्या एका वक्तव्यामुळे बांग्लादेश मध्ये शेखी मिरवणाऱ्या आणि भारत विरोधी कृत्ये करणाऱ्या अश्या तमाम लोकांना 'आमच्या (भारताच्या) उपकारामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात हे लक्षात ठेवा' असा अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. हा टोला जसा बांग्लादेशातील कट्टरतावादी लोकांना आहे तसा पाकिस्तान मधील फुटीरतावादी लोकांना आणि इमरान खान सरकारलाही आहे. ज्या लोकांनी 70 च्या दशकात विरोधी पक्षात असताना बांग्लादेश वेगळा करण्यात भूमिका निभावली त्याच लोकांचे आज भारतात सरकार आहे... बलुचिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान, सिंध, पंजाब वेगळे करणे फार अवघड नाही... हे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या ध्यानात आणून दिले आहे. पाकिस्तानला ते कळले ही असेल. फक्त वैचारिक गुलामीत जगत असलेल्या काही भारतीयांना ते इतक्यात कळेल असे वाटत नाही. पण सत्याग्रह (सत्याचा आग्रह) करण्यात आपल्याला आनंदच आहे. 

- कल्पेश जोशी , सोयगांव 
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान