ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सडेतोड भूमिका घेतात



महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे." 

त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत." 

अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला. 

पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. 

बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 

जेधे-जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी महाड सत्याग्रहाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे कळवले. मात्र या सत्याग्रहात ब्राह्मण जातीतील लोकांना सहभागी करू नये असे त्यांनी सुचवले. त्यावर  बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया फारच महत्वाची आहे. 

बाबासाहेब यांनी प्रत्युत्तरात सांगितले की, "आमच्या अस्पृश्यता चळवळीतून ब्राम्हण कार्यकर्ते बाहेर काढावे हे आम्हाला मान्य नाही. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत, ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. आमच्या सत्याग्रहात कोणत्याही व्यक्तीस सहभागी होण्यास मोकळीक आहे. मग ती कोणत्याही जातीतील असो. हे भांडण तत्वांसाठी आहे. कुठल्या जातीशी किंवा व्यक्तीशी नाही. आमच्या पवित्र कार्यात जे साहाय्य करण्यास पुढे येतील त्यांचे आम्ही आभार मानू." 

एका विशिष्ट वर्गाच्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांसाठी पू. बाबासाहेबांचं हा विचार आजही लागू पडतो. पू. बाबासाहेबांचे हे मौलिक विचार सगळ्यांनीच समजून घेतले तर किती बरे होईल. 

संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक धनंजय कीर, पृष्ठ क्र. १०१

- समाजबिंदू

#सामाजिक_सबलीकरणदिन 
#सामाजिक_समता #समरसता 
#DrBabasahebAmbedkar 
#socialequality

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान