जेव्हा स्वा. सावरकर स्वतः बाबासाहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात...


'चवदार तळे सत्याग्रह' याविषयी कोणी ऐकले किंवा वाचले नसेल अशी क्वचितच कोणी सापडू शकेल. विषमतेच्या पू. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील  क्रांतिकारी आंदोलन म्हणून याची ओळख आहे.

परंतु या आंदोलनानंतर तळे बाटवले म्हणून महाड येथील स्पृश्य हिंदूंनी ठिकठिकाणी गाठून अस्पृश्यांना मारहाण केली व याचे पर्यवसान दंगलीत झाले. अनेकजण जखमी झाले. पू. बाबासाहेबांना यामुळे खूप दुःख झाले. 

या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात उमटले. स्पृश्यांनी अस्पृश्यांवर केलेल्या या हल्ल्यामुळे अस्पृश्यता निवारण चळवळ अधिक त्वेषाने सुरू झाली. पुरोगामी चळवळीतले अनेक नेते पुढारी आता पुढे येऊन भाषणं ठोकू लागले होते. 'ब्राम्हण-ब्राह्मणेतर' पाक्षिकाचे संपादक देवराव नाईक व प्रबोधनकार ठाकरे यांनीही प्रक्षोभक भाषण करून निषेध नोंदवला. 

परंतु या सर्व प्रकरणात अस्पृश्यांची बाजू मनोभावे घेतली असेल तर ती वीर सावरकरांनी. 

स्वा. सावरकरांनी  'श्रद्धानंद' मधून स्पष्टपणे घोषित केले की "आपल्या धर्म बांधवांना निष्कारण पशुहूनही अस्पृश्य लेखणे हा मनुष्यजातीचाच नव्हे तर आपल्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय. त्याचे अन्याय आणि आत्मघातकी रुढीचे आपद्धर्म म्हणून नव्हे, तर धर्म म्हणून, लाभकारक म्हणून नव्हे तर न्याय म्हणून, उपकारक म्हणून नव्हे तर माणुसकीची सेवा म्हणून, हिंदूंनी निर्दालन केले पाहिजे. 

आपल्या धर्माच्या नि रक्ताच्या हिंदु मनुष्याच्या स्पर्शाने पाणी बाटते आणि ते पशूचे मूत्र शिंपले की शुद्ध होते, ही भावना अधिक तिरस्करणीय आहे.' असे त्यांनी म्हंटले. तसेच आंबेडकरांचा झगडा न्यायाचा आहे असे घोषित करून , त्यांनी त्याला मनःपूर्वक पाठिंबा दिला. मात्र धर्मांतर करून हा प्रश्न सुटणार नाही असेही ते सांगायला विसरले नाहीत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात्मक ग्रंथाचे लेखक धनंजय कीर यांनी वीर सावरकरांचा आवर्जून उल्लेख केला आहे. 

अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असे अनेक स्पृश्य हिंदूंना वाटत होते, परंतु त्यासाठी बंड करण्याची व सनातन्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. वीर सावरकर स्वतः ब्राम्हण असून सनातन्यांना समजावून व प्रसंगी विरोध झुगारून अस्पृश्यता विरोधी कार्य करत होते.  

पू. बाबासाहेब आणि स्वा. सावरकर या दोघे राष्ट्रभक्तांना शत शत नमन..!

- कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान