राष्ट्र निर्माणाचे 'शुभसंकेत'



@कल्पेश जोशी 

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आणि देशात एकूणच जी चैतन्याची लाट उसळली आहे, त्यामुळे भारत पुन्हा विश्वगुरुपदी विराजमान होणार असा विश्वास जनभावनेतून दिसू लागला आहे. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने लोक प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिर निर्माणसाठी खारीचा वाटा उचलत आहे. परंतु या सगळ्यात एक वर्ग असाही आहे, ज्यांना मोठं दुःख झालेलं दिसून येतंय.

रामायणात एक प्रसंग आहे, सेतू निर्मितीचा. लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या मदतीला पशु, पक्षी, प्राणी, मानव सारेच धावून आले. रावणाच्या गुप्तहेरने ही वार्ता रावणाला सांगितली तेव्हा त्याचा विश्वासच बसेना. रावण म्हणतो अरे ते दोन भटके जीव जंगलातले प्राणी, अप्रशिक्षित लोक या रावणाला युद्धात हरवण्यासाठी सेतू बांधून येताहेत..? असं म्हणत मोठ्याने हसून आपल्याच गुप्तहेराला रावण वेड्यात काढतो. परंतु सत्याचा आणि धर्माचा विजय होण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या मदतीला खारूताईसुद्धा आपला वाटा उचलत होती. अखेर सेतू पूर्ण होऊन रामसेना लंकेत दाखल झाली. अहंकारी रावण हे पचवून घ्यायलाच तयार नव्हता. जेव्हा अंगद रामसंदेश घेऊन जातो तेव्हा रावणाला रामसेनेच्या शक्तीचा अंदाज होतो. परंतु आपण रामाला इथपर्यंत येऊ दिलं, हनुमंताचं ऐकलं नाही... आता तडजोड केली जर आपली छि थ्थू होईल. लोक हसतील की रामाला पराक्रमी रावण घाबरला. पण काही जण सामंजस्याने रामाकडे आपला अहंकार सोडून आली, त्यातलं मोठं उदाहरण बिभीषण. काहींना आपल्या तत्वाशी राक्षस कुळाशी द्रोह होईल, आपली सत्ता, संपत्ती, पद जाईल म्हणून रावणाला समजावून पाहिलं पण रामाश्रय घेतला नाही त्यातलं उदाहरण म्हणजे कुंभकर्ण. 

राममंदिर म्हणजेच, राष्ट्रमंदिर निर्माण होत असताना आपल्याला असेच काहीसे चित्र दिसून येईल. सर्व समाज मंदिर निर्माण अभियानात सहभागी झालेला आपल्याला दिसून येईल. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, गुजरात पासून पूर्वांचलपर्यंत सर्व देश राष्ट्रमंदिर उभारण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे. काही जण समयदान करताना दिसत आहेत. ही सर्व रामसेना सर्व समाजापर्यंत संपर्क करून एकेक व्यक्तीला या महाभियानात जोडत आहे. रामसेतूच्या वेळी असाच काहीसा प्रसंग होता. समाजातील काही रावणरूपी लोक ज्यांना राम मंदिरासाठी मा. न्यायालय निर्णय देईल असे वाटतच नव्हते. परंतु तो सुवर्ण दिवस उजाडला आणि मंदिर निर्माण कार्य सुरू झाले. मंदिराचे भूमिपूजन मा. पंतप्रधानांनी केले तेव्हा काही स्वतःला पुरोगामी व बुद्धिवादी म्हणवणाऱ्या मंडळीला दुःख झाले होते. त्यांना देशातील गरीबी, हॉस्पिटलची आवश्यकता वगैरे वगैरे साक्षात्कार होऊ लागले होते.  परंतु समाजाने त्यांच्या या विचारांना थारा दिला नाही. 

मंदिर निर्माण कार्य सुरू झाल्यामुळे नाराज झालेल्या या मंडळीला समाजातील काही सज्जन लोकांनी रामकार्य किती विशाल, सर्व समावेशक व राष्ट्रीय कार्य आहे हे समजावून सांगितले, पण ऐकेल तो रावण कसला आणि अहंकार नसेल तो पुरोगामी कसला? निधी संकलन अभियान सुरू होतंय तरीही अनासायास उपद्रवी बडबड या मंडळींची चालू आहे. राम मंदिर बांधताय म्हणजे बांधतील एखादे साधेसुधे मोठे मंदिर, असे त्यांना वाटले असावे. परंतु राम मंदिराची राष्ट्रीय कल्पना, सर्वांना सहभागी करणारे अभियान आणि भारतातीलच नव्हे तर जगातील सांस्कृतिक केंद्र म्हणून अयोध्या नगरी तयार होऊ पाहत असताना पुरोगाम्यांचे डोळे माथ्यावर गेले आहेत. एवढेच काय तर राम मंदिरासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पुरोगामी व डाव्यांचा आजपर्यंत भांडवल म्हणून वापरण्यात आलेला समाजघटकसुद्धा  सहभागी होताना पाहून त्यांच्या पोटात गोळा उठणार नाही असे कसे होईल? 

ज्या मुस्लिम समाजाचा आजपर्यंत वापर करून आपले स्वार्थ साधून घेतले गेले, दलित, वंचित, शोषित वर्गाला खोटेनाटे सांगून भडकवले गेले, ज्या वनवासी बांधवांना आपण हिंदू नाहीच, राम आपला पूर्वज नाही तर रावण आहे, असे सांगून भ्रमित केले गेले, असा सर्व समाज घटक रामासाठी फुल न फुलांची पाकळी देऊन आपण रावणाला मानणारे, अधर्माला साथ देणारे नसून आम्ही राष्ट्रीय प्रवाहातच आहोत, आमची बाजू ही धर्माची बाजू आहे, सत्याची व न्यायाची आहे असे दाखवून दिले आहे. त्यामुळे देशातील स्वतःला पुरोगामी म्हणवणारा वर्ग चवताळलेल्या अवस्थेत आहे. ज्या लोकांच्या भरवश्यावर आपली रोजी रोटी चालत होती, तेच जर रामकार्यात स्वतःला वाहवून घेऊ लागले तर समाज तोडण्याचे, जातीपातीत दुभंग करण्याचे आणि देश तोडण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार या विचाराने ते हैराण झाले आहेत. 

रामसेना लंकेत डेरेदाखल होताच रावणाचा जळफळाट झाला होणं हा त्याच्या पराभवाचा संकेत होता,  त्यामुळे राष्ट्रमंदीर निर्माण कार्य पाहून रामद्वेष्ट्यांची झालेली उग्र अवस्था म्हणजे राष्ट्र निर्माणाचा 'शुभसंकेत'च मानायला हवा. या पवित्र कार्यात अनेक सज्जन सामंजस्याने राम कार्यात स्वतःहून बिभीषणाप्रमाणे सहभागी होत आहे. काही जणांची इच्छा तर आहे, पण कुंभकर्नाप्रमाणे  येऊ शकत नाहीत. रावणाने आपल्या पित्याचेही ऐकले नव्हते. परंतु या मंडळींचं दुर्दैव असं की त्यांचा वैचारिक पिता कधीच त्यांना असा चांगला सल्ला देऊ शकत नाही. एकूणच काय तर प्रभू रामचंद्राचं मंदिर मोठ्या थाटामाटात उभे राहणार यात शंका नाही... परंतु रावण नाश पावणार हेही तितकंच सत्य आहे. रामभक्त रामराज्याची स्थापना करणारच. जिथे सर्व समाज मिळून भेदाभेदमुक्त, सर्वसमावेशक, समरस, वैभवशाली राष्ट्र पुन्हा उभं राहील. 
"सब समाज को लिए साथ, आगे बढ़ते है जाना.." हा ध्येयमंत्र त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे.  

- कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान