दोन घटना, दोन बोध
केरळमध्ये आज पीएफआय या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेकडून 1921 मध्ये घडलेल्या मोपला बंडाच्या शतकपूर्ती निमित्त रॅली काढली होती आणि या रॅली मध्ये ब्रिटिश अधिकारी व संघाचे स्वयंसेवक सजीव देखाव्यात कैद करून त्यांना हाकलून लावत असल्याचे दाखवले. समाजमानातून यावर स्वाभाविकपणे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मलबार येथे खिलाफत आंदोलनाची परिणीती म्हणून जो हजारो हिंदूंचा नरसंहार झाला त्याचा आनंदोत्सव आज पीएफआय ने व्यक्त केला आहे. यातून त्यांची देश विघातक मानसिकता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
संघाला आपला कट्टर शत्रू मानणाऱ्या या संघटनेचे कारनामे अनेकदा समोर आले आहेत. आपल्या अश्या कृत्यातून त्यांना संघाला संपवायचं आणि भारतात आपली सत्ता आणायची आहे असा काहीसा अर्थ निघतो, तो किती केविलवाणा म्हणावा. खरं म्हणजे संघाविरुद्ध कितीही गरळ ओकली, हिंसा केली, खून केले तरी संघ विचलित होत नाही, ही यांची खरी दुखरी बाजू आहे. आजही पीएफआयच्या या कृत्याला संघाने अधिकृत काही उत्तर दिले नाही, त्यामुळे त्यांचा तिळपापड झालाच असणार.
असो. असंच एक वेगळं वृत्त राजस्थान मधील. राजस्थान मधल्या राजसमंद येथील निर्मल ग्राम पंचायतीच्या गावात एका दलित परिवारातील मुलीचं लग्न झालं. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. अश्यातच सामाजिक वातावरण अत्यंत गढूळ. दलित समाज अजूनही तिथे आपल्या मूलभूत हक्कांसाठी पारखा आहे. विषमता मोठ्या प्रमाणात आहे. अश्या राजसमंद येथील हरिजन या दलित परिवाराला रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी आनंदाचा धक्काच दिला.
निमित्त होते लग्न सोहळ्याचे. स्वयंसेवकांनी या हरिजन परिवाराची घोड्यावरून बिंदोली (मिरवणूक) काढली व लग्नातील सर्व तयारी व व्यवस्था लावण्यात मदतही केली. बिंदोलीचे जसे गावात आगमन झाले, तसे स्वयंसेवक व नागरिकांनी मिळून या हरिजन परिवारावर पुष्पवृष्टी केली. एवढेच काय तर या परिवारातील ज्या तरुणीचे लग्न होते, तिला सुद्धा घोड्यावर बसवून बिंदोली काढून तिचे स्वागत केले. संघ स्वयंसेवकांनी या परिवाराच्या छोटेखानी लग्न कार्यात सहभाग घेऊन जो समरसतापूर्ण सोहळा पार पाडला त्यामुळे सर्व गाव, स्थानिक दलित समाज व हरिजन परिवार प्रचंड भावुक झाला होता. आपल्या मुलीचं अश्या प्रकारे लग्न होईल असं त्यांना वाटलंच नव्हतं.
शिवाय लग्नात फक्त मुलगा नवरदेवच घोड्यावर बसेल अशी सर्वत्र रीत आहे. परंतु या ठिकाणी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन स्त्री-पुरुष समानता म्हणून सपना हरिजन हिलासुद्धा (नवरीला) घोड्यावर बसवून तिचा सन्मान केला. त्यानंतर या स्वयंसेवकांनी समस्त गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या हस्ते किशनलाल हरिजन व त्यांच्या सर्व परिवार सदस्यांचा सत्कार करून त्यांना मंडपापर्यंत घेऊन गेले.
हा प्रसंग म्हणजे संघाची प्रसिद्धी नाही. संघाच्या माध्यमातून देशभरात दररोज कुठे ना कुठे अश्या समाजोपयोगी व देश हितासाठी कामं होतच असतात. हे त्यातील एक उदाहरण. परंतु मुद्दा दोन वेगळ्या वैचारिक प्रवाहांचाही आहे.
1921 मध्ये मलबार मध्ये जो हिंदू नरसंहार झाला त्याला आपल्या समाजातील अस्पृश्यता, विषमता, जातीभेद या गोष्टी अधिक जबाबदार होत्या. या नरसंहारात अडीच हजाराहून अधिक हिंदूंची कत्तल झाली, तेवढेच धर्मांतरित केले गेले, 26 हजारहून अधिक बेघर झाले आणि शंभरहून अधिक मंदिरं उध्वस्त करण्यात आली होती. ही कटू आठवण आजही आपल्याला वेदना देते. परंतु राजस्थानच्या राजसमंद मध्ये स्वयंसेवकांनी जे केलं ना, ते याचं उत्तर आहे. दोन वेगळे प्रवाह आहेत. दोघी आपलं काम करताहेत. आपल्याला केवळ प्रतिक्रियावादी होऊन ओरडत बसायचं की संघाचा प्रवाह अधिक विशाल करायचा हे आपण ठरवायचं आहे. चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना..!
--- कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा