हे केवळ अभियान नाही!
सुमारे पाचशे वर्षांच्या अविरत संघर्षानंतर समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्माण करण्यास आता सुरुवात झाली आहे. भारताची अस्मिता, स्वाभिमान आणि सामाजिक समरसतेचे अनुपम केंद्र म्हणून जग या मंदिराकडे पाहत आहे. सर्व समाज, राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिर निर्माण साठी प्रयत्न झाले आहेत... असे हे राष्ट्रमंदिर लवकरच भव्य दिव्य स्वरूपात उभे राहण्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात 'निधी संकलन अभियान' सुरू होत आहे.
राम मंदिर निर्माण म्हणजे आपण सर्वांसाठी एका मोठ्या ऐतिहासिक विजयाचा टप्पा आहे. संविधानिक रचनांचा उपयोग करून कोणाला पराभूत न करता आपल्याला हा विजय मिळाला आहे. या अभियानात सर्व समाजाच्या सहभागीतेचा आणि सामिलिकारणाचा भाव असेल. त्यामुळे सर्व संकुचित बेड्या तोडून सर्व मतभेदांच्या पलीकडे सर्व समाज जोडणारे हे व्यापक अभियान असणार आहे.
हे अभियान केवळ एक मंदिर बांधायचं म्हणून नाही. प्रभू राम भारताची आस्था, अस्मिता आणि स्वाभिमान आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक रामभक्त आपल्याला दिसून येतील. इंडोनेशिया सारखा मुस्लिम बहुल देश त्याचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळे हे मंदिर निर्माण म्हणजे 'रामत्वाची स्थापना' आहे. प्रभू राम म्हणजे एक न्यायी प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांच्या प्रेरणेतून भारत उभा रहावा... पुन्हा रामराज्य निर्माण व्हावं, व त्याचे प्रेरणा केंद्र अयोध्या व्हावी यासाठी या मंदिराचे महत्व आहे.
हिंदू समाजाने अत्यंत वाईट काळ सोसलेला आहे. मागील १ हजार वर्षाचा काळ भारताचे भारतीयत्व संपविण्यासाठीचा काळ होता. प्रत्येक आक्रमकाने येथील संस्कृती, आस्था, प्रेरणा, महापुरुष यांना जनमनातून संपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. भारत या देशविरोधी शक्तीसोबत आतापर्यंत झुंज देत आला आहे. कधी महाराज पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपातून, कधी महाराणा प्रताप यांच्या रूपातून, कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून तर कधी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या रूपातून.... भारत अश्या लक्षावधी रूपातून आपली संस्कृती सभ्यता जपण्यासाठी लढत राहिला आहे.... याच लढाईचा नजीकचा टप्पा म्हणजे श्रीराम मंदिर निर्माण आंदोलन होय. भारतीयत्व मिटवण्यासाठी असंख्य देवळं इस्लामिक आक्रमकांनी उध्वस्त केली होती. भारतीयांच्या अस्मितेला संपवलं की त्यांच्यातील भारतीयत्व संपेल आणि पुन्हा धर्मनिष्ठ देशभक्त जन्माला येणार नाहीत ही भावना त्यामागे होती. परंतु भारतमातेच्या कुशीतून देशभक्त जन्माला येत गेले आणि त्यांनी परकीयांच्या सर्व डाव धुळीस मिळवले. श्रीराम मंदिर आंदोलन त्याचंच एक उदाहरण.
श्रीराम मंदिर आंदोलन लढताना कोणी राजा महाराजा किंवा मोठा नेता नव्हता. आज संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद चे कार्य जेवढे विशाल झाले आहे तेवढे त्यावेळी नव्हते. परंतु तरीही लक्षावधी हिंदू भारताच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी झाले. ३१ वर्ष अविरत हे आंदोलन सुरू होते. शेवटी न्यायालयीन लढा यशस्वी होऊन आंदोलन संपले. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नव्हते. काही अपप्रवृत्ती वगळता समस्त भारतीय समाजाची श्रीराम मंदिर उभं राहावं हीच इच्छा होती. म्हणूनच या मंदिराला 'राष्ट्रमंदिर' असं संबोधलं जात आहे. भारताच्या भावी पिढ्यांना युगानुयुगे हे मंदिर प्रेरणा देत राहील. भारतीयांनी आपले राष्ट्रीयत्व जपण्यासाठी किती मोठा लढा दिला, हजारो रामभक्तांनी बलिदान दिले, न्यायालयात सर्व बुद्धीचातुर्य पणाला लावले, पुरावे गोळा केले, सर्व समाजाला पटवून दिले आणि भारतानेही माननिय न्यायालयाचा निकाल आनंदाने स्वीकारला. हाच तो भारतीयांचा दिग्विजय आहे!
रामजन्मभूमी येथे मंदिर निर्माण साठीचे हे निधी संकलन अभियान सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. भारतात आज हजारो सधन श्रीमंत नागरिक आहेत जे मंदिर निर्माणसाठी एका शब्दावर पैश्याचा पाऊस पाडतील. देव, देश, धर्मासाठी येथील श्रीमंतातील श्रीमंत व गरीबातील गरीबाने कधी कमी भासू दिली नाहीये. आजही मंदिर निर्माणसाठी काही ठराविक लोकांकडून मोठी राशी उपलब्ध होऊ शकते. परंतु प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचायचे अभियानाचे लक्ष्य आहे.
प्रभू श्रीराम यांनी वनवासात असताना आपल्या दिव्य शक्तीने जागोजागी मोठमोठे महाल बांधले असते... रथावर घोडयावर जंगलातून फिरले असते... सर्व सुख सोयी स्वतःसाठी निर्माण केल्या असत्या. परंतु त्यांनी असे केले का? त्यांनी पर्णकुटी बांधून निवास केला, जंगलातील कंदमुळे खाल्ली, फलाहार केला, शबरी सारख्या वृद्ध स्त्रीच्या झोपडीत जाऊन तिने दिलेली उष्ठी बोरे खाल्ली. जंगलात भ्रमण करताना त्यांना अनेक निशाचर राक्षसांचा सामना करावा लागला. या प्रवासात राक्षसी आणि विदेशी अपसंस्कृतीचे उदाहरणे त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी अश्या सर्व दानवी शक्तीचं पारिपत्य केलं. रावणाशी लढण्याची वेळ आली तेव्हा एका क्षणात त्यांना देवादिकांची मदत मिळाली असती. राजा भरत चतुरंग दलबल घेऊन आपल्या बंधूसाठी सज्ज होऊन आले असते. परंतु तसे झाले नाही. प्रभू रामचंद्रांनी तेथील समाज संघटित केला. रावणरुपी संकटाचे तेथील प्रदेशात जे भय होते त्यातून संघटन निर्माण केले आणि संघटनेची शक्ती काय असते हे युद्ध जिंकून दाखवून दिले. जेव्हा सर्व समाज एका विचारावर एकनिष्ठ असतो, तेव्हा रावणरुपी महासंकटही पराभूत होतं हे त्यांनी दाखवून दिलं. तसंच या प्रवासात त्यांनी सामाजिक समरसतेचे अनुपमेय उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. वनवासात त्यांचा समाजातील सर्व वर्गाशी संबंध आला. कसलाही मतभेद, मनभेद व जातीभेद न करता त्यांनी सर्व समाज एका ध्येयासाठी संघटित केला. याच आदर्शवर असा समरस भारत बनेल जो अहिल्या, शबरी आणि निषादराज यांच्याकडे मैत्रीने व प्रेमाने जाईल. उच्च निच्चतेच्या भेदाला सोडून प्रेम व सौहार्द जोपासून समरस होईल. मग कोणी कितीही भारतीयत्व, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व संपविण्याचे प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाही. कारण जिथे राम आहे, जिथे रामाचं कार्य आहे, तिथे अपयश नाही. या अभियानातून हाच संदेश जाणार आहे.
एक वेळ होती ज्या वेळी प्रत्येकाला कारसेवेत जावसं वाटत होतं. त्याचप्रमाणे आजही सर्व रामभक्त अभियान सुरु होण्याची वाट बघत आहेत. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामाचा आदेशच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या अस्मिता व स्वाभिमानाचं केंद्र उभं राहावं म्हणून प्रत्येक भारतीय त्या कार्यात सहभागी झाला होता, ही माहिती भविष्यातील पिढ्यांना सदैव स्वत्व आणि सत्व टिकवण्यासाठी प्रेरणा देत राहील. श्रीराम मंदिर आंदोलनातील हा विजयाचा टप्पा आता बलिदान नव्हे... तर धनदान आणि समयदान म्हणून आपल्याकडे पाहत आहे.
@ कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा