अशी झाली भारतीय वायुसेनेची सुरुवात...
जसजसा काळ बदलत गेला, नवनवे संशोधन होत गेले तसतसा युद्ध प्रकार बदलत जाऊ लागला. युद्धात विमानांचा वापर मोठ्या खुबीने होऊ लागला. सैन्यदलात वायुसेना अतिशय मोलाची भूमिका निभावू लागली. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंगच निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली होती. १९१८-३८ या एकवीस वर्षांच्या दोन जागतिक युद्धांच्या संधिकालात एकामागून एक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. या काळात ब्रिटिशांनी हिंदुस्थानात ‘रॉयल एअर फोर्स’ ची (शाही हवाई दल) स्थापना केली. त्यात दोन स्क्वॉड्रन्स, ८० अधिकारी व ६०० सैनिक हिंदुस्थानात ठेवले होते (१९१८).
१९२० पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या आठपर्यंत गेली व १९२३-२४ मध्ये ती पुन्हा सहापर्यंत खाली आली. त्यांपैकी चार भूसेनेला पाठिंबा देणारी व दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार १९२८ मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठरले व हिंदी हवाई दलाची अधिकृत स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ मध्ये झाली मात्र हिंदी वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी १९३३ मध्ये बाहेर पडली होती. यानुसार पहिले वायूयान उड्डाण १ एप्रिल १९३३ रोजी झाले. यावेळी ६ अधिकारी व १९ वायू दल सैनिक होते, तर चार वेस्टलँड वापिती बायप्लेन सामील केलेले होते.
साडेचार वर्षानंतर या 'ए' फ्लाईट ने बागी भित्तानी जनजाती बंडखोरांविरुद्ध उत्तर वजिरीस्तान मिरानशाह मध्ये प्रथमच सहभाग घेतला. भारतातील अगोदरच्या कर्तव्यक्षेत्राप्रमाणे या चिमुकल्या हिंदी हवाई दलाचे कार्य वायव्य सरहद्द प्रांतातील बंडखोर पठाणांना काबूत ठेवणे, हे होते व या दलाला युद्धक्षम बनविण्याचे शिक्षण तेथेच मिळाले. ऑगस्ट १९४० मध्ये दौर खोऱ्यात तीव्र गोळी-बाराविरुद्ध हिंदी वैमानिकांनी अकरा हल्ले केले. या वेळी त्यांच्या वाट्याला बहुधा शाही हवाई दलातील नको असलेली जुनाट विमानेच आली. त्यांना सरहद्दीवरील कर्तव्याबरोबरच भूसेनेला सहकार्य करावे लागे. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर हिंदी महासागराच्या किनाऱ्याचे संरक्षण करणारे दल उभारले गेले पण याचे एक स्क्वॉड्रन होण्यासदेखील दोन वर्षांचा अवधी लागला होता.
लेखन व माहिती संकलन : कल्पेश जोशी
संदर्भ: १) विश्व मराठी कोष
२) भारतीय वायू दल संकेतस्थळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा