स्वामी रामानंद तीर्थ - बालपण ते संन्यास
@ कल्पेश गजानन जोशी
हैदराबाद मुक्तिसंग्रामात सर्वस्व झोकून देऊन सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी व त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी दूरदृष्टीने लढणारे झुंजार नेतृत्व म्हणजे 'स्वामी रामानंद तीर्थ'. हैदराबाद राज्याच्या विभाजनाचे प्रवर्तक व संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्याकरिता हिरीरीने झटलेले, धुरंदर चिकाटीचे कार्यकर्ते म्हणून इतिहास स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कडे बघतो. निजामाच्या धर्मांध आणि पिसाट सत्तेशी झुंजताना अनेक हाल-अपेष्टा ना त्यांना सामोरे जावे लागले. तळघराच्या अंधारकोठडीत ठेवून निजामाने त्यांचा अनन्वित छळ केला. पक्षाघाताच्या व्याधीने त्यांचे शरीर आधीच जर्जर झाले होते, परंतु तरीही न डगमगता त्यांनी निजामाविरुद्ध मोठे जन आंदोलन उभे केले. या स्वातंत्र्यलढ्यात स्वामीजी हजारो तरुणांचे प्रेरणास्थान होते.
बालपण:
स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात 'सिंदगी' या तालुक्याच्या गावी झाला. ते मूळचे खेडगी या गावचे. स्वामीजींच्या मातोश्री बालपणीच मरण पावल्या होत्या. त्यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव (कुलकर्णी) खेडगीकर असे होते. त्यांच्या आई-वडिलांना एकूण सात अपत्ये होती. स्वामीजी त्यातले पाचवे. स्वामीजींच्या वडिलांचा मूळ पिंड हा संन्यस्त वृत्तीचा होता, त्यामुळे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच संन्यस्त वृत्तीचा प्रभाव राहिला. स्वामीजींचे चौथीपर्यंतचे शिक्षण 'सिंदगी' येथे झाले. नॉर्थकोट शाळेत शिकत असताना त्यांनी देशासाठी जीवन समर्पित करण्याचा पवित्र संकल्प केला होता. या संकल्पाच्या आधीच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे बीज रुजले होते.
मातृभूमीसाठी जीवन अर्पण करण्याची प्रतिज्ञा:
स्वामीजींवर लोकमान्य टिळकांचा मोठा प्रभाव होता. सोलापुरात विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या भाषणाला जाऊ नये म्हणून त्यांच्या भाषणाच्या वेळेत हेड मास्तरांनी परीक्षा ठेवली होती. परंतु, टिळकांची ओढ असलेल्या व्यंकटेश ने अल्प वेळात पूर्ण पेपर सोडवून परिणामाची तमा न बाळगता सभेला उपस्थित राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला कठोर शिक्षा झाली. टिळकांच्या या भाषणाने त्यांच्या बालमनात देशभक्तीचे बीजारोपण झाले आणि अत्याचारी ब्रिटिश राजवटीची कल्पना आली. १९२० सालच्या १ ऑगस्टला लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि त्याचे व्यंकटेशला भयंकर दुःख झाले. त्यादिवशी तो सोलापूर जवळच्या कंबर तलावापाशी बसून ओक्साबोक्शी रडत राहिला. दिवसभर उपवास केला आणि सूर्यास्ताच्या वेळी पाण्याचे अर्घ्य देऊन त्याने संकल्प सोडला, की "या क्षणापासून मी माझे पुढील जीवन पूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करीन. सर्वसंग परित्याग करून मी आजन्म ब्रह्मचारी राहील."
मॅट्रिकच्या वर्गात असताना असहकाराची चळवळ सुरू होती. त्यावेळी असाच एक प्रसंग घडला. त्यावेळी शाळेत गांधीटोपी घालून घेणे फार मोठा गुन्हा समजला जात होता. त्यावेळी स्वामीजींनी २०० विद्यार्थ्यांसह गांधीटोपी घालून वर्गात प्रवेश केला आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या आदेशालाही डावलले. "आम्ही टोपी मुळीच काढणार नाही, आम्ही कोणता गुन्हा केला आहे असे आम्हाला मुळीच वाटत नाही" असे उत्तर स्वामीजींनी मुख्याध्यापकांना दिले. यावरून स्वामीजींच्या अंगी बालपणापासूनच देशभक्ती संचारली होती, असे लक्षात येते.
शिक्षण:
जुलै १९२१ मध्ये स्वामीजींनी अमळनेरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. हे कॉलेज राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी काढलेले आणि अध्यात्मिक विचारांनी भारावलेले होते. स्वामीजींमध्ये वकृत्व कलेचा विकास या कॉलेजमध्ये घडून आला. तसेच वाचन, लेखन आणि व्यायाम इत्यादींचे उत्तम संस्कार स्वामीजींवर या कॉलेजमध्ये घडून आले. पुढे काही कारणास्तव हे कॉलेज बंद पडल्यामुळे स्वामीजींनी पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश घेतला. इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात ते वांग्मय विशारद झाले. 'लोकशाहीचा विकास' या विषयावर १९२६ मध्ये प्रबंध लिहून त्यांनी एम. ए. ची पदवी संपादन केली.
कामगार चळवळीत योगदान:
यानंतरच्या काळात जागतिक कीर्तीचे कामगार पुढारी ना.म. जोशी यांचे सेक्रेटरी म्हणून ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये काम करण्याची स्वामीजींना संधी मिळाली. १९२६ मध्ये स्वामीजी मुंबई गिरणी कामगार संघाचे उपसंघटक या नात्याने कामाला लागले. गिरणी मालकाकडून कामगारांचे सतत शोषण होत असे, म्हणून नाईलाजाने त्यांनी गिरणी मालकांनी विरुद्ध लढा देण्याचा पवित्रा घेतला. कामगार वर्गाला संघटीत केले आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे मुंबई गिरणी कामगार संघाचा लौकिक वाढला. त्यावेळी त्यांना अटक झाली. स्वामीजींनी सोलापुरातील गिरणी कामगारांचा संप देखील अशाच प्रकारे चालविला. २० हजार कामगार चार महीने संपावर होते. या प्रकरणात स्वामीजींना अटक होऊन अल्पमुदतीची शिक्षा झाली.
जीवनापासून विरक्ती व संन्यास:
राजकारणाकडे विशाल दृष्टीने पाहण्याची व इतरांच्या व स्वतः विरुद्ध असणाऱ्या मतांबद्दल आदर बाळगण्याची संधी ह्या काळापासूनच त्यांनी घेतली. याच वेळी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्यांचे शरीर पंगू झाले. म्हणूनच त्यांना आपल्या कामातून मुक्त व्हावे लागले. परंतु या आघातामुळे स्वामीजी खचले नाहीत. "माझ्यावर आजारपणाचा अनुग्रह करून मला प्रखर असे समर्पित जीवन जगण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल त्या जगंनियंत्याला भक्तीपूर्ण अंतःकरणाने शतशः प्रणाम करतो" असे म्हणून स्वामीजींनी आलेल्या परिस्थितीबद्दल परमेश्वराकडे आभार मानले.
हवापालट म्हणून समीजींनी देश पर्यटन करण्याचे ठरविले व पर्यटनातील हवामानामुळे आणि त्यांनी घेतलेल्या औषधांमुळे त्यांना बराच फरक पडला. तथापि ते शेवटपर्यंत पायांनी अधुच राहिले. आजारामुळे त्यांच्यात वैचारिक बदल झाला. जीवनातील आसक्ती कमी झाली व वैराग्याचे विचार डोक्यात घोळू लागले. या अवस्थेत त्यांनी मराठवाड्यात 'हिप्परगा' येथे मुक्कामी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने माध्यमिक शाळा सुरू केली.
१९३० साली त्यांच्यातील वैराग्य वृत्ती ने उचल खाल्ली व प्रसिद्ध स्वामी रामतीर्थ यांचे शिष्य नारायण स्वामी यांच्याकडून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. अशारीतीने पूर्वाश्रमीचे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर 'स्वामी रामानंद तीर्थ' झाले. संन्यास घेण्यापूर्वी बँकेत जे काही शिल्लक होती ती संस्थेच्या नावावर त्यांनी बदलून टाकली. अशा स्थितीत त्यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले. उदरभरणाची व्यवस्था म्हणून त्यांनी माधुकरी मागून ती पूर्ण केली. आपल्या सहकार्यांसह त्यांनी आंबेजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली.
लेखकाचा इमेल - kavesh37@yahoo.com
संदर्भ -
१) मुक्तीगाथा-मुक्तीदाता : डॉ. पी. जी. जोशी
२) मराठवाड्याचा इतिहास : डॉ. सोमनाथ रोडे
३) स्मरण रामानंद तीर्थांचे : प्रा. दत्ता भगत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा