...इथे माणुसकी ओशाळली!

...इथे माणुसकी ओशाळली!

#पालघर येथे घडलेला प्रकार इतका लाजिरवाणा आहे, की याचे कोणतेही राजकारण न होता खरोखर हल्लेखोर नर पिशाच्च लोकांवर कठोर करावी व्हायला हवी. इतक्या क्रूरतेने कोणी मारहाण करून जीव घेत असेल तर अश्या लोकांवर कारवाई काय होते हेही समाजासमोर येणे गरजेचे झाले आहे. कारण मागील काही वर्षात देशभरात मॉब लिंचिंगचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणावर चोरीचा किंवा मुलं पळवणारे म्हणून संशय घेऊन मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने होत आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
मुंबईच्या कांदिवली येथून आपल्या गुरूंचे निधन झाल्यामुळे तातडीने जावे लागत असल्यामुळे सुरतकडे निघालेल्या सुरेश महाराज गिरी (वय 35), कल्पवृक्ष महाराज (वय 70) आणि त्यांचा 30 वर्ष वयाचा चालक हे तिघेजण सुरतकडे आपल्या  गाडीतून रवाना झाले होते. 16 तारखेला रात्री 9.30 वाजता ते तिघे गडचिंचले येथे पोहचले. त्याच रात्री त्यांच्यावर तेथे जमलेल्या शेकडो लोकांच्या जमावाने हल्ला चढवला. पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून तिघा जणांना जीव जाईस्तोवर लाठ्या काठ्यांनी व कोयत्याने हल्ले करण्यात आले. तसेच जमावाने पोलिसांवरही हल्ला केला असे वृत्त आहे. 

संबंधित घटनेचा वायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडियात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओमध्ये पोलीस हतबल दिसत आहेत. सत्तरीच्या भगवे वस्त्र धारण केलेली वयोवृद्ध व्यक्ती पोलिसाचा हात धरून त्याला गयावया करत आहे. कदाचित ती व्यक्ती मला या जमावाच्या ताब्यात देऊ नका, असे अत्यंत कळकळीने सांगत असावी. परंतु, पोलीस नाविलाजने त्या व्यक्तीला एका खोलीतून बाहेर जमावाकडे घेऊन येताना दिसतात. पुढे जे घडते ते माणूस म्हणून जन्मलेल्या प्रत्येकाच्या काळजाला घरे पाडणारे आहे. सत्तर वर्ष वयाच्या व्यक्तीला ती निश्चल होईस्तोवर तरुण लाठ्या काठ्यांनी मारतात. दुसऱ्या एका व्हिडिओत असाच एक भागवेधारी व्यक्तीला पोलिसांच्या समक्ष काही लोक मारताना दिसत आहेत. जीवांच्या आकांताने ती व्यक्ती सैरावैरा पळत आहे. आठ-पंधरा कुत्रे मिळून एका सश्याला जसे जेरीस आणून घायाळ करून मारतात, तशी ही घटना. कदाचित त्याहीपेक्षा भयावह आणि वाईट! त्यामुळेच कसलेही राजकारण न होता, केवळ माणुसकीसाठी या घटनेची चौकशी झाली पाहिजे व त्या नर पिशाच्च उन्मादी लोकांवर कारवाई व्हायला हवी. 

तथापि, ही घटना, त्यावरील सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि माध्यमात त्या घटनेकडे केला गेलेला कानाडोळा पाहून काही प्रश्न निर्माण होतात. 16 एप्रिल रोजी रात्री घडलेली ही विदारक घटना  19 एप्रिल पर्यंत माध्यमात दुर्लक्षित राहिली. काही ठिकाणी त्याचे वृत्तांकन झाले, परंतु तेही प्रश्न निर्माण करणारे ठरले. एका वाहिनीवरील वृत्तामध्ये तिघा संतांवर दरोडेखोर असल्याच्या संशयावरून हल्ला झाल्याचं सांगण्यात आले. परंतु, केवळ तिघेजण दरोडा कसे टाकू शकतील, आणि त्यातही एक व्यक्ती 70 वर्ष वयाची अत्यंत वयोवृध्द आहे. वायरल व्हिडिओत त्यांना नीट चालतासुद्धा येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दरोडेखोर असल्याचा संशय येण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. जिल्हा परिषद सदस्य घटनास्थळी उपस्थित आहे, पोलीस उपस्थित आहे; ते जमावाला समजावत असल्याचे वृत्त आहे परंतु, तरीही ह्या जमावाने न ऐकण्यासारखं इतकं असं काय घडलं होतं? असा प्रश्न विचारले जात आहे. 

महाराष्ट्रासह संबंध देश कोरोनाशी लढतोय. सर्वत्र लॉकडाऊन आहे. तरीसुध्दा एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा जमाव जमतो व तीन निष्पाप साधूंचा जीव घेतला जातो. हे कृत्य खरोखरच माणुसकीला काळिमा फासणारे आहे. सरकार, पोलीस, प्रशासन यांच्याकडे नेहमीप्रमाणे बोट दाखवले जात आहे. अर्थात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु, एक समाज म्हणून आपण कधीतरी अश्या घटनांतून आत्मचिंतन करणार आहोत की नाही? 

भगवान बुद्ध व महावीरांच्या या देशात एवढी हिंसा, अमानवता व द्वेष बुद्धी निर्माण होते, साधू संतांचा मान ठेवला जात नाही हे खरंच दुर्दैवी आहे. त्यामुळे ह्या घटना संस्कार आणि संस्कृती कुठेतरी कमी पडल्याचं द्योतक आहे. हिंदू साधू संतांची वारंवार होणारी बदनामी तसेच, भोंदू साधूंवर नसलेले नियंत्रण यामुळे समाजातून त्यांच्याविषयी आदराची भावना कमी होण्यास पूरक ठरत आली आहे. त्यामुळे अश्या घटना टाळायच्या तर त्याचे उत्तर सुशिक्षित व सुसंस्कृत समाजव्यवस्थेकडे आहे. तथापि, या अमानवी घटने माणुसकी ओशाळली, हे मात्र नक्की.

@लेखाग्नी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान