मॉब लिंचिंग की हत्याकांड?
मॉब लिंचिंग की हत्याकांड?
#पालघर घटना घडून आज (21 एप्रिल) पाच दिवस झाले. सोशल मीडियात ही घटना समोर येऊन तीन दिवस आणि प्रसार माध्यमात (खऱ्या अर्थाने) येऊन दोन दिवस झाले आहेत. या पाच दिवसात अनेक घडामोडी घडल्या, क्रिया प्रतिक्रिया उमटल्या, राजकारण करून झाले. परंतु, काही तथ्य या निमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे पालघर हत्याकांड ही अफवेतून झालेली मॉब लिंचिंग आहे की भगवे वस्त्र धारण केलेल्या संतांना मारलेला कट आहे, याबाबद्दल शंका गडद होऊ लागल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील ज्या कासा या गावाजवळील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने हत्या केली, त्या गावातील सरपंच भाजपच्या असल्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचा दावा करण्यास सुरुवात झाली. परंतु, तेथील सरपंच कोणी कुख्यात गुंड प्रवृत्तीची किंवा त्या भागात मोठा पगडा आहे आणि सर्व लोक त्यांच्या शब्दाखाली आहेत अशी व्यक्ती होती का? हा साधा प्रश्न आपल्याला हा दावा किती हास्यास्पद आहे हे दर्शवून देतो. सरपंच कधीपासून इतके शक्तिशाली होऊ लागले?
चित्रा चौधरी नामक महिला तेथील सरपंच आहेत आणि कदाचित प्रथमच त्या सरपंचपदी बसल्या आहेत. असे असताना चित्रा वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पकडलेल्या लोकांमध्ये अनेकजण भाजपचे आहेत, म्हणून यामागे भाजपचा हात आहे असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह शिवसेनेतर्फे सांगितले गेले. परंतु चित्रा चौधरी यांना पोलिसांनी अटक केलेलीच नव्हती हे लगेच स्पष्ट झाले. उलटपक्षी साधूंना मारताना विरोध केला आणि नंतर पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे सांगितल्याच्या संशयावरून चित्रा चौधरी यांनाच त्यांच्या कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दुसऱ्या एका दाव्यात घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे. घटनास्थळी संतांची हत्या होत असताना हे लोक तिथेच उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कम्युनिस्ट पार्टीच्या सुभाष भवर, धर्मा भवर आणि विष्णू पातरा यासह काही नेतेही या हत्याकांडात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. परंतु, या प्रकरणातील तथ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे प्रकरण दाबण्याचा आटोकाट प्रयत्न झाला आहे.
सोशल मिडियातल्या वाढत्या दबावानंतर प्रसार माध्यमात तीन दिवस उलटल्यानंतर या घटनेच्या वार्ता यायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया नसते तर ही खबरच कुणाला लागती ना. स्थानिक राहिवासी घटना घडली तेव्हा हजारोच्या संख्येने लोक आले असल्याचे सांगताहेत. गडचिंचले या गावाची लोकसंख्या जेमतेम 1500 च्या आसपास आहे. घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील लोक आल्याचेही समजत आहे. यावरून अफवा गंभीर रूप घेऊन पसरली होती हे सिद्ध होतं. त्यामुळे ही मॉब लिंचिंगच्या माध्यमातून करवून घेतलेली हत्याकांड तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते.
माध्यमातील बातम्यांनुसार लहान मुलांची किडनी काढणारे किंवा दरोडेखोर असल्याच्या अफवेने जरी या साधूंचा बळी घेतला गेला असला, तरी ही अफवा कोणी जाणीवपूर्वक पसरविले असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने ह्या भागात भाजपचा पगडा असल्याचे म्हंटले असले, तरी या भागात कम्युनिस्टांचाच प्रभाव आहे हेच सत्य आहे. येथील आमदारकीवर 1962 पासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व तीनवेळा कम्युनिस्ट पार्टीचे आमदार निवडून आले आहेत. डहाणूचे विद्यमान आमदार विनोद निकोले हे सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचेच आमदार आहेत. 2014 मध्ये भाजपला या मतदारसंघात पहिल्यांदाच विजय मिळाला होता. गट ग्राम पंचायतीची सरपंच भाजपची आहे, म्हणून जर हा भाजपचा बालेकिल्ला आहे असे कोणी म्हणत असेल तर त्याचा हा दावा किती अडाणचोट म्हणावा.
खरे म्हणजे या भागात कोणत्याही पक्षाचे प्राबल्य असो, त्यावरून आरोपींना शिक्षा व्हावी की न व्हावी हे काही ठरत नाही. ज्या लोकांनी निर्दयपणे भागव्याधारी साधूंचा जीव घेतला आहे, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. परंतु, मयत व्यक्ती केवळ हिंदू साधू असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात आले आहे का, याचाही छडा लावला गेला पाहिजे. लॉकडाऊन असताना अशी अफवा पसरते आणि हजारोच्या संख्येने लोक गोळा होतात हे अविश्वसनीय आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या व पोलिसांचा पूर्ण ताफा त्या ठिकाणी होता. त्यांच्या समक्ष हे हत्याकांड घडले आहे. ज्या महाराष्ट्र पोलिसांचे आज सर्वत्र कौतुक सुरू आहे त्यांना या ठिकाणी का हतबल व्हावे लागले, हे समोर यायला हवे.
ख्रिश्चन मिशनरी, धर्मांतरीत करून ख्रिश्चन झालेले जनजाती बांधव आणि कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. डहाणू भागात असलेल्या चर्चची संख्या हेच निर्देशित करते. त्यामुळेच हिंदू साधूंची या ठिकाणी झालेली हत्या अनेक प्रश्न व शंकांना आमंत्रित करते. हा मॉब लिंचिंगचा प्रकार केवळ अफवा व भीती यातून घडलेली असू शकते. आज आपण केवळ शंका कुशंका व तर्क लावू शकतो. कोणतीही हत्या किंवा हिंसा वाईटच असते, पण त्यामागील हेतू त्याहूनही अधिक वाईट असू शकतो. हेतू लक्षात आल्यास भविष्यातील हिंसा रोखता येते. म्हणून हा लेखन प्रपंच. आज सत्य गुलदस्त्यात आहे, उद्या सत्यात येईल असा विश्वास ठेवूया.
@लेखाग्नी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा