भोंगे आणि सोंगे

भोंगे म्हंटल्यावर मशिदीवरील भोंगे हा संबंध सर्वांना खूप ओळखीचा व जुना झाला आहे तरीही दर काही महिन्यांनी या भोंग्यावरून गदारोळ उठतो पण, त्यावर तोडगा काढण्यासाठी कुणी राजकारणी जोखीम पत्करायला तयार नाही. मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती त्यांना वाटत असावी. म्हणूनच की काय तथाकथित हिंदुत्ववादीही आता या विषयावर बोलायला तयार नाही. 

मुंबईत काल पर्वा एक विस्मयकारक घटना घडली. एक हिंदू तरुणी "मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करा" असे सांगण्यासाठी थेट मशिदीजवळ गेली. तेव्हा स्वाभाविकपणे तिचे तेथील तथाकथित शांतताप्रिय समुदयासोबत "तू तू मै मै" झाले. करिष्मा भोसले असे या धाडसी तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे या तरुणीशी चर्चा व समजूतदारपणे बोलायचे सोडून महिला म्हणून काहीही मान मर्यादा न बाळगता तेथे उपस्थित मुस्लिम गृहस्थांनी तिला शिवीगाळ केली. नंतर परिस्थितीचे गांभीर्य घेत करिष्मा सोबत भांडण्यासाठी मुस्लिम महिलांना पाचारण करण्यात आले. पण ही तरुणी सगळ्यांना पुरून उरली. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर तिला समजूत घालून तेथून घरी पाठविण्यात आले. 

नेहमीप्रमाणे लगेच याचे पडसाद उमटले. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी व काही अज्ञात लोकांनी तिला घटनास्थळी दिल्या त्याच स्वरूपाच्या धमक्या दिल्याच्या वार्ता आहेत. भोंग्यांचा आवाजाचा एवढाच त्रास होत असेल, तर दुसरीकडे जाऊन रहा, असा सल्ला त्या तरुणीला दिला गेला. हिंदू समाज त्या तरुणीच्या पाठीशी उभा राहिला खरा, परंतु स्त्री रक्षण, स्त्रीवादी, महिला कार्यकर्ता म्हणवून घेणारे नेते व विशिष्ट ब्रिगेडमध्ये वावरणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्याना करिष्मा ताई वरील अन्याय कदाचित अन्याय वाटला नसावा म्हणून त्यांना प्रतिक्रिया देण्याजोगे हे प्रकरण वाटले नाही. त्यांची सोंगे या निमित्ताने पुन्हा उघडी बोडकी पडली आहेत. 

जन प्रबोधन करताना मोठ्या भावाप्रमाणे तरुणींना कटू शब्दात योग्य समज देणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना एका किर्तनकारावर गुन्हा नोंदवणे खूप महत्वाचे वाटते, परंतु एका स्त्रीला पुरुषांशी केवळ शांततेत जगू द्या या अगदीच क्षुल्लक न्यायासाठी जीव मुठीत घेऊन भांडावे लागते, त्याचे त्यांना थोडेही गांभीर्य वाटत नाही याचे नवल वाटते.

देशभरात आज अश्या कित्येक करिष्मा या अन्यायाला सहन करत आहेत. कित्येक करिष्मा आपला अभ्यास नीट करू शकत नाही. करिष्मा भोसले ताईच्या अगदी खिडकीसमोर जसा भोंगा लावला गेला तसा कित्येक करिश्माच्या घरासमोर आजही मुद्दाम भोंगे लावलेले आहेत. परंतु, त्याही धास्तावलेल्या आहेत. देशात मागील काही महिन्यांपासून ज्याप्रमाणे हिंदूंना काहीना काही कारणाने जाणीवपूर्वक लक्ष्य बनवून हत्या केल्या जात आहेत त्या अर्थी हिंदू समाज किती भयभीत झाला आहे हे लक्षात येऊ शकेल. 

करिष्मा जेव्हा भोंग्याविषयी बोलत होती तेव्हा तिला तेथील एका महिलेला लगेच मंदिराच्या घंटा आठवला. भोंग्याला काही बोलायला गेले की मंदिरातील घंटा आठवलीच पाहिजे असे काहीतरी असावे. परंतु, घंटा कितीवेळ वाजते आणि त्याचा त्रास होतो का, याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. दरवर्षी हिंदूंच्या सणावाराला कोर्टाच्या आदेशांचे पालन करायला लावणारे सरकार व प्रशासन यावेळी मात्र मूग गिळून गप्प झालेले असते. जावेद अख्तर यांच्यासारख्या शहाण्या माणसाने भोंग्यांची अनावश्यकता कितीही सांगितली तरी त्यांना गद्दार ठरवले जाते. त्यामुळे एक कोरोनाच आहे जो काही काळ या भोंग्यांना बंद ठेऊ शकला. 

कधी उत्तरप्रदेश, कधी मध्यप्रदेश, कधी केरळ तर कधी महाराष्ट्र. प्रत्येक राज्यात व प्रत्येक गावात या भोंग्यांचा कर्णकर्कश्य आवाजाने समाजमन ग्रासून सोडले आहे. मा. न्यायालयाने भोंगे उतरविण्याचे आदेश देखील कितपत पाळले जातात हा संशोधनाचा विषय आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत एकेक बंधनं लादूनही कित्येक गणेश भक्तांवर केसेस दाखल होतात. आजपर्यंत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले म्हणून किती मशिदींवर कारवाई करण्यात आली, हे कोणीही सांगू शकणार नाही.

करिष्मा ताईच्या निमित्ताने देशात भोंग्यांचा त्रास होतोय याची जाणीव पुन्हा झाली आहे. सरकार प्रशासनाला त्याची कधी जाणीव होणार हे मात्र आता बघावे लागेल. तोपर्यंत भोंगे सहन करा, नाहीतर दुसरीकडे राहायला जा, हा शांतिप्रिय समुदायाचा धमकीवजा सल्ला आपल्या कर्णपटलावर उभा आहेच.  

@लेखाग्नी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान