बालपण आणि शिक्षण
#लोकमान्य_टिळक (भाग२)
बालपण आणि शिक्षण
भारतमातेला पारतंत्र्यात ढकलणाऱ्या ब्रिटिशांना जन्माची अद्दल घडविणारे १८५७ चे स्वातंत्र्यसमर घडले त्याच्या अगदी एक वर्ष अगोदर रत्नागिरीत २३ जुलै, १८५६ रोजी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातले नाव 'केशव'. परंतु आई पार्वतीबाई प्रेमाने 'बाळ' म्हणून हाक मारत. ते त्यांना अधिक आवडे. त्यामुळे पुढे बाळ हेच नाव प्रसिद्ध झाले.
टिळकांचे वडील गंगाधरपंत शाळाखात्यात डेप्युटी इन्स्पेक्टरच्या हुद्द्यापर्यंत चढलेले होते. अर्थातच त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण विषयात तरबेज केले. संस्कृत श्लोकांचे अर्थ टिळक अवघ्या दहाव्या वर्षी सांगू लागले होते. सन १८६१ मध्ये टिळकांना दसऱ्याच्या दिवशी शाळेत घालण्यात आलं. त्यांच्या पहिल्या गुरूंच नाव भिकाजी कृष्ण पटवर्धन. शालेय जीवनात टिळक हट्टी, खोडकर होतेच शिवाय शाळेत हुशार विद्यार्थी असाही त्यांचा लौकिक होता.
कॉलेजात असताना प्रो. जिनसीवाले यांनी 'मातृविलाप' या विषयावर कविता करण्यास सांगितले होते. टिळकांना काव्य करण्याची फार आवड नव्हती. परंतु वर्गातील प्रतिस्पर्धी आपट्यांसारख्या निपुण कवीला टक्कर देऊन प्रोफेसरांची शाबासकी मिळवण्यासाठी त्यांनी कविता लिहिल्या आणि खरोखरीच प्रो. जिनसीवाले यांची शाबासकी मिळवली. केवळ आठ वर्षाचे असताना त्यांचे गणित, रूपावली, समासचक्र आणि निम्मा अमरकोश इ. विषयांचं अध्ययन घरीच झालं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी ते पुण्याला आले.
१८७१ मध्ये सत्यभामाबाई यांच्याशी टिळकांचा विवाह झाला. इंग्रजी शाळेत प्रवेश करण्याच्या सुमाराला टिळकांचे मातृप्रेम काळाने हिसकावून घेतले व मॅट्रिकला असताना पितृछायाही हरवली. टिळक खऱ्या अर्थाने पोरके झाले होते. परंतु त्यांच्या काकांनी गोविंदरावांनी त्यांना मोठी माया लावली. १८९७ ला टिळकांना तुरुंगवास झाला तेव्हा त्यांच्यासाठी रडणारी हीच एकमेव व्यक्ती होती.
टिळकांचा शाळेत वरचा अनुक्रम मिळवण्यापेक्षा स्वतंत्र बुद्धीने प्रत्येक विषयाचा जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असे. शिक्षकांनी सोडवण्यासाठी दिलेल्या गणितात केवळ कठीण असलेली गणितं सोडवण्यासाठी त्यांची घाई असे. वाचतानाही घोकंपट्टी करण्यापेक्षा निवडक वाचून त्याचे आकलन करणे अशी त्यांची पद्धत होती. त्यांनी टिपणेसुद्धा कधी काढली नाहीत. म्हणूनच त्यांच्या मित्रांनी ब्लंट (स्पष्ट वक्ता) अशी पदवी दिली होती.
टिळकांनी कॉलेजला असताना आपल्या शरीराकडे विशेषत्वाने लक्ष दिले. नियमित व्यायाम, पोहणे, बोटिंग, कुस्ती खेळणे अश्या खेळात त्यांनी सहभाग ठेवला. सपाटून व्यायाम केल्यामुळे त्यांनी आपलं शरीर बलदंड केलं होतं. तरुणपणी मिळवलेल्या या सुदृढ व बलदंड शरीराचा त्यांना भावी आयुष्यात ब्रिटिशांशी दोन हात करताना मोठा उपयोग झाला. टिळकांची शारीरिक व मानसिक सोशिक क्षमता मोठी कमालीची झाली होती.
कॉलेजात असताना दाजीसाहेब खरे व गोपाळ गणेश आगरकर हे त्यांचे चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत राजकीय व सामाजिक विषयात चांगलीच चर्चा रंगत असे. टिळकांचा कल अगोदर राजकीय स्वातंत्र्य मिळवायचे व नंतर सामाजिक सुधारणा करावयाच्या असे होते तर आगरकर राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य देत होते. शिक्षण या विषयावर मते त्यांचे एकमत होत असे. टिळकांनी बी.ए चे शिक्षण घेतले. एमए चे शिक्षण घेताना मात्र त्यांना अडचणी आल्या व त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यात त्यांनी हिंदू धर्म शास्त्र या विषयात सखोल अभ्यास केला.
संदर्भ- अरविंद ताटकेलिखित 'लोकमान्य टिळक' लघुग्रंथ
@लेखाग्नी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा