दहावी झाली, आता काय करू?

दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. अश्या काळात पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी तसेच पालकांना पडला असेल यात नवल नाही. परंतु, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेंढी बाजार होणार हेही तितकेच खरे. "मित्र किंवा मैत्रिण सायन्सला ऍडमिशन घेणार आहे, मग मी कसे काय आर्ट्स, कॉमर्स करू?" असा बावळट तर्क लावून बहुतांश विद्यार्थी व पालक सायन्स कडे वळतात व  झुंडीच्या झुंडी सायन्सकडे धावू लागतात. पण सायन्स फॅकल्टी किती थोतांड आणि लुबाडणूक करणारी फेकल्टी आहे हे कोणी लक्षात घेईना झालंय. सायन्समुळे सर्वसाधारण कुटुंबातील व विशेषतः गरीब घरातील विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होत आले आहे. कॉलेजच्या एडमिशन फी पासून, लायब्ररी, प्रयोगशाळा, जर्नल्स, परीक्षा फी, गॅदरिंग वगैरे वगैरे कारणांनी सतत पैसा कॉलेजात जमा करावा लागतो. एडमिशन पूर्वी विद्यार्थी-पालकांना याचा गंधही नसतो. 

दुसऱ्या बाजूला कॉमर्स, टेक्निकल, आयटीआय आणि विशेषतः आर्टस् ला तर एकदम बिनकामाचे शिक्षणच जणू ठरवून टाकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा कल, आवड, क्षमता, सद्य स्थिती व भविष्याचा कानोसा न घेताच विज्ञान शाखा निवडणारे नंतर पश्चात्ताप करत बसतात. याला जबाबदार कोण असते? 

आज सायन्स मध्ये १२ वी झाल्यानंतर कित्येक विद्यार्थ्यांना गणित नको असते म्हणून ते PCB (मेडिकल) ग्रुप निवडतात. ज्यामध्ये लाखो रुपयांची फी ओतावी लागते. PCM घेऊन इंजिनिअर साईड निवडणाऱ्यांना तुलनेने कमी फी भरावी लागते, परंतु नंतर नोकरीचे वांदे असतात. आज इंजिनिअर शिकलेल्या विद्यार्थ्यांचे मते व प्रतिक्रिया ऐकल्यावर एकूण शिक्षणाचीच किती बकाल अवस्था झाली आहे हे लक्षात येते. ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवर्जून त्यांची मते घ्यायला हवी. 

सायन्स फिल्ड निवडल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर अभ्यासक्रम येतो, तेव्हा मोठी फजिती झालेली असते. आपण दहावीत कोणत्या शाळेत, किती अभ्यास व प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगल्या टक्केवारीने पास झालो, याचे आत्मचिंतन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. आपल्याला ८० टक्के पडले असताना सायन्स न घेता दुसरी कोणती फिल्ड घेतली तर आपले मित्र आपल्याला हसतील का? नातेवाईक नाव ठेवतील का? अश्या प्रश्नांना बळी न पडता आपली आवड, क्षमता व भविष्याचा कानोसा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली फिल्ड निवडली पाहिजे. 

आज कोरोना मुळे केवळ देशातील नव्हे तर जगातील समीकरणे बदलली आहेत. असे आजार भविष्यातही येऊ शकतात. इंटरनेट, ऑनलाईन प्रक्रिया, ऑनलाईन व्यवसाय, उद्योग या सगळ्या बाबींवर परिणाम झाला आहे. योग, आयुर्वेद, टेक्निकल एज्युकेशन, इंटरनेट, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, एमबीए अश्या विषयांकडे पारडे झुकले आहे. यासोबत कला, भाषा, डिझायनिंग, पेंटिंग, वाणिज्य, बँकिंग, गुंतवणूक असे आर्टस् व कॉमर्स शी संबंधित विषय तग धरून राहणार आहे. 

सद्य स्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर स्पर्धा परीक्षांनी गारुड केले आहे. परंतु कोरोना लॉकडाऊन अगोदरच स्पर्धा परीक्षा क्षेत्राची बिकट अवस्था होती. सरकारी नोकर्यामध्ये वाढते खासगीकरण व कंत्राटीकरण जीवापाड मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूक उठले आहे. चांगली प्रतिमा, प्रतिभा व आरामदायी नोकरीच्या मागे धावता धावता ते केवळ मृगजळ ठरताना दिसत आहे. अनेक विद्यार्थी त्यामुळे आज हताश, उदास व मोठ्या दडपणाखाली वावरत आहे. वाढते वय, जबाबदाऱ्या आणि नोकऱ्यांची निराशा यामुळे देशाची हुशार पिढी बरबाद होत आहे. हे सगळं भयंकर आहे. असंख्य विद्यार्थी जणू विस्तीर्ण वाळवंटात भ्रमिष्टसारखे फिरत आहे. आज एक नवीन पिढी पुन्हा या संकटकडे कूच करत आहे. तेव्हा भावनिक विचार न करता आपल्या क्षमता, कल, आवड लक्षात घेऊन मार्ग निवडावा. 

सायन्स घेतले म्हणजे दूर शहरात नोकरीसाठी जावे लागणार आहे. केवळ बॅचलर झालेल्यांना ७ ते ८ हजार रुपयांपासून पगार आहे. पगार वाढीसाठी केवळ मल्टीनॅशनल कंपन्या खात्री देतात, पण अश्या कंपन्या खूप कमी आहेत. ज्यांच्या घरी शेती आहे, त्यांनी तर शंभरवेळा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. जर अगोदरपासूनच ध्येय निश्चित करून सायन्सचा विचार झाला असेल तर हरकत नाही परंतु, केवळ अधांतरी विचार करून अंधारात बाण सोडायचा तसे करत असल्यास ती घोडचूक ठरू शकते. आज शेती व्यवसाय वडिलांना वाढत्या वयामुळे पाहता येत नाही, म्हणून बरेच मुलं नोकरी सोडून शेती करण्यासाठी गावाकडे येऊ लागले आहेत. 

आजच एक ओळखीतली व्यक्ती भेटली. त्यांच्या मुलाला ६० टक्के दहावीत पडले. तेही आमच्या सोयगावसारख्या कुप्रसिद्ध परीक्षा केंद्रात. तरीही ते सायन्ससाठी अट्टाहास करत आहे. मुळात त्याला इतक्या कमी टक्केवारीवर प्रवेशच मिळणार नाहीये. तरीही त्या दोघांच्या हट्ट सुरू आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. ३ एकर शेती आहे. मुलगाही एकुलता एक. थोडावेळ चर्चा झाल्यानंतर असे लक्षात आले की त्यांच्या मनात आर्टस्, कॉमर्स, आयटीआय या क्षेत्राविषयी प्रचंड नकारात्मकता भरवली गेली आहे. म्हणून त्यांना सायन्स घ्यायचे आहे. पण वास्तव परिस्थिती लक्षात आणून दिल्यावर त्यांचा निर्णय बदलला आहे. 

डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची स्वप्ने रंगवून आपली क्षमता नसताना सायन्समागे धावण्यापेक्षा आर्टस् व कॉमर्स चा विचार केला पाहिजे. मागे डीएड बीएड ची लाट उसळली होती. आता सायन्सची लाट उसळली आहे. पण ही लाट बारावीपर्यंत भ्रमनिरास करून टाकते. दहावीत ८० टक्के घेणारे हौशी बारावीत मोठ्या कष्टाने पास होतात. त्यात दहावीपर्यंत मराठी मिडीयम शिकलेक्यांचे हाल विचारायला नको. मेहनती विद्यार्थी त्यात तरून जातात. पण ज्यांना ते झेपत नाही ते १२ नंतर आर्टस् कॉमर्स चा विचार करू लागतात. तेव्हा जो काही निर्णय घ्यायचा तो लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपली आर्थिक, बौद्धिक क्षमता पाहून घ्यायला हवा. सायन्स वाईट आहे असा सांगायचं अजिबात उद्देश नाही, परंतु ग्रामीण भागातील खूप विद्यार्थ्यांचे केवळ भावनेच्या भारत मोठे नुकसान होत आहे, एक प्रकारे हे राष्ट्रीय नुकसान आहे, ते पाहवत नाही म्हणून हा थोडासा उपदेशात्मक लेख लिहायला घेतला. 

अजून एक फुकट सल्ला- स्पर्धा परीक्षा फेम असलेल्या व्याख्यात्यांची भाषणे व आत्मचरित्र वाचता प्रबळ इच्छा होत असेल तरच त्या दलदलीत उतरा.

©️लेखाग्नी
lekhagni@gmail.com 

सायन्स, आर्टस् व कॉमर्स फिल्ड मध्ये करिअर संधी पाहण्यासाठी या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता..
https://www.edumilestones.com/blog/details/what-after-10th-career-counselling

https://www.quora.com/What-are-the-career-options-if-I-study-arts-after-10th

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान