कोरोनाआडून 'छि' 'थू' करणारे प्रतिगामी..

कोरोनाच्या निमित्ताने कथित पुरोगाम्यांनी पुन्हा आपले अकलेचे तारे तोडून हिंदू संस्कृतीला टीकेचे लक्ष्य केले आहे. विज्ञानाचा आणि शास्त्राचा एरवी दुरदूरपर्यंत संबंध नसणाऱ्या इस्लामिक व ख्रिश्चन तत्वज्ञानाला चुकूनही विरोध न करणाऱ्या पुरोगाम्यांमध्ये केवळ हिंदू द्वेषाची बीजे रोवली गेली आहेत हे कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. कोरोनावर आयुर्वेद, योगा किंवा वैदिक शास्त्रात काही उपचारपद्धती नाही आणि शेण गोमूत्राने कोरोना जाणार का? असे निरर्थक युक्तिवाद करून आपलाच हशा करून घेतला आहे. संजय राऊत यांच्या 'देव जेव्हा मैदान सोडतो' या अग्रलेखातून त्याचीच प्रचिती आली. या शेण गोमूत्राचं एवढं काय वावडं आहे कळत नाही. बरं या गोष्टींना विरोध करताना विज्ञानाचा आसरा घेऊन जणू आपणच शास्त्रज्ञ आहोत आणि आपणच विज्ञानाला जन्म घातला असा अविर्भाव कश्याच्या जोरावर?


पुरोगाम्यांनी फादर दिब्रिटो यांना ते केवळ चर्चचे फादर आहेत म्हणून डोक्यावर घेतले. पण त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही चर्च बंद होणार नाही असे सांगून सरकारी निर्देश धुडकावून लावले. ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांचेच कान फादरांनी ओले केले. पण पुरोगाम्यांना त्याची जाणीवही नाही व तशी जाणीवही त्यांना करून घ्यायची नाही. शाहीनबाग मध्ये मदरश्यातून उच्च विद्याविभूषित होऊन आलेल्या महिलांनी गर्दी न करण्याचे सरकारी निर्देश धाब्यावर बसविले तेव्हाही पुरोगामी बोल उमटले नाहीत. दिव्य मराठीला लेख लिहून अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रसिध्द कैवारी हमीद साहेबांनीही निष्पक्षता दाखविली नाही.


देव मंदिरात बंदिस्त झाले, ते काही करू शकत नाही. देवांनी कोरोना का संपविला नाही, शेवटी विज्ञानच श्रेष्ठ. लोकांना मंदिरांची नव्हे तर शाळा दवाखान्याची गरज आहे हे सिद्ध झाले. अश्या आशयाची नास्तिकतेला प्रोत्साहन करणारी गरळ कथित पुरोगाम्यांकडून सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. परंतु आज शाळा, कॉलेजही बंदच आहेत की. मग काय म्हणणार? आज मंदिरे बंद नसून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून भक्तांना मंदिरात जाऊ नका असे आवाहन केले असल्यामुळे तिथे नेहमीसारखी गर्दी नाही. मंदिर विश्वस्तांनी व भक्तांनी स्वेच्छेने कोरोनाच्या निर्मूलणासाठी हा निर्णय घेतला. मंदिरातील देवपूजा, आरती नियमित सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मंदिरे आपोआप बंद झालेली नाहीत की पुजारी सैरवैर पळत सुटलेले नाहीत. विशेष म्हणजे कोरोनामुळे जी प्रचंड आर्थिक मंदी पुढच्या काही दिवसात येणार आहे, तेव्हा देशभरातील याच हिंदू मंदिरांच्या दानपेट्या नेहमीप्रमाणे कामी येणार आहेत. अर्थात चर्च किंवा मशिदी यात काय हातभार लावतात, हा मोठा प्रश्नच आहे. पश्चिम महाराष्ट्रात येऊन गेलेल्या भयानक महापुराच्या वेळी सिद्धिविनायक मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, शिर्डीचे साईबाबा देवस्थान अश्या हिंदू मंदिरांकडून मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे व पुढेही प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ती होत राहणार आहे.


कोण कुठले पुरोगामी आरोप करतात आणि आपण त्यास खंडन करत बसण्याइतपत त्यांच्या आरोपात व टिकेत दम नाही. परंतु, महितीस्तव म्हणून सांगायचे झाल्यास विज्ञानाइतका पैसा आयुर्वेद, वैदिक शास्त्र, योगशास्त्र यावर खर्च झालेला नाही. केवळ पैसाच नव्हे, तर ही भारतीय शास्त्रे असूनही त्यांना मागील अनेक वर्षात शासनाकडून कसलेही प्रोत्साहन मिळालेले नाही. गोमूत्र आणि शेणापासून तयार होणारी शेकडो औषधे व उपचार आज उपलब्ध असून ते स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (IISER) वैज्ञानिकांनी गोमूत्रपासून वीजनिर्मिती होऊ शकते, असे सिद्ध करून दाखविले आहे. ३० ते ३५ मिली गोमूत्रपासून १.५ व्होल्ट इतकी विद्युत निर्मिती होते असे त्यांनी सांगितले. डॉ. मोहम्मद मुस्तफा यांच्या नेतृत्वात हे संशोधन झाले आहे. (संदर्भ: लोकसत्ता, २१/२/२०२०) त्यामुळे शेण गोमूत्र किती महत्वपूर्ण आहे यावर तर्क वितर्क लावत बसण्यात पुरोगाम्यांनी आपला वेळ घालवत बसू नये.


मानवी जीवन सुकर होण्यासाठी विज्ञान मोठा आविष्कार केला आहे, ज्यामुळे मानवी जीवन प्रचंड गतिमान झाले आहे. मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानातून अजूनही अनेक आविष्कार घडतील यात यत्किंचितही प्रश्न उपास्थित होऊ शकत नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण काळाची गरज आहे व ते घेतलेच पाहिजे. परंतु, आजच्या अनेक समस्यांचे मूळही विज्ञानच आहे हेही अमान्य करता येणार नाही. रासायनिक अस्त्र म्हणून तयार झालेला कोरोना विषाणू हे कोणाचे फळ आहे? हिंदू शास्त्राचे की विज्ञानाचे? भारतीय उपचार पद्धती व विज्ञान याची तुलना होऊ शकत नाही. ही दोघं दोन वेगळ्या दिशेला जाणारी मार्ग आहेत. 


कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेतली जाणारी खबरदारी म्हणजे पूर्वी हिंदूंच्या प्रथा कश्या शास्त्रशुद्ध होत्या व आज कसे सर्वांना त्याचे अनुकरण करावे लागत आहे असे सांगून अनेकजण अप्रत्यक्षरित्या शिवाशिव व विटाळ सारख्या निरर्थक गोष्टींचे समर्थन करतानाही दिसतात. महामारी पसरल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची तुलना अंत्यविधीनंतरची शरीरशुद्धी व स्त्रियांच्या बाबतीतले विटाळ व शिवाशिव याच्याशी करणे योग्य आहे का याचा विचार ज्याने त्याने केला पाहिजे. महामारी व मासिक पाळी, अंत्यविधी नंतरची शरीरशुद्धी यामध्ये खूप अंतर आहे. ते पाळण्याची कारणं कदाचित वेगळी असू शकतील परंतु, त्याची कोरोनामय परिस्थितीशी तुलना होऊ शकत नाही.  कोरोनासारख्या महामारीमुळे आज हजारो लोक मृत्युमुखी पडताना दिसत आहे. विटाळ व शिवाशिव न पाळल्यामुळे आजवर किती लोक मरण पावले हे कोणी विद्वान असल्यास त्याने सांगितले पाहिजे. भारतीय संस्कृतीने जे चांगलं दिलंय ते जग स्वीकारताना दिसत आहे. हात न मिळवता 'नमस्कार' करण्याची पद्धत अधिक चांगली असल्याचे एव्हाना जगानेही मान्य करण्यास सुरुवात केली हे त्याचे उदाहरण. परंतु, नामस्कारासोबत सर्वच जुन्या भारतीय रूढी योग्य होत्या असा समज करून घेणे चूकच. त्यामुळे कोरोनाच्या आडून छि थू करणारे इकडचे आणि तिकडचे दोन्ही प्रतिगामीच म्हंटले पाहिजे.

कोरोनासारखे वैश्विक संकट आ वासून उभे असताना ज्या विकृत मानसिकतेने ही चिखलफेक सुरू केली आहे, त्यांना समाजानेच धडा शिकवला पाहिजे. कोरोनाचा नाश करण्यासाठी विज्ञानाद्वारेच उपाय निघणार आहे. योगा किंवा भारतीय उपचार पद्धतीने कोरोना नामशेष होणार नाहीच, कोरोनाचा सहजासहजी लागण होऊ देणार नाही हेही खरेच. योगगुरू रामदेव बाबा आपल्या कार्यक्रमातून हेच सांगत आहे. योगा केल्याने कोरोना विषाणू मारणार नाही, परंतु, ज्यांना अजून लागण झालेली नाही त्यांनी योगा केल्यास  त्यांच्या शरीरावर कब्जा करण्यासाठी कोरोना विषाणूला सहज शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोनावर औषध निघत नाही तोवर स्वतःच्या बचावासाठी भारतीय उपचार पद्धती व योगा नक्की उपयोगी ठरू शकतो. यावर अधिक माहितीसाठी योगगुरू रामदेव बाबांचे कार्यक्रम पाहिल्यास अधिक माहिती मिळू शकेल. दिवा आणि विद्युत बल्ब, बैलगाडी आणि मोटारगाडी, होडी आणि जहाज आणि तुळस आणि पॅरासेटामोल यात जेवढे अंतर आहे, तेवढेच अंतर भारतीय उपचार पद्धती आणि विज्ञान यात आहे. दोघांचे महत्व आहेच, परंतु ते केवळ वेळ ठरवू शकते.

✍️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान