कोरोनातून सावरताना जेव्हा देश मोठा होतो..

कोरोनाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी मुकाबला करणारा देश म्हणून भारत असल्याचे नुकतेच WHO चे भारतातील प्रमुख हेंक बेकडम यांनी वक्तव्य केले. याचबरोबर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करायला विसरले नाहीत. आरोग्याच्या बाबतीत तसूभरही निष्काळजीपणा झाला तरी संयुक्त राष्ट्राच्या सभेत कान उपटणारी ही संस्था आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देशात अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज 62 लॅब तात्काळ उभारण्यात आल्या व अजून 52 लॅब उभारण्याच्या मागावर आहेत, हे सर्वात महत्वाचे काम सरकारने योग्य वेळी पार पाडले. दक्षिण आशियातही कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क देशांची तातडीनं कॉन्फरन्स मिटिंग घेऊन मोठ्या भावाची भूमिका घेतली. यामुळे सार्क देशांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. शिवाय कोरोनाच्या बाबतीत लढताना सार्क देशही आपले निर्विवाद योगदान देतील हे निश्चित. या कॉन्फरन्स नंतर मालदीव, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानच्या राष्ट्र प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आपल्याला भारतामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगत मोदींजींचे आभार मानले. 


काल पर्वा पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारेही आज खुल्या मनाने कौतुक वर्षाव करीत आहेत. महाराष्ट्रातील सुजय कदम हे त्याचं जिवंत उदाहरण. सुजय कदम यांची कन्या शिक्षणासाठी इटलीत गेली असता कोरोनामुळे अचानक सर्वदूर शटरडाऊन झाल्यामुळे अनेक अनिवासी भारतीयांप्रमाणे तीही इटलीत अडकली. तिच्या पित्याने सुजय कदम यांनी भारतीय दूतावासाला याबाबत मेल केला. त्यांना सरकार तातडीने काही करेल याची खात्रीच नव्हती. परंतु, कदम यांना दुसऱ्याच दिवशी भारतीय दूतावासकडून कॉल आला आणि तुमच्या मुलीला पर्वा भारतात आणले जाणार असल्याची माहिती दिली. कदम यांचा त्या बोलण्यावर विश्वासच बसेना. पण ते सत्य होतं. तिसऱ्या दिवशी खरच त्यांची मुलगी भारतात परतली होती व तिला आयटीबीपीच्या रुग्णालयात आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते. कदम यांनी यावेळी तेथील व्यवस्था पाहून सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानलेच शिवाय माझ्या मुलीचे मोदीदेखील पिता आहेत, त्यांनी सगळ्यांची एका बापाप्रमाणे काळजी घेतली आहे, अश्या शब्दात कौतुक केले. केवळ मोदी द्वेषाच्या डबक्यात बसवून घेतलेल्यांनी कधीतरी डोळसपणे याचा विचार केला पाहिजे.


हल्ली एक फॅशन झाली आहे. काहीही वाईट घडले की बोटं मोडायला लोकप्रतिनिधी आणि पुढारी सोयीस्करपणे सापडून जातात. पण देशात नागरिक सर्वोच्च असून जे काही चांगले वाईट घडत आहे त्याचा भागीदार सर्वात जास्त जनता असते. परंतु, स्वतःची केवळ खुशामत करायची आणि दोष मात्र झटकायचे हा मानवी स्वभावच आहे. पण एखादी व्यक्ती जेव्हा चांगले काही करते, तेव्हा तिची पक्षपात न करता स्तुतीदेखील करता आली पाहिजे. आज पक्ष विसरून लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना दिसून येत आहे, हे चांगलं लक्षण म्हणायला हवं.

कोरोनामुळे चीन, इटली, इराणसह अनेक देश परेशान झाले असताना भारताने याची खरंच उत्तम काळजी घेतली आहे. विदेशात अडकलेले अनिवासी भारतीय भारत सरकारने मोठ्या धैर्याने पुन्हा भारतात आणले. केवळ भारताचेच नव्हे तर श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पेरू, अमेरिका, मालदीव, नेपाळ या देशामधले नागरिकही भारतीय वायू दलाने यशस्वीपणे बाहेर काढले आहेत. या लोकांना आपला स्वतःचा देश बाहेर काढण्यापासून मागेपुढे पाहत होता, अश्यावेळी माणुसकी म्हणून भारताने त्यांनाही आश्रय देत उपचार सुरू केले. देशाच्या संस्कृतीचं आणि सरकारच्या मानवतावादी वृत्तीचं दर्शन यातून होतं. यामुळे निश्चितच देश मोठा होत असतो. 

चीन हा भारताचा एक प्रकारे शत्रूराष्ट्रच राहिला आहे. कोरोनाचा प्रकोप सर्वात अगोदर चीनला भोगावा लागला. त्यामुळे हजारोच्या संख्येने तिथे कोरोनाने बळी घेतले आहेत. अश्या परिस्थितीत अमेरिकेने सर्वात मोठे बलशाली राष्ट्र म्हणून माणुसकी दाखवून चीनला मदत करायला हवी होती, परंतु अमेरिकेने मदत दूरच पण चीनवर दोषारोप करण्यास सुरुवात केली. अमेरिका जर सुरुवातीलाच गांभीर्याने चीनच्या मदतीला धावून गेला असता तर जगात या विषाणूचा फैलाव झाला नसता. चीन अमेरिकेचे एकमेकांवर दोषारोप अजूनही सुरूच असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र पाठवून भारत आपली मदत करू शकतो असे सांगून तातडीने मास्क, प्रथमोपचार सामग्री व अन्य औषधी सामग्री भारताने चीनला रवाना केली. याबद्दल चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. हे औदार्य अमेरिकेची नाराजी ओढवणारंही सिद्ध होऊ शकतं. पण, ट्रम्प आणि मोदींच्या मैत्रीमुळे तसे होईल असे वाटत नाही. 
सीएए व एनआरसीच्या मुद्द्यावरून भारतात मोदी सरकारला मुस्लिम विरोधी ठरविण्याचा एक आंतरराष्ट्रीय कारस्थान मागील दोन महिन्यांपासून शिजत आहे. यावरून इराण, सौदी अरब, मलेशिया यांसारख्या मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना भारतीय मुसलमानांचा पुळका आल्याचं नाटकही केलं. परंतु, कोरोना येताच सर्व नाटकं उधळली गेली. कारण इराण, इटली, चीन मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये सर्वाधिक मुस्लिम होते, ज्यांना मदत करायची सोडून या देशांनी हात वर केले. ज्या पंतप्रधानांना मुस्लिमविरोधी ठरवले जात आहे, त्यांनी मात्र भारतीय वायू दलाचे विमान चक्क अद्ययावत लॅबसह त्या देशात पाठवून सर्व भारतीय नागरिकांना भारतात परत आणले. इराण मधील एक सामाजिक नेते इमाम नेते नरेंद्र मोदींच्या या कार्याचे कौतुक करत त्यांना 'रिअल किंग' (राजे) संबोधतात. "त्यांनी सर्वप्रथम कोरोनाशी लढताना संयुक्त राष्ट्रांकडे निधीसाठी मागणी केली. काही जोकर चीनच्या हुकूमशहा सोबत मोदींची तुलना करतात, त्यांनी हे लक्षात घ्यावे की मोदी नागरिकांना मारत नाहीत की पत्रकारांचा आवाज दाबत नाही. मोदी चांगलं काम करीत आहे." या शब्दात त्यांनी मोदींच्या कामाच  कौतुक केलं आहे. 

हा लेख लिहून केवळ नरेंद्र मोदींचे कौतुकपुराण मांडण्याचा हेतू नाही. देशात या अगोदरही चांगले नेते, मंत्री व पंतप्रधान होऊन गेले आहेत. भारतमातेच्या कुशीतून राष्ट्रभक्त लेकरे जन्मास येणं कधीच बंद होऊ शकत नाही. परंतु, भारताने इतिहासात आजवर अनेक परकीय आक्रमणं सहन केली आहेत. यात भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताला पुन्हा परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतरत्न एपीजे अब्दुल कालामांसारख्या अनेक देशभक्तांनी स्वप्न बघितले आहेत. ते साकार करण्यासाठी विश्वात भारताची प्रतिभाशाली प्रतिमा निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात जास्त यशस्वी ठरले आहेत. 

शेकडो आव्हानांचा सामना करत ही व्यक्ती केवळ देशाचा विचार करून एक एक क्षण देशसेवेत देत आहे. हे नेतृत्व आजवरच्या होऊन गेलेल्या नेतृत्वापेक्षा वेगळं आहे. चांगले कार्य करूनही त्याची स्तुती न होता केवळ निंदाच होत राहिली तर भविष्यात पुन्हा कोणी असा त्याग, समर्पण व प्रामाणिकपणे राष्ट्रकार्य करताना दहावेळा विचार करेल. चांगले करूनही लोक शिव्याशापच देतात, ही भावना तयार व्हायला भारतीय मन लवकर तयार होतं. त्यामुळे चांगल्या व्यक्तीला प्रोत्साहित करून जनतेनेही आपण खरोखर लोकशाहीप्रधान भारताचे खरे शहेनशहा असल्याचं दाखवून दिलं पाहिजे. जगाला जसा मोदींजींचा हेवा वाटतो आहे, तसा प्रत्येक भारतीयाचाही वाटायला हवा. तो जेव्हा वाटेल तेव्हा भारतास नक्कीच परम वैभव प्राप्त झालेले असेल. 

✍️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान