कोरोनाविरुद्ध लढणारा करुणामय भारत
कोरोनाविरुद्ध लढणारा करुणामय भारत
कोरोनाच्या विळख्यात जगभरातील अनेक देश पडले असताना विदेशात गेलेल्या आपल्याच नागरिकांना पुन्हा परत आणण्यास अनेक देशांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे एकतर आहे तिथेच गयावया करून उपचार करून घेणे किंवा आपल्या देशाची मदत मिळेल तोपर्यंत वाट पाहत बसणे याशिवाय दुसरा पर्याय कोणाकडे शिल्लक नाही. विदेशात गेलेले भारतीय नागरिक मात्र या बाबतीत नशीबवान ठरले आहेत.
भारत सरकारच्या योग्य नियोजनामुळे इराण, चीन, अमेरिका, इटली व अन्य कोरोनाग्रस्त देशातील नागरिकांना भारत सरकारने यापूर्वीच भारतात यशस्वी आणले आहे. चीनच्या वुहान शहरात भारतीय नागरिकांसह अडकलेले विदेशी नागरिक ताटकळत बसलेले असताना भारताने आपल्या नागरिकांना भारतात पुन्हा शरण दिलेच, शिवाय अन्य देशातील नागरिकांनाही सुखरूप त्यांच्या देशात सोडून अतिशय कौतुकास्पद महत्कार्य पार पडले आहेत. यामध्ये श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू येथील नागरिकांचा समावेश होता. या देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे याबद्दल आभार मानले आहेत.
चीनच्या वुहान शहरातून भारताने 76 भारतीय व 36 विदेशी नागरिकांना बाहेर काढले. या विदेशी नागरिकांमध्ये बांग्लादेश, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, मादागास्कर व मालदीवच्या नागरिकांचा समावेश होता. तब्बल 15 टन मेडिकल सामग्रीसह हे विमान चीनला रवाना झाले होते. वुहान शहरातून एकूण 723 भारतीय व 43 विदेशी नागरिक बाहेर काढल्या गेल्याचे वृत्त होते. जपानच्या टोकियो मधूनही 123 लोकांना बाहेर काढले, ज्यामध्ये भारताचे 119 व अन्य श्रीलंका, पेरू, दक्षिण आफ्रिकेचे नागरिक होते. भारतासारखी अशी शक्कल अमेरिकासुध्दा वापरू शकलेला नाही. त्यामुळे इराणसह सर्वच देश भारताच्या कामगिरीने अक्षरशः अवाक झाले.
स्वतःच्या माणसांसोबतच अन्य देशाच्या नागरिकांकडेही मानवतेच्या व बंधुत्वाच्या नजरेने पाहणारा एकमेव भारतच देश असू शकतो, हे अभिमानाने आपण म्हणू शकतो. "वसुधैव कुटुंबकम" हा शब्द जो आपण नेहमी ऐकत असतो, त्याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. भारतासाठी प्राकृतिक, भौगोलिक सीमा असतील पण भारताच्या मानवतेला, संस्कृतीला, बंधुत्वाला कसल्याही सीमा नाहीत हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे. अर्थातच या कार्यासाठी भारत सरकारसोबत भारताचे जिगरबाज सैनिकही मानकरी ठरतात. केवळ शस्त्रधारी शत्रूसोबतच नव्हे, तर कोरोना सारख्या आपत्तीसोबतही आपले जिगरबाज दोन हात करू शकतात हे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे.
या सगळ्यात आता एक अजून गंमतीशीर बाब आहे. इराणसह अन्य देशातून परत आणल्या गेलेल्या भारतीय लोकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम लोक आहेत. इराण मधून कालच भारतीय वायू दलाने आणलेल्या नागरिकांमध्ये मुस्लिम तरुण, महिला व पुरुषांचा समावेश होता, तर इटलीतून आणलेल्या 424 जणांमध्ये 103 हज यात्रेसाठी गेलेले मुस्लिम व 131 विद्यार्थी होते. देशात मागील तीन महिन्यापासून सीएए, एनआरसी च्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्या तथाकथित मुस्लिमप्रेमी संघटना व नेत्या पुढाऱ्यांनी यावर अवाक्षर काढण्याची हिम्मत केली नाही की सरकारच्या कामाची स्तुती केलेली नाही. सरकार मुस्लिम विरोधी आहे याचा उठता बसता जप करणारे कसे प्रत्येकवेळी तोंडघशी पडतात, हे त्याचं उदाहरण. 2014 च्या आणि 2019 च्या निवडणुकीत मोदी या माणसाकडे पाहून ज्या मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केलंय ते पुन्हा एकदा जिंकले आहेत व त्यांना भडकवणारे पुन्हा एकदा हरले आहेत, असं म्हंटलं तर वावगं ठरू नये.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतीय विमानसेवा बंद करण्यात आली अशी मध्यंतरी बातमी होती. त्यावर अनेकांना लगेच मानवतेचा पुळका आला होता. कोरोनाग्रस्तांना गोळ्या घालण्याचे आदेश देणाऱ्या किम जोंग सोबत मोदींजींची तुलना करायला काहींनी मागेपुढे पाहिले नाही. मोदी कसे हिटलर आणि हुकूमशाह आहेत हे पुन्हा ठासून सांगू लागले होते. परंतु, भारत सरकारची पुढची रणनीती काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मागील आठवडाभरात हजारो नागरिकांना भारतीय वायू दलाने विदेशातून सुखरूप परत आणले आहेत. शनिवार, 14 मार्च रोजी वायू दलाच्या विमानाने अख्खी मेडिकल लॅब इराणला रवाना झाली. इराण कोरोनाचा उपचार व प्रतिबंध करण्यात कमी पडत असताना त्याच्या भरवश्यावर थांबने योग्य नाही म्हणून भारताने हे पाऊल उचलले. तेथील भारतासह अन्य विदेशी नागरिकांची स्क्रीन टेस्ट करून त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू देखील झाले व त्यांना पुढच्या काही तासात भारतात आणल्या गेले.
भारताचे पंतप्रधान एवढ्यावर थांबलेले नाहीत. कोरोना हे जागतिक संकट असताना सार्क देशांची कॉन्फरन्स बैठक घेऊन भारताने दक्षिण आशियात पुन्हा एकदा पुढाकार घेऊन आपला मोठेपणा सिद्ध केला आहे. केवळ कोरोनाच्या मुद्यावर माणुसकी म्हणून विचार करतानाचे या बैठकीचे अलिखित नैतिक स्वरूप असताना पाकिस्तानने कोरोना सोडून काश्मीरवर आपली अक्कल पाजळल्याने स्वतःची लायकी काढून ठेवली. पाकच्या येडपटपणामुळे मोदींजींना नेहमीप्रमाणे बोनस पॉईंट मिळून गेला. अन्य देशाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय संथ गतीने होत असल्याचं एक निरीक्षण समोर आलं. त्यामागे सरकारने त्वरित केलेली उपाययोजना हे एक कारण आहे.
काही दिवसांपूर्वी इराण सीएए व एनआरसी मुद्द्यावरून भारताला लक्ष्य करत होता. भारताने मुस्लिम राष्ट्रासोबत पंगा घेऊ नये, कट्टर हिंदूंचा बंदोबस्त करावा व मुस्लिम विरोधातील अत्याचार थांबवावा असे इराण चे सर्वोच्च नेते आयातूल्ला खोमेनी यांनी म्हंटले होते. इराण चे परराष्ट्र मंत्री जावेद झारीफ यांनीही भारतात मुस्लिमांविरोधात संघटीतरीत्या हिंसाचार झाला, असे ट्विट केले होते. अर्थात भारताने यावर इराणची कानउघडणी केली होती.
भारताने व्यापार दृष्टिकोनातून अमेरिकेला जवळ केले म्हणून इराणचा हा जळफळाट होता. परंतु, कोरोनामुळे इराण इतका परेशान झाला आहे की त्याला मदतही कोणी करायला तयार नाही. जे मदत देऊ शकतात तेच त्यांचे मुस्लिम राष्ट्र कोरोनामुळे भयग्रस्त आहेत. त्यामुळे इराणने आता भारताकडे आपली झोळी पसरली आहे. भारताला धमकी देऊ पाहणारा याचक म्हणून आपल्या दारात उभा आहे. औदार्य व मानवता जोपासणारा श्रीकृष्ण व गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झालेला भारत इराणलाही मदत करेल यात शंका नाही. दया, शांती, करुणा, परोपकार ही तत्व भारताची उपजत तत्व आहेत. पण कोरोनाच्या निमित्ताने का होईना, पण ज्यांची मती भ्रष्ट झाली होती त्यांनी सुधारणा करून डोक्यातून भारतविरोध काढून टाकायला हवा. मग ते देशाबाहेरील असो किंवा देशातील.
✍️ कल्पेश जोशी, सोयगांव
🌐 lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा