सेना, मनसे आणि 'ते'
शरद पवार म्हणतात महाविकास आघाडीत मुस्लिमांच्या सांगण्यावरून सहभागी झालो. अशोक चव्हाण सांगतात महाविकास आघाडीत मुस्लिम समुदायाच्या आग्रहावरून सहभागी झालो. हुसेन दलवाई म्हणतात आम्ही सोनिया गांधी व पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा कसे वेगळे आहे हे समजावून सांगितले.
CAA व NRC च्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर गेलेले अल्पसंख्याक समुदायाचे मत पुन्हा आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी खुलेआम त्यांच्या मोर्चांना व आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हिंदूंच्या विरोधात गेल्यामुळे आपली सत्ता कोसळेल व भविष्यात फटका बसेल याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता वाटत नाही. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नाराज होईल आणि त्याचा परिणाम सत्तेवर होईल याचीही चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत नाही.
एवढी बेफिकिरी येण्यामागे या तिघाडी सरकारमध्ये काय ठरलं आहे? असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर एवढी विश्वास (?) ठेवून आहे. असे अनेक प्रश्न आज जनतेला पडत असतील. कारण एकीकडे शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होईल याची पार चिंता वाटते. त्यासाठी त्यांनी देशहिताचा व हिंदू हिताच्या CAA ला विरोध दर्शविला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील शैली बदलली आहे. हिंदू हितासाठी शिवसेना आज CAA व NRC साठी रस्त्यावर उतरली असती, तर उर अभिमानाने भरून आलं असतं अशी प्रतिक्रिया अनेक शिवसैनिक देत आहेत तर त्यात नवल वाटायला नको.
आज जे शिवसेनेकडून अपेक्षित होतं, ते योग्यवेळी राज ठाकरे करताना दिसत आहे. सगळेच शिवसैनिक म्हणतात, ज्यांनी शिवसेनेसोबत धोका केला त्यांची वाट लागली. पण, त्यांची वाट शिवसेनेसोबत धोका केला म्हणून नाही, तर हिंदुत्वासोबत धोका केला म्हणून लागली, हेही वास्तव आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब हिंदुत्वाचे महान साधक होते, त्यांना दगा म्हणजे हिंदुत्वाला दगा असं म्हंटलं जात होतं. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब यांना धोका दिला त्यांची वाईट गत झाली. भाजप सेना युतीत दुभंग झाला आणि सेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेली तेव्हा सेनेवर हिंदुत्वविरोधी म्हणून टीका करण्यात आली. केवळ भाजपला सोडले म्हणून हिंदुत्वविरोधी म्हणणे अयोग्यच होते. परंतु, सत्तेत आल्यावर शिवसेनेची भूमिका वादादतीतच ठरत आली आहे.
नागरिकत्व कायदा विरोधातील भूमिका, मुंबईच्या पालकमंत्रीपदी दहशतवादी याकूब मेमनसाठी दया याचिका करणाऱ्या अस्लम शेख यांची नेमणूक करणे एवढेच काय तर राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांचा वारंवार अवमान करूनही शिवसेनेने चकार शब्द देखील काढला नाही. त्यामुळे शिवसेनेवर चौफेर हिंदुत्व सोडले असल्याची आणि शिवसेनेने सोडलेलं हिंदुत्व मनसेने अंगिकारल्याची चर्चा होताना दिसत आहे.
©️ लेखाग्नी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा