पुस्तक, मोदी आणि बरंच काही...

पुस्तक, मोदी आणि बरंच काही...

छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे असंभव आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका भाषणादरम्यान म्हंटले होते. एवढेच काय तर मी शिवरायांना आदर्श मानतो व त्यांच्यासारखे गुण आत्मसात करून भारतमातेच्या सेवा करू इच्छितो असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एखाद्या लेखकाला किंवा व्यक्तीला काय वाटतं यात मोदींजींचा मुळात दोष नाही. तरीही चिखलफेक मात्र त्यांच्यावरच होतेय, हे काही योग्य नाही.


तथापि, या पुस्तकाच्या निमित्ताने आपण महापुरुषांप्रमाणे होण्याच्या केवळ गप्पाच मारू शकतो किंवा माराव्यात हेच अपेक्षित कार्यच की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सलूनवर गेल्यावर न्हाव्याला विशिष्ट कट करायला सांगायचा, पुतळे उभारायचे, विद्यापीठांना नावं देण्यासाठी भांडण करायची, पुतळे कापून पळवायचे, शाइफेक करायची, नाव ठेवायची, गाडीवर फोटो लावायचे, खंडण्या गोळा करून मिरवणुका काढायच्या वगैरे वगैरे अनेक दृढ पद्धती आज अवतरल्या आहेत, ज्याद्वारे आपल्याला आपल्या आदर्श व्यक्तीसारखे होता येते. त्या व्यक्तीच्या गुणांना, कर्तृत्वाला, कर्माला काही स्थान नाही व ते आत्मसातही कुणी करायचे नाहीत. या दिशेला हे वाद जाताना दिसत आहेत. त्यामुळे "मी ज्या क्षेत्रात काम करीन, तिथला मला शिवाजी व्हायचंय" हे सांगणाऱ्या नितीन बानगुडे पाटील सरांचं उद्बोधक भाषणं आणि शाखेतील "मी शिवाजी" हा खेळ दोघांवर पाणी फिरलं म्हणायचं की काय? 

अनेकजण या विवादित पुस्तकाचा मुद्दा करून मोदींजींना अतिशय गलिच्छ भाषेत बोलत आहेत, वर स्वतःला मावळे म्हणवून घेतात. हे सुद्धा तितकंच निंदनीय. महापुरुषांचे गुण आत्मसात करताना आपण ती व्यक्ती नाही होऊ शकत व आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी अन्य कुणाला तसं नाही करू शकत हे भान राखले पाहिजे. हेच भान जाणता राजा म्हणणारे व म्हणवणारे यांनीही ठेवले म्हणजे शिवरायांच्या नावावरून पुन्हा असे वाद होणारच नाहीत. पण सगळेच केवळ आपल्या विरोधकाला ठोकायला राजकीय मुद्दा मिळाला म्हणून अश्या विषयांकडे पाहतात, त्यांना आतून खरच किती आदर वगैरे असतो हा संशोधनाचा विषय.

खरं म्हणजे आज जे महान माणसं असतील ती लोकशाही प्रणालीमुळे कधीच कायमस्वरूपी महानच राहतील हे म्हणणंही अतार्किक ठरू शकते. कारण इथे प्रत्येकाचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे चांगल्या कामावरही टीका होतेच. मोदीजी महान झालेले त्यांच्या विरोधकांना चालणार नाही व पवार मोठे झालेले त्यांच्या विरोधकांना चालणार नाही.  इतरांसोबत असेच होते. निदान जिवंत असेपर्यंत तरी, कारण तितकी नैतिकता आपली अजून जिवंत आहे. ज्या दिवशी ती संपेल त्यादिवशी महापुरुष आणि सद्गुण वगैरे शब्दांना महत्व राहणार नाही. 

पण या पुस्तकाच्या निमित्ताने मोदीजी सूर्य नाहीत, पण साठचा बल्ब आहेत हे तरी त्यांच्या विरोधकांनी मान्य केले आहे. त्यांच्या जीवनाची ती सिद्धी असेल. कारण हा साठचा बल्ब पाकिस्तान, बांग्लादेशात मरणप्राय यातना सोसणाऱ्या कित्येक हिंदूंसाठी आज जणू सूर्यच ठरला आहे.

कित्येक गरीब, बेघर, वंचितांसाठी त्याने आशेचा नवा किरण दाखविला आहे. त्याने गझवा हिंद चे स्वप्न पाहणाऱ्या लक्षावधी धर्मांधांच्या झोपा उडविल्या आहेत. सैनिकी पराक्रम दाखविण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीही लागते, हे त्यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज भारताचा दबदबा वाढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. 

त्यामुळे आजच्या काजव्यांच्या युगात हा साठचा बल्ब उजवा ठरला आहे. कारण त्या बल्बचा आदर्श सुर्यासमान तेजस्वी जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या शिवछत्रपतीरुपी  सुर्यासोबत मोदींजींची तुलना होऊच शकत नाही. कारण तो काजव्यांच्या दुनियेतला बल्ब आहे...

©️ कल्पेश जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान