संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान...

संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान...

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचा विषय होता, 'संत साहित्य व बुवाबाजी'. प्रत्येकवेळी चिकित्सा व चर्चा या हिंदू संस्कृतीशी संबंधित विषयांवरच का? बायबल आणि कुराण बद्दल चर्चा व परिसंवाद घेण्याचे तथाकथित पुरोगामी साहित्यिक व आयोजकांकडे नाही का? आपल्या उदार अंतःकरणाने कधीतरी मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांचाही विचार करावा म्हणतो.


शेवटी तीही माणसंच. बिचारी कोणी फतवा काढला की लगेच दगड हाती घेतात आणि समाजसेवेचे ढोंग घे म्हंटल्यावर लगेच मदर तेरेसा होतात. वास्तवदर्शी जीवन महात्म्य आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन भारतमातेच्या सर्व लेकरांना देण्यासाठी कधी तसदी घेणार की नाहीत ही भुरटी माणसं?

कुणी मदरश्यात आधुनिक शिक्षण व विज्ञान तंत्रज्ञान शिकवू म्हंटले तर त्यालाही विरोध करायचा आणि आपणहूनही काही प्रयत्न करायचे नाही. मग या भुरट्या पुरोगाम्यांना भारतातील मुसलमानास काय फक्त आतंकवादीच करायचे आहे का? मुसलमानांच्या पोराने केवळ बंदूक आणि दगडच हाती घ्यायचे आणि आपला मात्र उद्देश साधून घ्यायचा असा तर या विचारवंतांचा उद्देश नाही ना?

तीन तलाक पद्धतीमुळे ज्या बिचाऱ्या महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले त्यांची या स्त्रीवादी व मानवाधिकार पाहणाऱ्यांना कीव आली नाही. फादर आणि नन्स मुळे पाश्चात्य देशात काय काय लफडी बाहेर आलीत त्यावर चर्चा नाही. भारतात समाजसेवेच्या नावाखाली गावची गावं ख्रिस्ती करण्यात येत आहे, त्यावर अवाक्षर नाही. वीस रुपयाची पाटी आणि दोन रुपयाची पेन्सिल दिली की झाली आमची शिक्षणसेवा. दोन तापाच्या आणि सर्दीच्या गोळ्या दिल्या की झाली यांची आरोग्यसेवा. या असल्या लबाड सेवेतून वस्त्यांमध्ये प्रवेश मिळवायचा आणि भूत, भानामती आणि जादूचे खेळ दाखवून बिचाऱ्या अडाणी व उपेक्षित समाजाला टार्गेट करायचं, अश्या अमानवी प्रवृत्तीवर जो धर्मग्रंथ आसूड ओढू शकत नाही तो धर्मग्रंथ कसला? केवळ दुसऱ्याच्या धर्माची बदनामी करून आपले दुकान चालवणाऱ्या या धार्मिक दलालांना धर्मगुरू म्हणावं की व्यवसायिक? व्यवसाय करणारा दुकानदार निदान आपल्याच मालाची गुणवत्ता सांगून धंदा चालवतो, पण हे तर दुसऱ्याचा माल कसा खराब हे सांगून दुकान चालवणारे धंदेवाईक आहेत.

ज्या धर्मातील साधू संतांनी "आता विश्वात्मकें देवे, येणे वागयज्ञी तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे" असे सांगून अख्या विश्वाचा विचार मांडला, सर्व मानवसृष्टीचा विचार केला व सन्मार्ग दाखविला त्या साधू संतांच्या साहित्यावर चर्चा करण्यापेक्षा संकुचित झालेल्या अन्य धर्म ग्रंथांवरची धूळ झटकली पाहिजे, हे महत्कार्य थोरपुरुष महात्मा फुले व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सतत जप करणाऱ्या पुरोगाम्यांकडूनच झाले पाहिजे. या महापुरुषांनी ज्याप्रमाणे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला तसा त्यांच्या भक्तांनी घ्यावयास हवा की नको. या महापुरुषांच्या नावावर किती दिवस आपले दुकान चालवणार? ज्या विषयावर अगोदरच पीएचडी झाली आहे त्यावरच निबंध उतरवणे आणि नकला करून भाषण ठोकणे बंद करून खऱ्या मानवतावादी विचाराचे उदाहरण  समाजासमोर ठेवलेच पाहिजे, ते दीडशहाण्या पुरोगाम्यांशिवाय दुसऱ्या कुणा शेमड्याला जमणारे आहे काय?

ज्या पुण्यभूमीत हे साहित्य संमेलन पार पडत आहे त्या पुण्यभूमित होऊन गेलेल्या संत गोरा कुंभारकडून भान विसरून विठ्ठल नामस्मरण करताना आपल्या कोवळ्या लेकरास चिखलात तुडवले गेले. ते मूल मेले. त्याच्या आईने दृश्य पाहून हंबरडा फोडला. दुःखात विव्हळत गोरोबाने स्वतःला प्रायश्चित्त म्हणून आपले हात छाटून घेतले. पुढे पंढरीच्या वारीत सर्व संतमेळा जमला असताना कीर्तनात विठ्ठलाच्या नावाचा उदो करत असताना आपले खुजे हात गोरोबाने वर केले आणि अचानक त्याचे हात पुन्हा पूर्वीसारखे झाले. त्याच्या पत्नीने हा चमत्कार पाहून श्री विठ्ठलाकडे आपले मूल परत मिळण्याची प्रार्थना करताच तिचे मूलही रांगत आले. भक्तिमार्ग सांगणाऱ्या व शुद्ध भक्तीची थोरवी प्रकट करणाऱ्या या पवित्र भूमीत संतसाहित्यावर परिसंवाद करणं म्हणजे समस्त संतांचा अवमान करण्यासारखे आहे.

©️ कल्पेश जोशी
kavesh37@yahoo.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान