फडणवीसांच्या निमित्याने...

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ अजून स्थापन होईना. आढावा बैठका घेण्यापलिकडे आणि स्थगिती देण्यापलिकडे मुख्यमंत्री महोदयांच्या हाती काही राहिलेले नाही. अश्या अस्ताव्यस्त व राज्य राम भरोसे सुरू असताना विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याची भाजपला मोठी संधी आहे. अश्या स्थितीचा फायदा घ्यायचा सोडून भाजपवाले करताय काय? असा प्रश्न माझ्यासोबत अनेकांना नक्कीच पडत असणार. याचे उत्तर फडणवीसांनी झी 24 तास वर झालेल्या मुलाखतीतून दिले आहे.


राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची दैना झालेली असताना या संधीचा फायदा घ्यायचे सोडून (मग्रूर, अहंकारी, सत्तापिपासू?) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला विधानसभेत वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांनी लवकर मंत्रिमंडळ स्थापन करून राज्याचा गाडा हकण्यास सुरुवात करावी. मग मी तोफ डागणार. 

फडणवीस अगदी कसेही असले आणि त्यांच्या विषयी कोणी काहीही विचार करत असले तरी त्यांनी जी राजकीय नैतिकता दाखवली आहे, ती राजकारणात उतरू पाहणाऱ्या नवख्या पिढीसाठी नैतिकतेचे चांगले उदाहरण आहे. "धटाशी धट, उद्धटाशी उद्धट" ही उक्तीच्या मर्यादाही याठिकाणी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत.

रामायण महाभारतासारख्या मालिका जरी पाहिल्या तरी त्यावेळी युद्धाचे काही अलिखित नियम ठरवले गेले होते हे लक्षात येते. सूर्योदय व सूर्यास्त दरम्यान युद्ध करण्याची परंपरा त्यावेळी प्रचलित होती व त्याची पालन केले जात होते. परंतु दानव मात्र बहुतांश वेळा सगळ्या नियमन व नैतिकतेला तिलांजली देत असत. आज 12 महिने 24 तास कामाचे वेळ असूनही एका ठराविक वेळेत सरकारी/शासकीय कामे बंद होतात. परंतु, अति महत्वाच्या प्रकरणात देश व राज्याच्या सुरक्षा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना मध्यरात्री न्यायालय व राजभवन खुले झालेले आपण नुकतेच बघितले आहे.

पूर्वी भारतीय भूमीच्या कक्षेतील राज्यांची (स्वकीय) आपापसात लढाया झाल्यास त्यात सारे नैतिक नियमांचे पालन होत असे. परंतु जेव्हा परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा आणि नैतिक नियमाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे नैतिकता व आपले संस्कृतील मूल्ये आपण कोणासोबत लागू करतोय याचे चिंतन करण्याची वेळ आली. तेव्हा अलेक्झांडरच्या विरोधात लढताना पोरस व चाणक्य यांनी जशास तसे या नियमाप्रमाणे शत्रूला पराभूत करून दाखविले. पुढील काळात अनेक भारतीय राज्यकर्त्यांनी साम दाम दंड भेद वापरून शत्रूला धूळ चारली आहे.

नैतिकतेचा थेट संबंध विवेकाशी असतो. व्यक्ती स्वयंविवेकानुसार नैतिकता व अनैतिकतेचा विचार करतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर युद्धाची परिभाषा बदलली. शस्त्रांची जागा शास्त्राने व आंदोलन मोर्च्यांनी घेतली. मागील 75 वर्षाच्या काळात कोणी नैतिकता पाळली व किती नैतिकतेचे हनन केले हे सर्वज्ञात आहे. परंतु, राजकारणातील डाव - प्रतिडाव व कुरघोड्यांमुळे राजकारण गलिच्छ झाले आहे असा सर्वदूर समज झालेला आहे. अश्या परिस्थितीत कोणीतरी नैतिकता दाखवली यामुळे हायसे वाटत आहे. ही नैतिकता व असेच औदार्य सगळ्या नेत्या पुढाऱ्यांनी यापूर्वीही दाखवले असेलच. पण फडणवीसांच्या निमित्ताने ते पुन्हा समोर आले आहे. हे औदार्य फडणवीसांच्या पक्षाला फायदा करून देणारे आहे की तोटा यावर वेगळे चिंतन होऊ शकते. तो भाग वेगळा. पण तूर्तास त्यांच्या राजकीय औदार्याचे स्वागत तसेच औदार्य दाखवून झाले पाहिजे. कारण नेहमीच संधीचे सोने करण्यापेक्षा संधीचे सदगुण करता आले पाहिजे. ते फडणवीसांनी केले आहे.

✍️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान