खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले...

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले...

लक्षावधी क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्र्य यज्ञात आहुती दिल्यानंतर इंग्रजांच्या जुलुमी राजवतीतून आपला भारत देश 1947 साली स्वातंत्र्य झाला. आज त्याला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. सत्तर वर्षांपूर्वी आपल्या देशातून इंग्रज निघून गेले, पण आपल्यासाठी कायमस्वरूपी काही वाद निर्माण करून गेले. भारत पाकिस्तान फाळणी हा त्याचाच एक भाग. प्रचंड रक्तपात झाल्यानंतर देश स्थिरस्थावर होऊ लागला, तोच पाकिस्तानच्या कुरापत्या सुरू झाल्या. पाकिस्तानची वक्रदृष्टी आपल्या स्वर्गासमान जम्मू काश्मीरच्या भूमीवर पडली आणि कलम 370 नावाची डोकेदुखी निर्माण झाली. यावर्षी या कलम 370 चे विसर्जन झाले, म्हणून हा स्वातंत्र्य दिवस विशेष महत्वाचा आहे.

राष्ट्रीय उत्सव म्हणून या वर्षी कलम 370 च्या विसर्जनाच्या निमित्ताने 5 ऑगस्ट या नवीन दिवसाची भर पडली. भारताच्या एकतेचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांचे अपूर्ण कार्य पूर्ण झाले. त्यासाठी याच सरदार पटेलांच्या जन्मभूमितील दोन धुरंधर नेत्यांनी धाडस दाखवले. अर्थातच ते म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच आहेत. बऱ्याच वेळा परिणामांची चिंता नसताना किंवा परिणाम काय होतील याबाबत माहिती नसताना लोक धाडस दाखवतात, परंतु कलम 370 हटविण्याचे शिवधनुष्य सरकारने पेलले त्याची किती काटेकोरपणे यंत्रणा लावली हे दिसून येत आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यपासून कलम 370 हा वादातीत  विषय होता. या एका कलमामुळे जम्मू काश्मीरमधील आपल्याच बांधवाना फुटीरतावादी आणि पाक पुरस्कृत आतंकवाद्यांच्या दडपशाहिला बळी पडावे लागत होते. या सर्व लोकांची आता यातून मुक्तता होणार आहे.

कलम 370 चे भारताच्या शिरावर प्रत्यारोपण करण्यात आले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमास विरोध दर्शविला होता. भारताच्या समानता, सार्वभौमत्व व अखंडता या तत्वास या कलमामुळे तडा जातो, असे त्यांचे मत होते. यामुळे देशाचा विश्वासघात केल्यासारखे होईल. परंतु जम्मू काश्मीरच्या नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तत्कालीन सरकारने या कलमचे रोपण केले. परंतु गेल्या सत्तर वर्षात जम्मू काश्मीर अशांत आहे. त्यामागील अनेक कारणांपैकी एक कलम 370 होते. ते आज अस्तित्वात राहिले नाही ही भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे. 

सुरुवातीला असे वाटत होते, की कलम 370 म्हणजे जणू जम्मू काश्मीर मधील मुस्लिम समाजाशी संबंधित कलम असावी. परंतु तसे नसून ती तेथे वास्तव्य करणाऱ्या  सर्वधर्मीय नागरिकांशी संबंधित होती. आता तर कलम 370 च्या विसर्जनाची पाठराखण आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी केले आहे. भारत एक प्राचीन राष्ट्र असून काश्मीर कधीच पाकिस्तानचा हिस्सा होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे समर्थनच होत आहे असे दिसून येते.

कलम 370 ला देशातील अनेक राजकीय सामाजिक संघटना मागील सत्तर वर्षांपासून विरोध दर्शवत आल्या होत्या. त्यामुळे या मुद्द्यावर देशात सत्तर वर्ष विचार मंथन होण्याची प्रक्रिया झाली आहे. देशासाठी हितकारक नसूनही एका आमूलाग्र बदलासाठी देशात अशी चर्चा होणे हा लोकशाहीचा विजय आहे. आज देशात सत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरी होत आहे. आता जम्मू काश्मीर मधील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे सरकारपुढील आव्हान आहे, ते कसे पूर्ण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

©️कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान