डॉ. केशव बळीराम हेडगेवार

डॉ. केशव बळीराम हेडगेवार


"हिंदू समाजाचे सुख दुःख हेच माझे व माझ्या कुटुंबाचे सुख दुःख आहे. हिंदूंवरील संकट हे माझ्यावरील संकट आहे. हिंदूंचा अपमान हा माझा व माझ्या परिवाराचा अपमान आहे. अशी वृत्ती जेव्हा हिंदू समाजात निर्माण होणे हाच राष्ट्रधर्मचा मूलमंत्र आहे" हा विचार ज्यांनी रुजवला ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार; म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या अराजकीय संघटनेचे संस्थापक.

1925 आली ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे रोप लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला असून जगभरात 53 देशात संघाचे अविरत कार्य सुरू आहे. त्यांचा जन्म 1889 मध्ये महाराष्ट्रातील कुंदकुर्ती गावात झाला. वैद्यक शास्त्राचे (MBBS) त्यांचे शिक्षण झाले असूनही संपूर्ण आयुष्य त्यांनी देश व समाज यासाठीच खर्ची घातले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाज जर स्वसंरक्षणक्षम झाला तर देशावर पुन्हा परकीयांची सत्ताच येऊ शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी देशातील समस्त हिंदूंना आपापसातील भेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले.

कलकत्त्यातील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण कलकत्त्यात घेतले. तेथे अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य बनले. भविष्यात नागपुरात परतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक स्वातंत्र्यलढ्यात आंदोलनांमध्ये भाग घेतला. प्रसंगी कारावासही भोगला. सत्याग्रह सुरू असताना जंगल सत्याग्रहमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसची वाट सोडून आपला संघ प्रवास सुरू केला.

आपल्या काही सहकार्‍यांसोबत त्यांनी नागपुरातील एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. या एक तासाच्या शाखेतून त्यांनी देशाचे भविष्य निर्माण करण्यास सुरुवात केली होती. चारित्र्यसंपन्न व्यक्ती निर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघ स्थापनेतून केला होता. कारण डॉक्टर हेडगेवार हे कुशल संघटक मार्गदर्शक अभ्यासक व दूरदृष्टी असलेले नेते होते.

प्रखर राष्ट्रभक्तीचे बाळकडू त्यांना त्यांच्या बालपणीच मिळाले होते. शाळेत असताना व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिठाई वाटण्यात आली होती. ती त्यांनी फेकून दिली. तसेच पुढे 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. पण ते मागे हटले नव्हते.

डॉ. हेडगेवारांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दानी, एकनाथजी रानडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय असे कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. हेडगेवारांनी 1925 ते 1940 या पंधरा वर्षाच्या काळात देशभर प्रवास केला व एकेक माणूस, कार्यकर्ता स्वयंसेवक घडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याग, सेवा, समर्पण भावना, दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध निश्चल व व्रतस्थ कार्य जीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती.

दिनांक 21 जून 1940 साली डॉक्टरांचे निधन झाले. स्वतः संघाचे संस्थापक असूनही त्यांनी स्वतःला गुरु स्थानी ठेवले नाही. त्यांनी भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवण्यास स्वयंसेवकांना सांगितले व पटवून दिले. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी कधीही विचार केला नाही आणि भविष्यातही आपले कार्य महत्त्वाचे आहे; प्रसिद्धी नाही असा विचार व संस्कार त्यांनी स्वयंसेवकांवर रुजवला. आज देशात सर्व क्षेत्रात त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते आहेत, हे त्यांच्या प्रयत्नांचेच यश आहे.

©️कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान