अण्णाभाऊंचा रशिया प्रवास

अण्णाभाऊंचा रशिया प्रवास

माझा रशियाचा प्रवास या पुस्तकाच्या माडग्यामातून अण्णाभाऊंनी आपले रशियातील प्रवास वर्णन मांडले आहे. वाचकाला अण्णाभाऊ सहजगत्या रशियात त्यांच्या समवेत घेऊन जातात. मॉस्को, लेनिनग्राड, ताश्कंद या शहराची ओळख वाचताना होते. अण्णाभाऊंनी या पुस्तकात या सर्व शहरांची, तेथील पोकांची, तेथील राज्यव्यवस्थेची व समाजव्यवस्थेचा ममोकले पणाने स्तुती केलेली दिसून येते. साम्यवादाने अण्णाभाऊ प्रभावित झाले असल्याने व लेनिनसम साम्यवादी नेत्यांची चरित्रे वाचल्याने त्यांना लेनिनचा रशिया पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून होती हे ते पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिव छत्रपती वाचल्यानंतर किंवा जाणता राजा वाचल्यानन्तर एखाद्या शिवभक्ताला जशी रायगडाची प्रचंड ओढ लागते तशी ओढ अण्णाभाऊंना रशियाची लागली होती. रशिया विषयी वाचन करताना अण्णाभाऊंनी आपल्या समरतीत जो रशिया निर्माण केला होता त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते उतावीळ झाले होते. 

1961 मध्ये अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. याच वेळी अण्णाभाऊंनी रशियाला जावं अस इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीने ठरवले. त्यानुसार अण्णाभाऊंना रशिया जाण्याची संधी प्राप्त झाली होती. मुंबईत आचार्य अत्रे आणि दिल्लीत कॉ. डांगे यांचे आशीर्वाद घेऊन अण्णाभाऊ रशियाकडे विमानाने झेपावतात. 

देश सोडून जाताना मनातील वेदना अण्णाभाऊनी अतिशय सुरेश मांडली आहे. गणगोत, देश, घर सोडून जाताना किती दुःख होत ते अण्णाभाऊ मांडतात. एकीकडे देश सोडताना होणारे दुःख तर दुसरीकडे रशिया पाहण्याची लागलेली उत्सुकता यामुळे अण्णाभाऊंच्या मनात दोन विरोधी भावनांचे मिश्रण निर्माण झाले होते. दिल्लीहून निघालेले भारतीय विमान ताश्कंद पर्यंत घेऊन आले आणि तेठुन पुढे त्यांना दुसऱ्या विमानाने मॉस्को शहर गाठले. तेथील थंडीने अण्णाभाऊंच्या व त्यांच्यासह असलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि सुरू झाले रशिया दर्शन.

अण्णाभाऊंच्या या प्रवास वर्णनात एक बाब स्पष्ट जाणवते. ती म्हणजे त्यांनी केलेली रशियाची व त्यातही समाजवादी व साम्यवादाची स्तुती. अण्णाभाऊ यासाठी वेगवेगळी दाखले देतात व भारतातली व्यवस्थेपेक्षा राशियातली समाजवादी व्यवस्था काशी यशस्वी ठरत आहे व येथील लोक कसे सुखी संपन्न आयुष्य जगत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. अण्णाभाऊ ज्या शहरात फिरले त्या ठिकाणी सुख, संपन्नता, शांतता, स्वच्छता यासारख्या बाबी त्यांना स्वाभाविकपणे प्रकर्षाने जाणवतात. त्यावरून अण्णाभाऊ रशीयाचे कौतुक करतात, हेही अगदी स्वाभाविक आहे. कारण जे दिसते ते लिहिणे हा अण्णाभाऊंच्या स्वभावच होता. परंतु अण्णाभाऊंनी खरच "खरा" रशिया पहिला का, किंवा अण्णाभाऊंना खरच "खरा" रशिया पाहू दिला का? असा प्रश्न कोणाही व्यक्तीच्या मनात सहज निर्माण होऊ शकतो. करण अण्णाभाऊ 1960 च्या ज्या रशियाचे कौतुक करतात तोच रशिया 1990 साली कोसळला आहे. तेथील भयानक दारिद्र्याच्या व विषमतेच्या कथा त्यावेकी जगाला माहीत झाल्या होत्या. राशीयत साम्यवादाचा शेवट झाला होता. अण्णाभाऊ ज्या रशियन लोकांचं कौतुक करत त्यांना शांतताप्रिय, रसिक, फुले म्हणून अलंकारिक करतात त्याच सच्च्या मानवतावादी लोकांनी लेनिन स्टॅलिन चे पुतळे उध्वस्त केले. यावेळी अण्णाभाऊ हयात असते तर त्यांचेही साम्यवादाच्या बाबतीत आपले मत 
बदलले असते. कारण सत्य व वास्तव स्वीकारणे हाच त्यांचा स्वभाव होता. परंतु यावरून संपूर्ण रशिया किंवा तेथील व्यवस्था वाईट किंवा चुकीची होती असे म्हणता येणार नाही. कारण तेथील लोकांनी आपली एक देशभक्तीची, स्वच्छता व शिस्तबद्धतेची एक सवय लावली होती. लोकसंख्या प्रमाणात असल्यामुळे तेथे असे परिवर्तन होणे शक्य झाले असेल. 

परंतु भारतातील व्यवस्था, अस्वच्छता, भारतीय लोकांची आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, येथील व्यासनांधता व दारिद्र्य याचे राशीयतील येणाऱ्या काही अनुभवाशी अशी काही तुलना केली आहे की जी येथील समाजाच्या व लोकांच्या वाईट सवयीना उघडं नागडं करते. एका रेल्वे प्रवासातील अनुभव सांगताना अण्णाभाऊना बोरिबंदरच्या स्टेशनची आठवण होते. तेथील गर्दी, कोलाहल, धावपळ, मारामाऱ्या, डब्यात ठासून भरलेली माणसं, त्यांचा गलका त्यांच्या हाडीमासी भिनलेला असताना त्यांना हा रेल्वे प्रवास कसासाच वाटतो. बोरिबांदरप्रमाणे या ठिकाणी काहीच नव्हतं. सर्वत्र शांतता. फलाटावर जळकी काडी नव्हती की पेटती सिगारेट नव्हती. पोस्टरांची जत्रा भरलेली नव्हती. यावरून भाऊ कल्पना करतात, की "येथे थुंकू नये असं पोस्टर लावताच त्यावर पान खाऊन थुंकणारा प्राणी रशियात नसावा. नाहीतर इतकं सुंदर पोस्टर घटकोपरला इतक्या आरामात काय राहतं? पोस्टारवरच्या मीनाकुमारीला मिश्या लावणाऱ्या आणि पृथ्वीराजच्या मिश्या भादरणाऱ्या कलावंतांनी कधीच आपली कला दाखवली असती." अण्णाभाऊंनी केलेली ही कल्पना आपल्या देशातील वास्तव आहे. जे बदलण्यासाठी अण्णाभाऊंच्या सगळा खटाटोप होता. त्यांचे साहित्य वाचले की असा अनुभव वारंवार येतो. 

या पुस्तकातून अण्णाभाऊंनी एक गोष्ट भारतीयांना व विशेषतः अभिमान वाटावा अशी नमूद केलि आहे. लेनिनग्राड येथे भाऊंना तातीयनाबाई भेटतात. ज्यां आपल्या सर्व मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अण्णाभाऊंना भेटायला आलेल्या असतात. अण्णाभाऊंच्या चित्रा कादंबरीचे रशियन भाषेत भाषांतर करण्यासाठी या तातीयनाबाईंनीच मेहनत घेतलेली होती. याच बाईंनी मराठी-रशियन असा शब्दकोश तयार केलेला होता आणि विशेष म्हणजे आचार्य अत्रे या तातीयनाबाईचे गुरू असल्याचे त्या भाऊंना सांगतात. पुढे भाऊंना कॉ. पी ए बरनिकोव भेटले. भाऊंचे दुभाषी म्हणून ते काम करणार होते. यांनी तुलसीरामायणाचा गद्यात अनुवाद केलेला होता. हिंदी भाषेचे पंडित अशी त्यांची ख्याती होती. तसेच मॉस्को शहरात भाऊंना एब्गेनी चेलीशैव भेटतात. ते शिवाजी महाराजांचे चरित्र रशियन भाषेत लिहीत होते. त्यांनी लो. टिळक, पं. नेहरू, याचेही चरित्र लिहलेली होती. तसेच रामायण व महाभारत या ग्रंथांचाही त्यांनी अनुवाद केलेला होता. यावरून रशीयाची थेट मराठी भाषेसोबत नाळ जोडली गेली असल्याचे हे प्रसंग दाखवून देतात. 

देशातील आजच्या वर्तमान परिस्थितीला अण्णाभाऊंचे काही प्रसंग चपखल बसतात.
बाकु शहरातील एका मशिदीत अण्णाभाऊ जातात. सोविएत (कम्युनिस्टांच्या) देशात धार्मिक विधीला बंदी असते, हा आरोप खोटा असल्याचं सांगत अण्णाभाऊ या प्रसंगाचं उदाहरण देऊन हा आरोप खोडुन दाखवतात. याचा अर्थ अण्णाभाऊ साम्यवादी विचाराने प्रभावित झालेले असले तरीही ते सर्व धर्माना आदरानेच पाहत होते हे स्पष्ट होते. पण साम्यवादी विचारांचे राज्य असलेल्या भारतातील राज्यांमध्ये हिंदूंची कश्या प्रकारे गळचेपी होतेय, कश्याप्रकारे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाते व कश्याप्रकारे त्यांच्या हत्या केल्या जातात, हे चित्र पाहिले असते, तर भाऊंना हा स्वातंत्र्य हिरावून घेणारा काळ्या काळजाचा साम्यवाद कधीही पटला रुचला नसता. 

आज देशात "तीन तलाक, बुरखा बंदी व महिला स्वातंत्र्य" याविषयी जे काही रणकंदन मजले आहे त्यावर अण्णाभाऊंनी आपल्याला आलेल्या उझबेकिस्तानचा अनुभव विशद केलेला आहे. अण्णाभाऊ लिहितात, आज उज्बेकिस्तान ची उन्नती पाहून माणूस तोंडात बोटं घालतो पूर्वी इथे बुरखा पद्धती भयंकर होती स्त्रियांना बुरखा घ्यावा लागत होता पण आज तिथं एकही बुरखा दिसत नाही उलट सर्व महत्त्वाच्या जागी स्त्रियाच असल्याचे दिसून येते याचे एकच उदाहरण म्हणजे उजबेकिस्तान या  घटक राष्ट्राच्या अध्यक्षपदावर एक स्त्री आज विराजमान आहे आणि एकूण एक माणूस तेथे साक्षर आहे." मुस्लिम महिलांच्या  स्वातंत्र्याबाबत अण्णाभाऊंचे असे विचार कधी समोर आले नाही; किंबहुना येऊ दिले नाहीत. कारण अण्णाभाऊंना केवळ कम्युनिझम च्या चौकटीत बंदिस्त करण्याचा घाट घातला गेल्याची शंकाच निर्माण होते. देशातील आजच्या तथाकथित मानवतावादी लोकांनी अण्णाभाऊंना अश्या प्रकारे विचार मांडले म्हणून एक तर "काफिर" तरी ठरवले असते किंवा "इस्लाम के दुश्मन" तरी ठरवले असते.

रशियातील प्रवासात अण्णाभाऊनी मॉस्को, ताश्कंद, बाकु, लेनिनग्राड अश्या मोठमोठ्या शहरांना भेटी दिल्या. यात त्यांनी तेथील माणसांना निरखून पाहिले. त्यांची जी बोलीभाषा, स्वभाव, संस्कार व वृत्ती अण्णाभाऊंनी अनुभवली ती या प्रवास वर्णनात मांडली आहे. अण्णाभाऊ तेथील कलारसिक, साहित्य प्रेमी व  समाज जीवन पाहून भारावून गेले. भारतातील गरिबी व दारिद्र्य पाहून दुःखी झालेले भाऊ रशियात गेल्यावर चकित झाले. तेथील सुखी संपन्न प्रदेश व शांतताप्रिय समाज पाहून भाऊंना त्यांचे अप्रूप वाटले आणि परिवर्तनाची एक नवी आशा घेऊन भाऊ मायदेशी परतले. 

©️कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान