सीमोल्लंघन कलम ३७० चे

सीमोल्लंघन कलम ३७० चे

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. साडे तीनशेहून अधिक संस्थाने सरदार पटेलांच्या प्रयत्नामुळे भारतीय संघराज्यात सामील होण्यास तयार झाले. पण जुनागड संस्थान, हैद्राबाद संस्थान आणि जम्मू काश्मीर मात्र आपले स्वतंत्र्य राष्ट्र तयार करण्यासाठी तयारी करत होते. जम्मू काश्मीर येथे त्यावेळी महाराजा हरिसिंग राजगादीवर बसले होते. जनता बहुसंख्य मुस्लीम आणि राजा मात्र हिंदू अशी जम्मू  काश्मीरमधील त्यावेळची परिस्थिती होती. 

    अश्या परिस्थितीत पाकिस्तानने २१ ऑक्टोबर १९४७ रोजी एक क्रूर डाव रचला व जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे तीन हजारहून अधिक सशस्त्र सैनिक नागरी वेशात जम्मू काश्मीरमध्ये शिरले. त्यांनी तेथील जमिनीवर कब्जा करण्याबरोबरच प्रचंड उच्छाद मांडला. पश्चिम जम्मू काश्मीर भागातील पश्तून मुसलमानांनी राजा हरिसिंग विरुध्द विद्रोह केला. पाकिस्तान पुरस्कृत लष्करी गुंड श्रीनगरच्या जवळ येऊन पोहचले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे दिसताच राजा हरिसिंग यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी भारताकडे मदत मागितली. त्यानुसार भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राजा हरिसिंग यांच्यात एक करार झाला व यामुळे भारताला काश्मीरच्या सुरक्षा, परराष्ट्र धोरण व दूरसंचार या तीन विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला व जम्मू काश्मीर भारताच्या स्वाधीन झाले. 

     या अधिकारानुसार भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरच्या रक्षणार्थ पाकिस्तानी सैन्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानी लष्कर बिथरले व माघार घेऊ लागले. भारतीय सैन्य व पाकिस्तान पुरस्कृत सैन्यामध्ये युद्ध सुरूच होते. युध्द थांबण्याचे नाव घेत नव्हते, पण भारत पाकिस्तानला जम्मू काश्मीरच्या कब्जा केलेल्या जमिनीवरून पुन्हा हाकलून लावत होता. अश्या वेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला मध्यस्ती करण्यास भाग पाडून त्यांच्या आदेशानुसार ‘जैसे थे’ परिस्थिती मान्य केली व पाकिस्तानी पुरस्कृत सैन्याने जितका जम्मू काश्मीर गिळंकृत केला होता तितका त्यांच्या ताब्यात गेला. तोच आजचा पाकव्याप्त काश्मीर (POK) होय. ज्याला मुस्लीम कट्टरतावादी आझाद काश्मीरही म्हणतात. सध्या एकूण जम्मू काश्मीरच्या ४५% हिस्सा भारताकडे, तर उर्वरित हिस्सा पाकिस्तान कडे आहे. त्यापैकी २० % हिस्सा पाकिस्तानने चीनला १९६२ मध्ये परस्पर देऊ केला आहे. 

      युद्धबंदी नंतर राजा हरिसिंग यांच्यासोबत झालेल्या करारानुसार जम्मू काश्मीरचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात येणार होते. त्याची निर्मिती १९५४ मध्ये पूर्ण झाली. तोपर्यंत भारताच्या संविधानानुसार कलम ३७० अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन  तेथील व्यवस्था सुरु होती. १९५४ मध्ये जम्मू काश्मीरचे स्वतंत्र संविधान लागू झाले, त्याच बरोबर भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार कलम ३५ (अ) देखील लागू करण्यात आले. ज्यामुळे जम्मू काश्मीरला देशातील अन्य राज्यांपेक्षा वेगळे काही विशेषाधिकार मिळाले. संसदेत कसलीही चर्चा न होता हे नवीन कलम लागू केल्यामुळे यास प्रचंड विरोध झाला होता. तत्कालीन कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या कलमास विरोध दर्शविला होता. परंतु, तत्कालीन सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार दिले तर ते भारताविरुद्ध बंड न करता व पाकिस्तान पुरस्कृत फुटीरतावाद्यांच्या राष्ट्रभेदी कारस्थानांना बळी न पडता शांततेत राहतील, असा भारत सरकारचा यामागील हेतू होता.

     परंतु, झाले उलटेच. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या संगनमताने स्थानिक नागरिकही भारताविरुद्ध विद्रोह करू लागले. कलम ३७० व कलम ३५ (अ) मुळे जम्मू काश्मीरला स्वतंत्र राष्ट्रध्वज, स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र नागरिकत्व मिळाले होते. कलम ३७० नुसार केंद्र जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती उद्भवल्यास आर्थिक आणीबाणी लादू शकत नव्हते. इतर राज्यांच्या बाबतीत कायदा करण्याचे सर्वोच्च अधिकार संसदेचे असतात, मात्र जम्मू काश्मीरमध्ये हे अधिकार विधानसभेकडे सुरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे जम्मू काश्मीर राज्यात नवीन कायदे करण्यास अडचणी येत होत्या. भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्यं जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हती. तसेच या कायद्यामुळे भारतातील कोणाही व्यक्तीला जम्मू काश्मीर मधील जमीन अथवा मालमत्ता खरेदी करता येणार नव्हती होती. येथील महिलेसोबत भारतातील कोण्याही पुरुषाला विवाह करता येणार नव्हता. असे झाल्यास त्या महिलेचे जम्मू काश्मीरचे नागरिकत्वच नष्ट होणार होते, मात्र पाकिस्तानी नागरीकासोबत विवाह झाल्यास त्याला जम्मू काश्मीरचे नागरिकत्व मिळू शकेल अशी तरतूद करण्यात आली होती. याचा फायदा आतंकवाद्यांनी घेण्यास सुरुवात केली व कित्येक पाकिस्तानी नागरिकांनी अनधिकृतपणे केवळ काश्मिरी मुलींशी विवाह करून जम्मू काश्मीरचे नागरिकत्व मिळवले व तेथे भारताविरुद्ध कारवाया सुरु केल्या.

       या विशेषाधिकारमुळे पाकिस्तानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भारताच्या सैनिकांवर दगडफेक करणे, पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करणे, भारताविरुद्ध देशद्रोही वक्तव्ये करणे, भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा वारंवार अपमान करणे व आतंकवाद्यांना आश्रय देणे अश्या घटना वाढीस लागल्या होत्या. परंतु जम्मू काश्मीरचे नागरिक नाराज होतील व भारताविरुद्ध विद्रोह करतील या भीतीमुळे आजवर सरकारने कलम ३७० व कलम ३५ (अ) ला हात लावण्याची हिम्मत केली नव्हती. परंतु, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने तेथील नागरिक व लोक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कायदेशीररित्या संसदेत चर्चा घडवून आणली व बहुमताने कलम ३७० हटवून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढलेला कलम ३७० हटविण्याचा अध्यादेश सार्थ ठरवून दाखविला.

        भारत सरकारने जम्मू काश्मीरचे विशेषाधिकार काढून जम्मू काश्मीर व लडाख अशी दोन केंद्रशासित राज्ये अस्तित्वात आणली. ज्यांचे नियंत्रण व शासन केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहील. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व सीमेवरील सुरक्षा प्रबळ होणार असून त्यामुळे आतंकवाद्यांना भारतात शिरण्याअगोदर दहा वेळेस विचार करावा लागेल. जम्मू काश्मीर मधील राज्यध्वज काढून त्याजागी आता तिरंगा डौलाने फडकत आहे. जम्मू काश्मीर मध्ये रोजगार निर्माण होण्यासाठी सरकारने मोठी तयारी सुरु केली असून तेथील जनता सरकारच्या या निर्णयामुळे सुख व शांततेचा अनुभव करत आहे. जम्मू काश्मीरमधील विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. ज्या काश्मिरी तरुणांना पैसे देऊन दगडफेक केली जात होती, त्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे. जम्मू काश्मीरमधील पाकिस्तान धार्जिणे लोक सोडले तर तेथील समस्त जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. काश्मीर मधून हाकलून लावलेल्या लाखो हिंदू काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे १९४७ च्या युद्धात पाकिस्तानने अनधिकृतपणे बळकावलेला भारताचा हिस्सा म्हणजेच POK आता कायदेशीररित्या भारताचा अविभाज्य हिस्सा बनला आहे. त्यामुळे कलम ३७० हटवल्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले आहेत. ही किमया छत्रपती शिवरायांचे संस्कार व प्रखर राष्ट्रवादी संस्कार यामुळेच शक्य होऊ शकली आहे.

©️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान