अपराजित 'शदर वपार'

अपराजित 'शदर वपार'

मागे एकदा क्रिकेट खेळताना आम्ही फायनल मॅच अगदी जिंकत आलो होतो. खूप वर्षांनी आमच्या कॉलेज ला ट्रॉफी मिळेल याचा आनंद होता. प्रामाणिक लोकांचा राजा हरिश्चंद्र बनून खेळताना आम्ही हरत आलो होतो. यावेळी कॅप्टन बदलला होता, खेळाडू बदलले होते आणि रणनीती ही. त्याचाच परिपाक विजय दिसत होता. मोठे कष्ट घेऊन आणि धूर्त आणि रडीचा डाव खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना पराजयची धूळ चारली होती. 

यंदा पुन्हा आमने सामने आलो होतो. देवेंद्र च्या नेतृत्वात लढत होतो. समोरच्या टीम चा कर्णधार शदर वपार तसा वयाने मोठा, मुरब्बी पण केवळ नामधारीच. जुन्या टीम सोबत त्याचा पाला पडला होता, म्हणूनच आयुष्य भरात केवळ 66 धावा करूनही 'जाणता ख्वाजा' म्हणून नावाजला. पण नव्या दमाच्या देवेंद्र ने पहिल्याच सामन्यात 122 रन्स केले तरी त्याचे चेले अजूनही त्याच्यातच बाप शोधत होते व पिकल्या केसांना डाय करत होते. 

राष्ट्रीय पातळीवर जाऊन टीमचा कर्णधार व्हायचं शदरचं मधूस्वप्न. पण स्वप्न दोष नित्याचा. राज्य स्तरावर 66 च्या वर कधी जाता आले नाही. चिअर अप करण्यासाठी भाड्याचे प्रेक्षक व चाहते लावणारा हा पठ्ठ्या अखेर वयाने ज्येष्ठ असल्याने प्रसिद्धीत मोठा झाला. आज त्याचा 'नटसम्राट' झाला असूनही भाडोत्री चाहत्यांकडून 'कोण आला रे कोण आला...' च्या घोषणा देऊन स्वतःला प्रतिस्पर्ध्यांचा 'पॉलिटिकल बाप' करून घेण्यात त्याला विरळाच आनंद आहे. त्यात तो माहीर. 

असो, आज निवृत्तीच्या अनेक कानगोष्टया मिटवत शदर नियतीशी लढत होता. त्याचे रडीचे डाव, अप्रामाणिकपणा व घोटाळ्यामुळे भाडोत्री चाहत्यांशीवाय कोणी जवळ करायला तयार नव्हते. उलट त्याच्या संघातील अनेक जण त्याच्या अश्या वृत्तीमुळे संघ सोडून दुसऱ्या संघात जाऊ लागले होते. पण शदर पक्का कपटखिलाडी. 

शेवटचा बाण सहानुभूतीचा म्हणून ऐन सामना हरण्याच्या स्थितीत आजारी तरी पडायचे किंवा छोटा मोठा अपघात करून घ्यायचा असे त्याने मनोमन ठरवले होते. घड्याळातल्या वेळेचं गणित जुळवून आणलं आणि सामना सुरू व्हायच्या अगोदरच त्याला निवड समितीने मोठा आरोप ठेऊन बाहेर काढलं. त्याच्या भाडोत्री चाहत्यांनी अक्षरशः आभाळ डोक्यावर घेतलं. सारे मैदानात उतरले. सामनाच होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. शदर आजोबांना घाबरूनच आमच्या संघाने कारस्थान रचले, अशी पोपटपंची सुरू केली. झालं. शिरजोर व्हायचं निमित्यच मिळालं होतं.
 
वास्तविक सर्व गोंधळा अंती सामना झाला.  शदर हरला होता. देवेंद्र जिंकला होता. पण...पण... फक्त सहानुभूतीच्या जीवावर शदरने हरूनही हरण्याच्या दुःखात स्वतःला पडू दिले नव्हते व आपल्या चाहत्यांनाही नैराश्यातून वाचविले होते. घड्याळाचे काटे फिरले होते. नियती आली होती. आम्ही जिंकलो होतो. पण शदर हरला नव्हता. 

©️कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान