कसे झाले? कोणी केले?
कसे झाले? कोणी केले?
#अन्वयार्थ
'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' हा नारा घेऊन भाजपाने २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली असताना राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शपथ घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला न भूतो साक्षात सेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्याच्या रुपात मिळाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या आहेत. आणि या सगळ्यात मिडिया व समाज माध्यमांचा वापार किती प्रभावी ठरावी ठरू शकतो हे या सर्व घडामोडीने सिद्ध केले आहे.
पाच वर्ष निष्पक्षपणे व सचोटीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाबरोबरच अचानक राजकीय वारे काय बदलतात आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडत विरोधी पक्षात भाजप तर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार काय स्थापन होते. हे सारे अजब वाटत असले तरी वास्तव आहे. वाटायला हे सारं एखाद्या गोष्टीप्रमाणे असले तरी या स्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला शरद पवारांचे पावसातील भाषण. शरद पवारांच्या पावसातील भाषणानंतर समाज माध्यमात पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणजे हतबल लढवय्याकडील शेवटचा पर्याय म्हणून वापरण्यात येणारे ब्रह्मास्त्र असते, हे पवारांनी सिद्ध करून दाखवले. पवारांनी हे अस्त्र अचूक वेळी वापरले. भाजप सेना आपल्याच अतिआत्मविश्वासाच्या विश्वात रममाण असताना ऐन मतदानाच्या दोन दिवस अगोदर महायुती घायाळ झाली. यावेळी दुर्लक्ष करण्यापलीकडे महायुतीच्या हाती काही राहिले नाही. शरद पवारांनी आलेल्या परिस्थितीचा फायदा अगदी विचारपूर्वक घेतला आणि मिडिया आणि समाज माध्यमात शरद पवारांना मिळणार्या सहानुभूतीचा जणू विस्फोट झाला. यातून अडगळीकडे निघालेली राष्ट्रवादी धुगधुगीत का होईना पण आज पुन्हा मार्गावर आली आहे.
निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी ते अपूर्ण आहे. या अर्धवट यशामुळे बहुमतापासून भाजप दूर राहिला आहे. महायुतीला मात्र राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले. निवडणूकपूर्वी राज्यभरात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतु, भाजपला बहुमत न मिळाल्यामुळे शिवसेनेने बंद दाराआडच्या चर्चेच्या एकमेव मुद्द्याने एवढे चक्र फिरवले कि आज महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजित झाले आहे. निवडणूकपूर्वी प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शिवसेनेला मान्य होते, परंतु निकालात भाजप अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला सत्ता स्थापणेसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य करण्यास सुरुवात केली. या वाक्याचा अर्थ महाविकास आघाडीला जन्म घालत सेनेचा मुख्यमंत्री होऊन स्पष्ट झाला. त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले तर नाईलाजाने महायुती म्हणून सत्तेत सहभागी व्हायचे आणि भाजप अल्पमतात आले तर जितके ओरबाडता येईल तितके घेऊन किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता मिळवायची व आपल्यापेक्षा लहान असलेल्या परंतु सद्य स्थितीस मोठा भाऊ झालेल्या भाजपला रोखायची संधी सोडायची नाही असा डाव ठरला होता हेदेखील आता स्पष्ट झाले आहे.
निवडणूक काळात विरोधी पक्षाकडे भाजपला रोखण्यासाठी ठोस मुद्दे नव्हते. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, अॅट्रॉसिटी कायदा, भीमा-कोरेगाव प्रकरण व आधीच्या सरकारांच्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी झालेल्या योजना या व अश्या सर्व मुद्द्यांना योग्य न्याय दिल्यामुळे फडणवीस सरकार कमजोर होण्यापेक्षा अधिक मजबूत झाले होते. त्यामुळे भाजप विरोधी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी आपला मोर्चा भाजपविषयी जन माणसात नाराजी निर्माण करण्याकडे वळविला. भाजप आजवर ज्या ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठा झाला, त्यांच्यावर कश्याप्रकारे अन्याय होत आहे हे भाजप नव्हे, भाजपच्या विरोधी पक्षांनी सांगण्यास सुरुवात केली. २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना कसे डावलले जाते हे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीच पुढे आणले. भाजप पक्षांतर्गत काय निर्णय घेतो हा तसा पक्षाचा विषय परंतु, याविषयी भाजप विरोधी पक्षांना काळजी वाटण्याचे कारण चकित करणारे आहे. भाजपने निष्ठावानांना डावलून चूक केली कि नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण, यापेक्षा त्यांच्या या निर्णयाचा विरोधकांनी मात्र फायदा उचलला हे खरे.
२०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर वाजपेयी आणि अडवाणी यांच्यावर मोदी-शाह यांनी अन्याय केला व स्वतः हिरो झाले हे दाखविण्याचा हा प्रयत्न झाला होता. याचीच पुनरावृत्ती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी स्वतः हिरो होण्यासाठी आपल्या मार्गातील काटे म्हणून खडसे, तावडे यांना कसे बाजूला केले हे सोयीस्कररित्या समाज माध्यमात पसरविले. कॉंग्रेसच्या राहुल गांधींना कुत्र्याशी खेळायला वेळ असतो पण आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांशी बोलायला वेळ नसतो यावर कधी याबद्दल कुठल्या पुरोगाम्याला वाईट वाटले नाही. काँग्रेसचे नेते राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क समितीच्या पदावरून का पायउतार झाले, हेही कोणाला ठाऊक नाही. शिवसेनेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सध्या कुठे आहेत, हा प्रश्न कोणाला पडत नाही. माझी पक्षाला गरज राहिलेली नाही असे संजय निरुपम का म्हणाले, याचा विचार कोणाला करावासा वाटला नाही. माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण पक्षावर का नाराज आहे, याबद्दल माहिती असूनही बोलणे टाळले जाते. जयदत्त क्षीरसागर यांच्यावर राष्ट्रवादीत काय अन्याय झाला हेही दडपले जाते. शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांना डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली तेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता का, त्यामुळे केवळ भाजपला घेरून त्यांच्या मत गठ्ठ्यात खिंडार पाडण्यात विरोधक यशस्वी ठरले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
या वेळच्या निवडणुकीत समाज माध्यमाचा जबरदस्त उपयोग राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला (कि झाला?) आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून भाजपविरोधी पवित्रा घेऊन डाव्यांनी व पुरोगाम्यांनीही यात उडी घेतली. शिवसेना परवडली पण भाजप नको, म्हणून राष्ट्रीय स्तरावर डाव्या-पुरोगामी (डा-पू) चळवळीतही डाव प्रतिडाव शिजले आहेत. सेना-राष्ट्रवादीच्या रॉकेटला याच चळवळीचा बूस्टर मिळाला. शिवाय भाजप विरोधी अन्य लहान सहान गटातही जान आली. शरद पवार पावसात भिजल्यानंतरचा काळ व अगदी काल परवा पर्यंत देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्यापर्यंत हे सारे गट गावापासून शहरापर्यंत सार्वजनिक ठिकाणी सक्रीय होते. जनता विकासाच्या नादी लागून जातीय अस्मितेपासून दूर झाल्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीची अक्षरशः अस्तित्वाची लढाई सुरु झाली होती (व आहे). देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून याच जातीय अस्मिता या डा-पूंनी पुन्हा प्रज्वलित केली. त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. हिंदुत्ववादी असलेली भाजप-सेना युती डापूंसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने भाजप सेना मध्ये केवळ फुटच नाही तर ते आपसी (सध्यातरी) कट्टर शत्रू झाल्यामुळे त्यांनाही यश आले आहे.
डापूंच्या कळपात अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संघटना सहभागी आहेत. सामाजिक संघटना व चळवळीचा राजकारणाशी तसा काही संबंध नसतो. पण डापूंचे मनसुबे या निमित्त्याने उघड पडले आहेत. राजकीय शक्तीशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य आहे, असा युक्तिवाद याठिकाणी डापूकडून केला गेला. डा-पूंच्या एका बैठकीत हजेरी लावल्यामुळे, त्यांचे सद्य स्थितीतील राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व सेना-भाजपविषयी असलेले मत कळू शकले. भाजप ब्राम्हणवादी संघाच्या नियंत्रणात असलेला पक्ष आहे. आपल्यास खरा धोका भाजपपासून आहे. शिवसेना मात्र बहुजनांचा पक्ष असल्याचे त्याच्या बाजूने मंथन तिथे सुरु होते. म्हणून शिवसेनेला डापूंचे अप्रत्यक्ष समर्थन होते व या निवडणुकीच्या खेळात तेही सहभागी होते हे निश्चित. म्हणून सत्ता परिवर्तनाचे चाणक्य जनतेने शरद पवारांना जरी ठरवून टाकले असले तरी या सत्ता परिवर्तानामागे केवळ शरद पवार नाहीत, व ही केवळ राजकीय लढाई नाही हेही तितकेच खरे.
भाजप-सेना युती भंग करून सत्तेचा हातातोंडाशी आलेला हात फडणवीस-अजित पवार युतीने हिरावून घेतल्यावर डा-पू बावचळले व मिडिया व समाज माध्यमात पुन्हा भाजपविरोधी प्रतिमा तयार केली गेली. नेहमी संविधान, गनिमी कावा, स्वातंत्र्य अश्या संकल्पनांचा जप करनाऱ्या विरोधकांना भाजपचा रात्रीच्या अंधारात केलेला गनिमी कावा व राजकीय कुरघोडी मात्र पचनी पडली नाही. त्यामुळे फडणवीस पुन्हा जाणीवपूर्वक ट्रोल झाले. यात भाजपचा आयटी सेल अपयशी ठरला (?). आता येत्या काळात भाजपला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, युपीएला सामील असलेले अन्य छोटे प्रादेशिक पक्ष, डावे-पुरोगामी व नव्याने सामील झालेल्या शिवसेना समर्थक हिंदुत्ववादी गटाचाही सामना करावा लागणार आहे.
आता निवडणुका झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत बसले आहेत. डा-पूंच्या इच्छेनुसार उद्धव ठाकरे सत्तेत तर भाजप विरोधक म्हणून बसले आहेत. विधानसभेतील पुढील गोंधळ भाजप-सेना म्हणजेच 'हिंदुत्व' विरुद्ध 'हिंदुत्व' असाच होणार आहे. सेनेचे सत्तेतील मित्र काँग्रेस-राष्ट्रवादी यात आग लावण्याचे चोख काम बजावणार आहे. सगळ्या घडून गेलेल्या राजकारणात सेनेची सत्ता लाचारी झाकत भाजपच्या अंतर्गत मतभेदांमुळे, पक्षांतर्गत गटबाजीमुळे, अयारामांना घेतल्यामुळे व भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळेच भाजपचे नुकसान झाले हे भाजपच्याच कार्यकर्त्यांवर सोयीस्करपणे थोपविणार आहे. त्याची सुरुवात झाली असून या नवीन डावातील पात्रे 'देवेंद्र फडणवीस' आणि 'अमित शाह' निवडले गेले आहेत. देवेंद्र फडणवीस राजकारणात मोठे होऊन भविष्यात केंद्रात आपल्या मार्गात अडथळा होऊ नये, म्हणून अमित शाह यांनी जाणीवपूर्वक फडणवीसांना मदत केली नाही असा प्रचार झाल्यास नवल वाटून घेऊ नये.
✍️ कल्पेश गजानन जोशी
kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा