त्यागसूर्य सावरकर...
त्यागसूर्य सावरकर...
घराची परिस्थिती इतकी वाईट नसतानाही इंग्रजांच्या राजवटीत देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी केली. ज्या वयात भविष्याची स्वप्ने रंगवली जातात व मौज मजा केली जाते, त्या वयात शत्रूला "मारता मारता मरे तो झुंजेन" अशी प्रतिज्ञा केली व ती सार्थकी ठरवली सुद्धा.
नुकतंच लग्न झालेलं असताना नववधू पत्नीचा व घरातल्या सर्वच प्रेमीजनांचा निरोप घेऊन देशासाठी (नाव शिक्षणाचे, पण गेले होते क्रांतिकार्यासाठीच) इंग्लंडला रवाना झाले.
पत्नीच्या एका पत्राला सावरकर उत्तर देतात, "आपल्या एकट्याच्या संसाराचं काय घेऊन बसलीस, आज भलेही आपल्याला आपल्या सुखावर पाणी सोडावं लागतंय; पण आपल्या त्यागामुळे उद्या देशातील लाखो कुटुंबे स्वतंत्र भारतात सुखाचा श्वास घेऊ शकतील. त्याचं काय?" असा उदात्त हेतू बाळगून केवळ देशासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या संसारावर या पती पत्नीने तुळशीपत्र ठेवलं.
सावरकर विदेशात असतानाच त्यांचा मुलगा प्रभाकर याचा बालपणीच दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या क्षणी त्यांचा पत्नीला आधार हवा होता, त्या क्षणी ते फक्त पत्र लिहून तिचं सांत्वन करू शकले. दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्यावर कोसळला. ह्या त्यागाची साक्ष देणारं "सागरा प्राण हा तळमळला" हे अजरामर काव्य तेव्हा तयार झाले.
तात्यारावांना अटक झाल्यावर इकडे भगुरला त्यांच्या घरातील पत्नीसह वहिनींनाही वनवास झाला. इंग्रज सरकारने घराला सीलबंद केलं. सावरकर कुटुंब उघड्यावर आले. त्यांना मदत करणाऱ्यांनाही सरकारने दंड ठोठावला. अश्या परिस्थितीत या कुटुंबाला रस्त्याच्या बाजूला व गुरांच्या गोठ्यात दिवस काढावे लागले.
तात्यारावांनी बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केले. पण केवळ "ब्रिटिश सरकारसोबत प्रामाणिक राहीन" असा करार करायचा नव्हता, म्हणून बॅरिस्टरच्या पदवीवरही पाणी सोडले.
पन्नास वर्षाची जन्मठेपची शिक्षा इंग्रज सरकारने ठोठावली. एवढी मोठी शिक्षा तत्कालीन इंग्रज सरकारने कोणाला ठोठावली असेल असं वाटत नाही. पण तात्याराव हसतमुखाने काळ्यापाण्याला सामोरे गेले. काळे पाणी म्हंटले की लोक एकवेळ मृत्यू स्वीकारत, पण काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला घाबरत असत. अशी भयंकर शिक्षा 11 वर्ष त्यांनी भोगली. पण नुसताच शिक्षा भोगत बसणं म्हणजे जीवन व्यर्थ घालणे होतं. देशासाठी काही करायचं असेल तर अंदामानातून बाहेर पडण्यातच शहाणपण होते. ते त्यांनी स्वीकारले व इंग्रजांना खोटा माफीनामा सादर केला. अंदामानातून सोडल्यानंतर ते नजर कैदेतच होते.
------------
मला कळलेल्या सावरकरांच्या आयुष्यातील ही काही त्यागाची उदाहरणे. सावरकर जसे जसे वाचण्यात येतात, तसतसा त्यांचा त्याग कळतो. समुद्रात जसजसे शिरावे तसतशी त्याची खोली वाढतच जाते तसेच काहीसे. पण सावरकर ज्याला कळले तो आयुष्यात कधीच डळमळू शकत नाही. सावरकर ज्याला कळले त्याला आपण करत असलेल्या देशसेवेचा, सेवाकार्याचा व त्यागाचा अहंकारही शिवू शकत नाही. सावरकर ज्याला कळले त्याच्याकडे खचलेल्याना उठून उभं करण्याची व बळ देण्याची चमत्कारिक शक्ती आपोआप मिळते. केवळ तात्याराव सावरकरच नाही तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाने प्रचंड त्रास सोसला आहे, त्याग केला आहे, बलिदान दिले आहे. कदाचित देशभक्तीचे जिवंत रूप म्हणजे सावरकर कुटुंब असावे. अश्या या देशभक्त परिवारास व त्यागसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना त्रिवार वंदन!
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
©️कल्पेश जोशी, सोयगांव
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा