सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?
सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?
लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, ममता बॅनर्जी, साध्वी प्रज्ञा, केजरीवाल व प्रियांका गांधीसह अजून काही नावे सदासर्वकाळ चर्चेत होती. राज्यात देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, अजित पवार, उद्धव ठाकरे अश्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण यासोबतच राज्यात एक नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे 'राज ठाकरे'.
राज ठाकरे यांचे लोकसभेत अस्तित्व शून्य, तर विधानसभेतही शून्यच. अनेक पालिकांमध्ये असलेल्या त्यांच्या सदस्यांनीही पक्षांतर करून पक्षाला रामराम ठोकलेला आहे. २००९-१० मध्ये विधान सभा निवडणुकांत त्यांचे ११ आमदार निवडून आले होते आणि आता इथून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहील अशी मतं राजकीय ज्योतिष्यांनी वर्तवली होती. परंतु जन्मजात ज्योतिषीच चुकतो असे नाही, तर पुरोगामी व उच्च शिक्षित इंग्रजीत भविष्य वर्तवणारे तथाकथित राजकीय भविष्यकारही तोंडावर आपटले, जेव्हा २०१४ च्या विधानसभेत मनसेची पीछेहाट झाली. २००९ च्या आपल्या भविष्यवाणीस अनेकांनी संभाळण्याचा तेव्हा अयशस्वी प्रयत्न केला.
सत्तेचं एक तत्व राज ठाकरे यांनी मांडलं होतं. एका मुलाखतीत ते बोलले होते की राजकीय सत्ता ही झोपाळ्यासारखी असते. कधी ती चांगली उंची गाठते, तर कधी तळात येऊन बसते. राज ठाकरे तेव्हा नरेंद्र मोदींविषयी बोलत होते. त्यात चुकीचे काही नव्हते. पण हा झोपाळा जेव्हा खाली येत असतो तेव्हा संधी साधून त्यात बसायचे असते, नाहीतर तो थोड्याच वेळात पुन्हा उंचावर निघून जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तेच झाले. विरोधकांना झोपाळ्यात बसता आले नाही. मोदींचा झोपाळा पुन्हा वर गेला व त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली. हा झाला लोकसभेचा खेळ. पण, विधानसभेचा झोपाळा खाली येण्याची चाहूल लागलेला राज्यात बहुधा एकच नेता असावा, तो म्हणजे राज ठाकरे. पण आयत्या बिळावर नागोबा होऊन बसणाऱ्या शरद पवारांनी राज ठाकरेंच्या भविष्याला पाहिले आणि त्यांना झोपाळ्यात बसायच्या आत आपल्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसूनही व मोदींविषयी आस्था असणारा एक नेता शड्डू थोपटतो यावरून ते लक्षात येते. शरद पवारांनी राज ठाकरेंना भुरळ पाडली, असा प्राथमिक निष्कर्ष त्यातून निघतो.
केंद्राप्रमाणेच राज्यातही आज विरोधी पक्ष म्हणून कोणीही बलवान दिसत नाही. भाजप आघाडी सोडली तर राज्यात एक पोकळी तयार झाली आहे. ती पोकळी भरून निघायच्या आत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा उभारू शकेल काय ही शंका होती ती अधिक गडद झाली. त्यामुळे राज्यात आज लोकांचा काँग्रेस राष्ट्रवादीवरचा विश्वास उडाला आहे असे म्हंटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे याला पर्याय कोण? असा प्रश्न पडल्यावर दलित मुस्लिम वर्ग 'वंचित बहुजन आघाडी' व 'एमआयएम'कडे पाहताना दिसतो, तर अन्य वर्ग राज ठाकरेंच्या मनसेचा विचार करताना दिसत आहे. सत्तेत भाजप सेना असावी व विरोधी पक्षात राज ठाकरेंचा मनसे पक्ष असावा अशी लोकांची ही इच्छा निर्माण होत आहे. त्याची सुरुवात 'लाव रे तो व्हिडिओ' पासून सुरू झाली आहे.
राजकारणाची नाडी परीक्षण करता येणाऱ्या शरद पवारांनी हे लवकर ओळखले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीतच मनसेचे एक वातावरण तयार होण्याच्या आत जाळे पसरविले. त्यात राज ठाकरे अडकल्यासारखे जाणवतात. पण अजूनही ते पूरते फसले नाही असे मानायला जागा आहे. पण लोकसभेत मी तुमची मदत करतो, विधानसभेत तुम्ही माझी मदत करा अशी सेटिंग लागली असेल; तर होणारे नुकसान मनसेचे व पर्यायाने राज ठाकरेंचेच अधिक असेल. कारण आज राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी कुपोषित अवस्थेत गेलेली असताना त्यांच्या पक्षाला गरुडझेप घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. विरोधी पक्ष म्हणून जी पोकळी तयार झाली आहे, ती भरून काढण्याची सुवर्णसंधी मनसेला मिळाली आहे. पण नेत्या पुढाऱ्यांच्या हेटाळणीला व सोशल मीडियात सतत ट्रोल होत असल्यामुळे शीघ्रकोपी स्वभावाचे राज साहेब काहीही करून आपल्या टिंगलखोरांना कृतीतून प्रत्युत्तर देण्याचे घाई करत आहे. त्यामुळे नशिबात 'कॅडबरी' असताना राज ठाकरे 'बिस्किटा'च्या मोहास बळी पडताना दिसत आहे. थोडा धीर धरल्यास त्यांना 'अच्छे दिन' येतील. पण घाई केल्यास मात्र बिस्किटातही वाटा पडू शकतो. कारण राज ठाकरेंच्या नशिबात 'कॅडबरी' आहे, हे बारामतीकरांनी हेरलं आहे. तेव्हा ते राज ठाकरेंनाच आपलंसं करण्यासाठी काहीही करतील. कारण 'सत्तेची कॅडबरी' त्यांना प्रचंड प्रिय आहे, हे तरी राज यांनी लक्षात घ्यायला हवं.
©️कल्पेश जोशी, सोयगांव
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा