‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’


‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा काल स्मृतिदिन होता. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त्य त्यांच्या स्मृतीस्थळावर अनेक राजकीय लोकांनी भाऊगर्दी केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले ते सारे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमले  होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य होते. कसले आहे हे हास्य? कसला आहे हा आनंद? आम्ही बाळासाहेब यांना हयात असताना पराभूत करू शकलो नाही, पण केवळ एका वाघाच्या डोक्यात अहंकाराचे बीज तयार झाल्याने अख्ख्या शिवसेनेला सुरुंग लागत असल्याचे दिसत असल्यामुळे हा आनंद? त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे या विदृपतेने काळवंडलेले आहे.

शिवसेना स्थापन होईपर्यंत राज्यात काँग्रेसचेच एकशाही राज्य होते. कानाकोपऱ्यात त्यांच्या मतपेढ्या तयार झाल्या होत्या. पण एका प्रस्थापित सत्तेविरुद्ध स्व. बाळासाहेबांच्या रूपाने मोठा लढा उभा राहिला. त्यात सर्वात आधी मुंबईतील मराठी माणसाचे शिवसेनेने मन जिंकले. मुंबई महानगरपालिका पासून सुरू झालेला शिवसेनेचा विजयरथ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विधानसभा व नंतर लोकसभा मध्येही वर्चस्व गाजवू लागला. काँग्रेसच्या मतपेढीला यामुळे खिंडार पडले. त्यातच शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीचाही जन्म झालेला होता. शिवसेना आपले अस्तित्व निर्माण करत असताना रांगु लागलेल्या राष्ट्रवादीला फटका बसला होता. त्यामुळे स्व. बाळासाहेब यांनी केवळ शिवसेनेचे अस्तित्वच निर्माण केले नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित सत्ताकेंद्राला खिळखिळे करून सोडले. त्यामुळे तत्कालीन इंदिरा गांधी व नंतर सोनिया गांधी साऱ्यांचीच डोकेदुखी वाढली होती. तर राज्यातील तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेवर खूप संतप्त झाले होते. त्यांचा ठणाणा शरद पवार व बाळासाहेब यांचे वाकयुद्ध पाहिल्यास लक्षात येतो. आज राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेना भाजप पासून फुटत असल्यापेक्षा ती हिंदुत्व आणि त्यांच्या प्रस्थापित मतपेढीपासून फुटणार हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लक्षात आले आहे. यामुळे केवळ राज्यातीलच नव्हेवतर केंद्रातील ही राजकारण ढवळून निघणार आहे आणि यात नुकसान मात्र भाजप आणि सेनेलाच हिण्याची शंका आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील विद्रुप हास्य का दिसत आहे, ते यावरून लक्षात येईल.

बाळासाहेब हयात असताना जे शिवसेनेला धक्का लावू शकले नाहीत, ते आज उद्धव ठाकरे या सच्च्या शिवसैनिकाच्या नेतृत्वातील सेनेला संजय राऊत यांच्या माध्यमातून सेनेला सुरुंग लाऊन सेना संपविण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ सेनाच नाही तर राज्यातील महायुती संपविण्याचा हा घाट आहे. शिवसेनेची स्थापना करताना स्व. बाळासाहेब यांनी शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वानुसार वाटचाल करेल असे सांगितले होते. यानुसार बाळासाहेब हयात असेपर्यंत राममंदिर आंदोलन, मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर झालेले आंदोलन, मराठी माणसाच्या हक्कासाठीचे आंदोलन अश्या अनेक आंदोलनातून ते दिसून आले. औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करणे हाही त्यातीलच एक मुद्दा. स्व. बाळासाहेब असेपर्यंत संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा ज्वलंत होता. आज मात्र सेनेने या मुद्द्याला गाठोड्यात बांधून झाडाला टांगले आहे. हिंदुत्वाची गरज भासली की त्यातून अलगद मेवा काढला जातो. उद्धव ठाकरे आज म्हणताहेत आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं. पण त्यांनी खर म्हणजे कोणते स्वप्न पूर्ण केले? हिंदुत्वाला तिलांजली देण्याचे? स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या मुद्द्यावर एकत्र केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मधून बाहेर पडण्याचे? अखंड हिंदुस्तानचे की असंगाशी संग करून सत्ता स्थापण्याचे?

स्व. बाळासाहेब यांचे स्वप्न काय होते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे केवळ स्व. बाळासाहेबांचे वंशज आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष असल्यामुळे उद्धव ठाकरे जनतेला व विशेषता शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या शिवसैनिकाला भ्रमित करू शकत नाही, हे त्यांनी ध्यानी घेतले पाहिजे. बंद खोलीत काय चर्चा झाली यावरून, सत्ता स्थापनेचे बारा वाजले आहेत. बंद दाराआड उद्धव, फडणवीस आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली, याचा कोणाकडेही पुरावा नाही हे तिघांना माहित आहे. केवळ यामुळेच शिवसेनेला सत्तेत ही चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना ५०-५० फॉर्म्युला ठरला, असे सांगितले होते. निवडणूक प्रचारात भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख प्रत्येक जाहीर सभेत होत होता. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतही असा उल्लेख अनेकदा झाला. तेव्हा शिवसेनेने काही आक्षेप घेतला नाही. परंतु, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मात्र शिवसेनेने आपली भूमिका सोडली. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. महायुती करून ज्यांनी निवडणूक लढवली त्या शिवसेना पक्षाचे प्रमुखांनी दुसऱ्याच दिवशी आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असे विधान केले. इथून पुढे बंद दाराआड झालेल्या चर्चेचे पिल्लू बाहेर काढले गेले. “जंगल मे मोर नाचा” या म्हणीप्रमाणे शिवसेनेने आपल्या जागा भाजपापेक्षा दुपटीने कमी आलेल्या असताना संजय राऊत या धूर्त नेत्याने अख्ख्या महाराष्ट्राने हिंदुत्वाला दिलेला कौल उधळून लावला. थोडी ताणाताण केल्यास भाजप हवे ते देईल, अशी आशा बाळगून ५०-५० फॉर्म्युल्यानुसार सत्ता स्थापन व्हावी अशी भुमिका सेनेतर्फे घेण्यात आली. भाजप आढेवेढे घेऊन हा प्रस्ताव मान्य करण्याची चाहूल लागताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दुसरा फासा टाकला गेला. या फाश्यात सागरातील सर्वात मोठा देवमासा पकडायचा म्हणून प्रयत्न आहे. त्यासाठी वेळ लागत आहे. पण तोवर अन्य लहान मोठ्या माश्यांनी, खेकड्यांनी हुकला लावलेले शिदोड शिल्लक ठेवले म्हणजे झाले. नाहीतर ‘हेही’ जायचे आणि ‘तेही’ जायचे अशी वेळ शिवसेनेवर येऊ शकते.

शिवसेनेच्या या नादान हट्टाची गम्मत बघा. मागील ३५ वर्षापासून सेना भाजप सोबत निवडणूक लढवीत आहे. यात ज्याच्या जास्त जागा त्यांना बहुमान मिळाला आहे. १९९५ च्या निवडणुकीत भाजप सेनेच्या युतीचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा सेनेच्या ७२ तर भाजपच्या ६५ जागा आल्या होत्या. केवळ सात जागा अधिक असल्यामुळे शिवसेनेचे  मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रूपाने राज्यास मिळाले होते. १९९० मध्ये भाजप ४२ शिवसेना ५२, १९९९ मध्ये भाजप ५६ शिवसेना ६९, २००४ मध्ये भाजप ५४ शिवसेना ६२ अश्या जागा आल्यामुळे भाजप सतत लहान भाऊ ठरला होता. म्हणून विरोधी पक्षनेतेपदही केवळ शिवसेनेकडेच राहिले होते. या नियमानुसार आज भाजपच्या १०५ व शिवसेनेच्या ५६ जागा निवडून आल्या आहेत. यासाठी कोणता न्याय योग्य आहे? समान ध्येयाने प्रेरित झालेल्या दोन पक्षांमध्ये भविष्यात केवळ मंत्रिपदावरून युद्ध जुंपू नये व हिंदुत्वाचे नुकसान होऊ नये म्हणून तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते व स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हा पायंडा घालून दिला होता. त्याला आज आम्हाला ‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’ शिकवू नका म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपली ध्येय, धोरण, तत्व आणि संस्कार वेशीला टांगून येन केन प्रकारे सत्ता न मिळवता शिवसेनेच्या या बदललेल्या राजकारणाला पुन्हा मूळ प्रवाहात आणून आपल्याला महायुतीतील मोठा भाऊ होऊनच स्वाभिमानाने मुख्यमंत्री केले पाहिजे. हाच स्वाभिमान आणि शहाणपण स्व. बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

©️कल्पेश जोशी 
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

  1. हे क्लेषकारक दु:खदायक आहे.
    १९६०- १९७० दशकात जवळ जवळ प्रत्येक कारखान्यातील आॅफीस मधे ७५% तमीळ किंवा मल्याळी स्टाफ असे. भांडुप ते ठाणे जुन्या आग्रा रस्त्यावर औद्योगिक संस्थाने नवनवीन उभी रहात होती. जाॅन्सन अॅण्ड ञाॅन्सन, कौलगेट पामौलिव, रॅली वुल्फ, बाटलिबाॅय, हेक्स्ट फार्मा, आग्फा गेवर्ट, सिबा, जीकेड्ब्ल्यू, किती नांवे सांगू?
    शिवसेनेचा उदय झाला आणि झपाट्याने चित्र पालटू लागले. त्या ऐतिहासिक कार्याला आपण विसरू नये. म्हणून सद्ध्या जे काही घडत आहे तो टिंगलीचा विषय नसून, अश्रू ढाळावे असा आहे. मी १९७० मधे माझगांव डाॅक्स मधे नोकरीला लागलों तेव्हा पासुनची स्थित्यंतरे पाहिली आहेत, अनुभवली आहेत.
    मराठी केवळ मजूर, कामगार, हमाल, ड्रायवर, वाॅचमन इ. असत. मराठी मुले बेकार तांड्यामधे!
    इंटरव्ह्यू चे काॅल लेटर्ससुद्धा देत नसत, मराठी उमेदवारांना.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान