'राजे' आणि 'वाजे'
'राजे' आणि 'वाजे'
खान्देशातील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून ना. गिरीश महाजन यांनी आपण राजकीय मैदानातील सच्चे पहेलवान आहोत, हे दाखवून दिले आहे. खरं म्हणजे मोठ्या मनाने हार स्वीकारण्याची हिम्मत सगळेच पहेलवान दाखवतात असे नाही. काही जण पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडतात तर कधी आमचे काय तर व्हाट्सअप्प हॅक केले म्हणून आम्ही हरलो अशी बोंब करून आपला पराभव दुसऱ्याच्या माथी मारतात. म्हणून सर्वप्रथम पालकमंत्री ना. गिरीश महाजन राजकीय लढवय्ये म्हणून कौतुकाचे मानकरी ठरतात.
यंदाच्या निवडणुकांचा थोडा जरी अभ्यास केला तरी असे लक्षात येते, की भाजप राज्यभरात पुन्हा सद्गुणविकृतीला बळी पडला आहे. २०१० पूर्वीचे भाजपचे राजकारण ज्याप्रकारे सद्गुणांची जपमाळ हाती धरून होत असे, त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते. भाजप साम-दाम पर्यायाने मैदानात उतरल्याचे चित्र मध्यंतरी माध्यमात विरोधकांनी अतिशय हुशारीने सोडले व त्याला हातभार विरोधकांनी लावला. त्यामुळे भाजपने सुरू केलेली नेत्यांची इनकमिंग फारच काहीतरी नैतिकता सोडून केलेले देशद्रोही कृत्य असल्यासारखे लोकमनावर सोडले गेले. यामुळे भाजपची प्रतिमा मालिन करताना याचा फायदा झाला.
अश्याच स्वरूपाचा फटका खान्देशात एकनाथराव खडसे यांच्या तिकीट रद्द झाल्याच्या प्रकरणावरूनही झाला. खडसे - महाजन म्हणजे एकमेकांचे पक्षांतर्गत शत्रू. त्यामुळे माध्यमात या प्रकरणाला अक्षरशः कोल्हापुरी मसाला लावून तडका देण्यात आला. याचा ठसका भाजपाला सोसला गेला नाही आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले खडसे विरोधकांसह माध्यमांच्या डावास बळी पडले. नाथाभाऊ समर्थक म्हणून विरोधकांचे स्लीपर सेल यास अधिक आग लावण्यात सफल झाले. निष्ठावानांना डावलून आयारामांना भाजपा जवळ करत आहे, म्हणजे भले मोठे अनैतिक कृत्य भाजपाने केले असे विरोधकांनी बिंबवले. खान्देशात त्याचा फटकाही भाजपला बसला. तथापि रोहिणी खडसे यांचा पराभव परवडला; नाथाभाऊंचा परवडणारा नव्हता म्हणूनच नाथाभाऊंना पक्षाने बाजूला सारले हे निकालानंतर राजकीय जाणकारांच्या लक्षात आले. परंतु, वेळ निघून चुकली होती व महाजनांच्या प्रगतीपुस्तकात अधोगतिकडे आलेख सरकला होता.
ना. गिरीश महाजनांनी गेल्या पाच वर्षात केवळ खान्देशच नाही तर नाशिक अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात निवडणुकांचे अशक्यप्राय विजय भाजपाला मिळवून देऊन आपला दबदबा निर्माण केला. अहमदनगर येथील पालिका निवडणुकीनंतर तथाकथित जाणते राजे पवार साहेबांनाही सुगावा न लागू देता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपावासी करवून घेतले. त्यामुळे महाजन दरारा पार बारामतीला जाऊन पोहचला. त्यावेळी पवार साहेबांची चिडचिड पाहून किती जणांना कोपराच्या ठोश्याचा प्रसाद खावा लागला असेल हे तेच जाणोत.
पाच वर्ष सर्व समाज सोबत घेऊन, सर्वाना समान न्यायाने सेवा सुविधा पुरवून आणि व मराठा- धनगर आरक्षणसारखे संवेदनशील मुद्दे अतिशय कुशलतेने हाताळून त्या समाज बांधवांना महायुती सरकारने न्याय दिला. जलयुक्त शिवार सारख्या प्रभावीपणे योजना राबविल्या. राज्य लोडशेडिंगमुक्त केले. असे अनेक मुद्दे भाजपाकडे असताना ते लोकांपर्यंत पोहचविण्यात कमी पडले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला. त्यामुळे निवडणुकीचे आलेले परिणाम हे सरकारवर जनता नाराज असल्यामुळे नाहीच; पण काँग्रेस राष्ट्रवादीवर जनतेने विश्वास ठेवला म्हणूनही आलेले नाहीत. मागील किमान आठ वर्षापासून भाजपाची यशस्वी रणनीती यावेळी थोडी चुकली व त्याचा हा परिणाम त्यांना भोगावा लागला. तरीही भाजप मोठा पक्ष ठरला. असे असूनही ना. गिरीश महाजन विजयी गुलालात न्हाऊनही आपले अपयश स्वीकारतात; त्या अर्थी ते राजकारणातील 'राजे' ठरले आहेत, तर राजकारणात केस पांढरे केलेल्या पहेलवानांनी स्वतःचे उर बडवून घेऊन ते निव्वळ 'वाजे' ठरले असल्याचे यातून निष्पन्न होते. त्यामुळे हा महाजनादर्श नवे जुने साऱ्यांनीच घ्यावा असा आहे.
-कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा