नमोविजयात 'मोदीभक्तां'चा मोलाचा वाटा!
नमोविजयात 'मोदीभक्तां'चा मोलाचा वाटा!
नमो विजयात मोदीभक्तांना विसरून कस चालेल?
खेड्यापासून शहरापर्यंत मोदी सरकारची भूमिका मांडणाऱ्या मोदी भक्तांची नमो विजयात विशेष भूमिका मांडणार लेख:
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मोदी सरकारचा पुनश्च ऐतिहासिक विजय झाला. या विजयाचा सर्वत्र जल्लोष चालू आहे. नरेंद्र मोदींनी विजयानंतर आपल्या पहिल्या भाषणात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्यांनी-ज्यांनी मोदी सरकारच्या विजयात फुल ना फुलाची पाकळी म्हणून योगदान दिले, त्या सर्वांचे नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आभार मानले. परंतु या सर्वांमध्ये मोदीभक्तांकडे सर्वार्थाने जणू दुर्लक्ष झाले. पक्षाची भूमिका मांडतांना भाजपचे प्रवक्ते टीव्ही चॅनल्सवर व प्रसारमाध्यमांमध्ये नियमित दिसतात. परंतु जमीन स्तरावर खेड्यामध्ये, गावांमध्ये, वस्तीवस्तीमध्ये, कधी कट्ट्यावर तर कधी सोशल मीडियात नरेंद्र मोदींना समर्थन करणारे समर्थक त्यांच्या भूमिका मांडत असतात. मोदी सरकारचे भाग बनतात व वातावरण विरोधी वातावरण गिळून टाकतात. मोदी सरकारची लहर जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्या सर्वांना विसरून कसं चालेल?
2014 मध्ये नरेंद्र मोदींचे मोदी सरकार सत्तेत बसले आणि लगेच विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सुरू केले होते. रेल्वेचे भाडे वाढले असो किंवा घरगुती लागणारा किराणा वस्तूंचे वाढलेले दर असो हे सर्व मुद्दे पुढे करत विरोधक पेटून उठले होते. त्यातच बुद्धिजीवींनी पुरस्कार वापसी सोहळा सुरू केला होता. देशात मागील पाच वर्षात एकूणच मोदी सरकार मुळे लोकशाही कशी धोक्यात आली व संविधान कसे बदलण्यात येत आहे, असा अपप्रचार विरोधकांकडून सातत्याने होत होता. त्यातच राज्यात 2017 मध्ये सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्यावरून घेरण्यात आले. कधी नव्हे इतके मोर्चे मागील पाच वर्षात निघाले. मग जेएनयू प्रकरण घडले. त्यातही लोकशाहीचा गळा घोटला जातोय व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे असे सांगण्यात आले. विरोधकांकडून मोदी सरकारवर यासारखी अनेक टीकास्त्र सोडण्यात येत होते. परंतु मोदी सरकारचा बाजूने नेटाने सामना केला असेल तर तो पक्षाच्या अनधिकृत प्रवक्त्या प्रमाणे मोदी भक्तांनी.
2018 मध्ये चार राज्यात भाजपला धक्का बसला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सत्तेत आले त्यानंतर सोशल मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काँग्रेसची लहर आल्याचे बिंबवले जात होते. म्हणजेच काय तर सोशल मीडियामध्ये मोदी सरकारची ताकद कमी झाली, असा प्रचार केला गेला होता. त्यावेळेस काही अंशी मोदी सरकार व त्यांचे सोशल मीडियातील समर्थक बॅकफूटवर आले होते. परंतु पुढील काही दिवसातच पूर्वपदावर येत त्यांनी परिस्थितीत बदल केला व सत्तेत बसलेल्या विधानसभेतील नवीन सरकारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यात राजस्थानमधील सरकार व मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वप्रथम लक्ष्य झाले. ही कामगिरी मोदी भक्तांनी लीलया पार केली. 2014 मध्ये मोदी सरकारच्या विजयानंतर भक्तांचा किंवा मोदी समर्थकांचा यामागे हात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विरोधकांकडून मोदी समर्थकांना टारगेट केले जाऊ लागले. त्यामुळे मोदी समर्थकांना मोदी भक्त लावले त्यावरून मोदी समर्थकांची हेटाळणी होऊ लागली. 'मोदीभक्त' हा शब्द जणू शिवीसारखा वापरला जाऊ लागला. सोशल मीडियात मोदी सरकारची बाजू घेणाऱ्यांची टिंगल केली जाऊ लागली. पण तरीही ही न खचता हा आपला गौरव समजून समर्थकांनी हार पत्करली नाही.
सरकारच्या योजना, सरकारची कामे, भूमिका मांडून तसेच कट्ट्यावरील गोष्टींमधून मोदी कसे ग्रेट आहेत हे मांडण्यात मोदी भक्त कुठेही कमी पडले नाहीत. ना कसले मानधन ना कसला पगार तरीही मोडीपुराब अव्याहतपणे चालू होते. मोदी सरकारची विचारधारा, त्यांचा निश्चय व काम करण्याची पद्धत, देशासाठी वाहून जाण्याची तयारी व प्रामाणिकपणे काम करत असल्याची प्रतिमा देशातील देश प्रेमी लोकांना भावली म्हणून त्यांनी आज पर्यंत राजकीय वर्तुळात अटलजी नंतर समोर आलेल्या नेतृत्वाला समर्थन करण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदींवर त्यांचा त्यांचा विश्वास होता, श्रद्धा होती, ती त्यांनी पार पाडली. प्रसंगी सरकारचा निर्णय न पटल्यास विरोधही केला. परंतु देशासाठी त्याग करणाऱ्या नरेंद्र मोदींना समर्थन करणे त्यांनी सोडले नाही. जे काम सरकारचे किंवा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करू शकले नाहीत किंबहुना त्यांना करता येत नव्हते ते काम पार पाडले. पण मोदी लाट त्यांनी ओसरू दिली नाही.
नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये सर्वांगाला जनता पक्षाच्या चिन्हाने रंगवून मोदी सरकारचा प्रचार करणारे, मोदींच्या सभेसाठी मोफत वाहन पुरवणारे, विजयानंतर हॉटेल मालकांनी लोकांना मोफत दिलेले जेवण, सामान्य नागरिकांनी जिलेबी वाटल्या, हॉटेल व हातगाडी लावणाऱ्या दुकानदारांनी पोहे वाटप केले, नाश्ता झाला, चहा वाटप केले हे सर्व अविश्वसनीय होते. कोणत्याही स्वार्थाशिवाय एवढा मोठा आनंद व्यक्त करणे यावरून लोकांचे नरेंद्र मोदींविषयीचे प्रेम व्यक्त होते. निकाल लागल्यानंतर देशभरातील कित्येक घरात दिवाळी साजरी झाली. घरात गोडधोड जेवण करण्यात आले. या लोकांचा भारतीय जनता पक्षाची काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या सर्व लोकांचा आपल्या मित्र परिवारात, प्रवासात किंवा अन्य पब्लीक प्लेस मध्ये जेव्हा जेव्हा जन संपर्क झाला, तेव्हा तेव्हा मोदी सरकारची बाजू घेऊन त्यांनी समाजात मोदींचे स्थान कायम ठेवले. या सर्वांना मोदी विजयात विसरून कसं चालेल?
मोदी विरोधकांनी मोदी समर्थकांना टार्गेट करण्यासाठी 'मोदीभक्त' हा शब्द वापरला होता. तोच शब्द आता मोदी समर्थक स्वतः गौरव म्हणून म्हणून घेतात. 'आहोत आम्ही मोदी भक्त' असे सांगतात. त्यामुळे चर्चेत काही मुद्दा नसताना मोदी समर्थकांना टार्गेट करण्याचे शस्त्र मिळाले होते. मोदीभक्तांनी आता तेही नष्ट करून टाकले आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांप्रमाणेच सोशल मीडियातील विरोधकांची बोलती बंद झाली आहे. पुढील पाच वर्षात त्यांना आता नवीन हत्यार शोधावे लागणार आहे. परंतु मागील पाच वर्षांचा विचार केल्यास मोदी सरकारच्या शक्ती केंद्रात मोदीभक्त यांचाही उल्लेख करावाच लागेल. मोदी सरकारच्या ऐतिहासिक विजयात मोदी भक्तांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे त्यांना विसरून चालणार नाही.
©️कल्पेश जोशी
Lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा