नथुराम, दहशतवाद आणि राजकारण
नथुराम, दहशतवाद आणि राजकारण
नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतर देशातील पहिला आतंकवादी किंबहुना हिंदू आतंकवादी होता असे वक्तव्य करून मक्कल निधी अय्यपन पक्ष प्रमुख व सिनेअभिनेता कमल हसन ने स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. कालपर्यंत ज्याला कोणी ओळखत नव्हते त्या कमल हसन ला नथुराम गोडसेने सुपरहिट केले. त्यासाठी गांधींना मात्र मरावं लागलं. कारण गांधींचा मृत्यू झाला नसता तर आज हसन प्रमाणे काँग्रेसवाल्या गांधी परिवारालाही आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेता आल्या नसत्या. त्यामुळे महात्मा गांधीं म्हणजे काँग्रेससाठी जणू अक्षय्य ऊर्जेचा स्रोत बनून राहिले आहेत. त्यात आज नथुराम गोडसे यांचाही वापर सुरू झाल्याचे दिसत आहे.
भाषण ऐकण्यासाठी समोर जमलेल्या मुस्लिम जमावात 'हिंदू आतंकवाद' हा शब्द फेकणे हसनला आवश्यक होते. त्यासाठी त्याने नथुराम गोडसे चा योग्य तो वापर करून घेतला. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आज-काल राजकारणामध्ये खळबळ माजवणारे किंवा संवेदनशील वक्तव्य करणे म्हणजे राजकीय धारिष्ट्याचे काम समजले जाते. हसनने तेच केले आहे व त्यात तो यशस्वी ठरला आहे. आपण केलेले वक्तव्य समोरील जमलेल्या मुसलमानांना लुभावण्यासाठी केलेले नसून समोरील गांधीजींच्या पुतळ्याला उद्देशून केले असल्याचे त्याने स्पष्टीकरण केले. पण गांधीजींसमोर एकवेळ नथुरामला शिव्या घालणे ठीक; पण हिंदूंना आतंकवादी संबोधने गांधींना तरी आवडले असते का?
आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपण वेळोवेळी देशातील बहुसंख्यांक वर्गाला दहशतवादी ठरवित आहोत, याची लाज हसन सारख्या नेताना उरलेली दिसत नाही. आतंकवादी म्हटल्यानंतरही जो समाज शांततेत सहन करून घेतो त्याला आतंकवादी हा शब्द तरी लागू पडतो का? स्वतः गांधीजींनी हिंदू धर्माविषयी कधी अशी तुच्छ लेखणारी वक्तव्य केली नव्हती. किंबहुना गांधीजींना हिंदू असल्याचा सार्थ अभिमानच होता. त्यांनी हिंदू धर्माला शांतता अहिंसा व सर्वांना सामावून घेणारा धर्म म्हणून हिंदू धर्माची प्रशंसाच केली होती. गोहत्या बंद व्हावी यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे कमल हसनच्या वक्तव्यामुळे गांधीजीही नाराज झाले असतील यात शंका नाही. पण आपल्या प्रसिद्धीसाठी हसनने गांधीजींचा सोयीस्कर वापर करून घेतला हे खरे.
तथापि कमल हसन च्या वक्तव्यामुळे 'हिंदू आतंकवाद' हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू आतंकवादी होता असे त्याने विधान केले होते. परंतु नथुराम गोडसे यांना आतंकवादी म्हणणार कसे? ज्या व्यक्तीने गांधीजींना मारण्याअगोदर त्यांना नमस्कार केला व नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तेथे जमलेल्या अन्य व्यक्तीवर त्यांनी गोळी झाडली नाही, कोणालाही इजा केली नाही, त्याला दहशतवादी म्हणणे कितपत योग्य? किंबहुना नथुराम गोडसे यांनी गांधीजींवर गोळी चालवल्यानंतर स्वतःचे आत्मसमर्पण करून टाकले होते व पोलिसांजवळ आपला गुन्हाही कबूल करून टाकला होता. परंतु आपण हे कृत्य का केले यासाठी त्यांनी न्यायालयात स्पष्टीकरण दिले होते. (जे तत्कालीन सरकारने कधीही समोर येऊ दिले नाही) त्यामुळे गोडसेंना आतंकवादी म्हणणार तरी कसे, हा प्रश्न पडतो.
गांधीजींना मारणारा ब्राह्मण होता, म्हणून गांधीहत्येनंतर पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. त्यांची लुटालूट झाली. या जमावाचा उद्देश काय होता? दहशत पसरवणे हाच ना? अशीच घटना राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झाली होती. राजीव गांधी यांची हत्या एका शीख व्यक्तीने केली, या कारणावरून पंजाब मध्ये हजारो शीख बांधवांचे शिरकाण करण्यात आले. घरे जाळण्यात आली. महिलांवर अत्याचार झाले. आणि याला पाठिंबा देशातील तथाकथित गांधीवादी व अहिंसा प्रेमी विचार असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा होता जे आता समोर आले आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर सिंध प्रांतातून गाड्या, लॉऱ्या आणि रेल्वे भरून अर्धमेली व मेलेली प्रेतं येत होती. येणाऱ्या हिंदूंच्या आया-बहिणींवर अनन्वित अत्याचार केलेले होते. मालाची पोति रचावीत तशी मेलेल्या माणसांची प्रेते गाडीत रचलेली होती. बंगाल प्रांतातही हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या गेल्या. त्याला जबाबदार कोण होते? ते दहशतवादी नव्हते का? त्यांची भावना तर दहशतवाद पसरविण्याचीच होती. हैदराबाद हे वेगळं इस्लामिक राष्ट्र व्हावे अशी इच्छा असणाऱ्या रझाकारांनी हजारो हिंदुंना ठार मारले. महिलांवर अत्याचार केले. ते कोण होते? दहशतवादीच ना? हसन च्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या ओवेसींना तरी याच उत्तर देता येईल का? पण ज्यांना दहशतवादच कळलेला नसतो किंवा ज्यांना दहशतवाद या नावाखाली जाणीवपूर्वक कोणाला तरी बदनाम करायचे असते त्यांच्या जिभेलाही हाड नसते. नाही तर आपल्या बुद्धिशी प्रामाणिक राहून वस्तुस्थिती स्वीकारून त्यांनी 'मुस्लिम दहशतवाद' असाही कधीतरी उल्लेख केला असता. पण तेवढी मर्दानगी हसन फक्त दक्षिणात्य चित्रपटातच आणू शकतो. कारण तिथे ना मते मिळतात ना जुते. त्यामुळे हसन ने नेता आणि अभिनेता यातलं फरक समजून घेतला पाहिजे. नाहीतर अंडी व टमाट्यांचा वर्षाव तर होणारच!
©️कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा